राष्ट्र निर्माण होण्यासाठी भूमी आणि तीवरील समाज यांचा मिळून होणारा देश, सामूहिक जीवनसंकल्प, सुव्यवस्था आणि मानवी जीवनाचा आदर्श या चार घटकांची आवश्यकता असते. या चारही घटकांच्या समष्टीला राष्ट्र म्हटले जाते.

रवींद्र माधव साठे

decision making process in religious and social welfare
तर्कतीर्थ विचार : धर्मनिर्णय पद्धती व समाजहित
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
India turmeric export target of 1 billion doller by 2030
हळदीचे १०० कोटी डॉलरचे निर्यातलक्ष्य
grand alliance government accelerate the shaktipeeth highway work after election victory
निवडणुकीत प्रचंड बहुमत… आता महायुती सरकारकडून शक्तिपीठ महामार्गाला गती?
experts express affordable housing solutions in indian expres thinc our event
शहरांमध्ये परवडणारी घरे उपलब्ध करून देणे शक्य!
portfolio, investment , Alphaportfolio Concept ,
चला अल्फापोर्टफोलिओ तयार करूया
philosophers exploring the good life
तत्त्व-विवेक : सरधोपट जगण्याच्या अल्याडपल्याड…
chaturang article
स्थलांतरातून बहरलेली खाद्यसंस्कृती

राष्ट्र ही एक भावात्मक संकल्पना आहे, परंतु त्याची काही आधारभूत तत्त्वे आहेत. राष्ट्र संस्थापित होण्यासाठी आवश्यक असलेल्या घटकांपैकी भूमी हा एक महत्त्वाचा घटक आहे. निश्चित अशा भूखंडाबरोबरच तेथे वसणारा मानवसमाज म्हणजे ‘एकजन’ किंवा ‘भूमिजन’ हा दुसरा महत्त्वाचा घटक आहे. राष्ट्रासाठी भूमी आणि त्यावर निवास करणारे लोक यांच्यामध्ये मातापुत्रवत् संबंध असणे अनिवार्य आहे. त्या भूमीवर निवास करूनही जे लोक तिला मातृभू मानत नाहीत, ज्यांची श्रद्धाकेंद्रे व निष्ठा त्या भूमीच्या बाहेर असतात असे सगळे लोक जरी त्या भूमीत जन्मले असले तरी त्यांना ‘एक जन’ अथवा ‘राष्ट्रीय जन’ म्हणता येणार नाही. त्या भूमीबद्दल जोपर्यंत त्यांना ममत्व उत्पन्न होणार नाही आणि तेथील राष्ट्रीय आकांक्षांशी ते लोक एकरूप आणि एकरस होणार नाहीत, तोपर्यंत त्यांस विघातक व विकृत तत्त्वच म्हणावे लागेल. म्हणूनच पुत्ररूप समाजाच्या सर्व प्रतिनिधींच्या मनात समान इच्छा असणे ही राष्ट्रीयतेची तिसरी अट आहे.

आम्ही सर्व जण एक आहोत. आपल्या मातृभूमीचा गौरव व गरिमा सतत वाढवू. मातृभूमीच्या समृद्धीच्या कार्यात आम्ही स्वत: होऊन सहभागी होऊ, अशी भावना असणे म्हणजेच समान इच्छा असणे होय. सर्व समाजाचा मिळून हा संकल्प झाला तर ते राष्ट्र बलशाली होण्याचा मार्ग सुकर होतो. पं. दीनदयाळ उपाध्याय म्हणत की ‘सामूहिक संकल्पाच्या एकरूपतेशिवाय कोणतीही समष्टी नांदू शकत नाही. सर्व लोकांच्या अनुभूतीतूनच राष्ट्राचा संकल्प प्रकट होतो. समान अनुभूतीसाठी आणि फलस्वरूप निर्माण होणाऱ्या समान संकल्पासाठी सर्वाचे ध्येय एक असणे आवश्यक आहे. ध्येय एक असण्यासाठी जीवनाचा आदर्श एक असणे आवश्यक आहे. हा आदर्श प्रत्यक्षात उतरविण्यासाठी संकल्प जागृत होतो.’ प्रत्येक राष्ट्रापुढे आदर्श असतात. जसे आपल्याकडे प्रभू रामचंद्र, भगवान श्रीकृष्ण, गौतम बुद्ध, स्वामी विवेकानंद, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, स्वातंत्र्यवीर सावरकर आदी. अशा आदर्शाची निर्मिती एकाएकी होत नसते. समाजाला उन्नत करण्यासाठी भूतकाळात महापुरुष व समाजसुधारकांनी जे महान प्रयत्न केलेले असतात; त्यांचा त्याग, परिश्रम, तपस्या आणि केलेले कार्य या सर्वाची मिळून एक परंपरा तयार होते. अशा महापुरुषांच्या जीवनातून त्यांच्या आदर्शाचे समाजास दिग्दर्शन होते. राष्ट्राला आवश्यक असणारे शेवटचे तत्त्व म्हणजे सुव्यवस्था (आधुनिक काळात त्याला राज्य घटना किंवा संविधान म्हणता येईल). कोणत्याही प्रकारच्या अशा व्यवस्थेशिवाय राष्ट्रातील समष्टी जीवनाची कल्पना करणे कठीण आहे.

संक्षेपात सांगायचे तर राष्ट्र निर्माण होण्यासाठी चार घटकांची आवश्यकता असते. भूमी आणि तीवरील समाज यांचा मिळून होणारा देश हा पहिला घटक. सर्वाची इच्छाशक्ती म्हणजेच सामूहिक जीवनसंकल्प हा दुसरा घटक आणि सुव्यवस्था हा तिसरा घटक होय. मानवी जीवनाचा आदर्श हा राष्ट्रीयतेचा चौथा घटक. या चारही घटकांच्या समुच्चयाला म्हणजेच समष्टीला राष्ट्र म्हटले जाते. भारतीय चिंतनाप्रमाणे कोणाही व्यक्तीच्या जीवनधारणेसाठी, शरीर, मन, बुद्धी आणि आत्मा आवश्यक आहेत, त्याचप्रमाणे राष्ट्र तयार होण्यासाठी देश, संकल्प, सुव्यवस्था व नियम आणि आदर्श या चार गोष्टी अत्यावश्यक मानल्या जातात. स्वामी विवेकानंद म्हणत की राष्ट्र म्हणजे काय असते, तर व्यष्टी आणि समष्टीशिवाय अन्य काही नाही. राष्ट्राची सर्वागीण उन्नती व्यष्टी आणि समष्टी या दोन संस्थांच्या परस्पर संबंधांवर अवलंबून असते.

भारतीय धारणा अशी आहे की, संपूर्ण समाज हा एक शरीरासारखा समान आहे. प्रत्येक व्यक्ती आणि व्यक्तीसमूह समाजाचे अंग-प्रत्यंग आहेत. ‘मी’ आणि ‘माझ्या समाजाचा’ परस्परसंबंध म्हणजे आपले शरीर आणि शरीराच्या अवयवांचा संबंध जसा असतो तसा आहे. त्यामुळे आपण या राष्ट्राचे अंगभूत घटक आहोत (वयं राष्ट्रांगभूता) अशी भावना जेवढी अधिक जोपासली जाईल तेवढा त्या व्यक्तीचा राष्ट्रासाठी समर्पणभाव वाढेल. 

पं. दीनदयाळजी व्यष्टी व समष्टी या संबंधांविषयी चौकोनी डब्याची उपमा देत. ते म्हणत ‘आपण जेव्हा एखादा चौकोनी डबा हातात घेतो तेव्हा त्याच्या दोन बाजूंनी तो धरतो. एखादेवेळी आपण तो वरच्या व खालच्या बाजूंनी धरू किंवा एखादवेळी आडव्या बाजूंनी धरू. पण म्हणून डब्याच्या उरलेल्या बाजू आपल्याला कधीतरी नाहीशा करता येतील काय? आपण डब्याचा आकार कितीही लहान केला तरी त्या चार बाजू नेहमी कायमच राहातील. ‘एका नाण्याच्या दोन बाजू’ ही म्हण प्रसिद्धच आहे. कोणी त्याला ओली-सुकी म्हणते तर इंग्रजीत हेड-टेल म्हणतात. कोणत्याही भाषेत काहीही म्हटले तरी नाण्याची एक बाजू दुसरीपासून निराळी करता येईल काय? अगदी त्याचप्रमाणे व्यष्टी आणि समष्टी या मानवी जीवनाच्या दोन बाजू आहेत आणि त्या अविभाज्य आहेत’. व्यष्टीप्रमाणे समष्टी ही सुद्धा एक सजीव संस्था आहे, तेही एक व्यक्तिमत्त्व आहे असे आम्ही मानतो. व्यष्टी आणि समष्टी यांच्यात परस्पर संघर्ष नसून एकरूपता आहे. या संदर्भात एक रुपक कथा आहे.

एकदा एका शरीराच्या विभिन्न अवयवांत भांडण लागले. हात, पाय, नाक, डोळे, तोंड एवढेच काय पण दात, जीभ इत्यादी सगळेच अवयव आपापले महत्त्व वर्णन करू लागले. माझ्याशिवाय शरीराचे काम चालूच शकत नाही, असे जो तो मोठय़ा गर्वाने सांगू लागला. शेवटी स्वत:ला सर्वश्रेष्ठ समजून प्रत्येकाने आपल्या कार्याचे त्यागपत्र दिले, हातांनी आपले काम बंद केले. अर्थातच शरीराला क्लेश झाले पण कसे तरी काम रेटले गेले. तेव्हा हातांच्या लक्षात आले, अरे, कष्टाने का होईना, पण माझ्याशिवाय शरीराचे काम चालू शकते. अशा क्रमाने प्रत्येक अवयवाने आपली शक्ती आजमावली व प्रत्येक अवयवाच्या लक्षात हे आले की आपल्याशिवाय शरीराचे कार्य चालू शकते. परंतू अवयवांच्या या आपापसातील स्पर्धेस प्राणदेव कंटाळले ते निघून जाऊ लागले. त्यावर सर्व अवयव हात जोडून म्हणाले, ‘प्राणदेवा तुम्ही निघून गेलात तर तुमच्याशिवाय एकही क्षण आम्हाला राहता येणार नाही.’ तात्पर्य शरीराच्या विभिन्न अवयवांत सामंजस्य असते आणि ते परस्परांना पूरक असतात, एकरूप असतात. शरीरात नित्य अशी एकात्मता असते.

समाजपुरुषाच्या शरीरातही असाच एक प्राण असतो. त्या प्राणाचे संरक्षण करावे लागते. त्या प्राणाला बलवान करावे लागते. राष्ट्रात असलेल्या एकात्म भावनेचेही तेच महत्त्व आहे.

व्यक्तीने स्वत:बरोबरच समाजहितासाठी चिंता करणे आवश्यक असते. व्यक्ती आणि समाज, अभिन्न आणि अविभाज्य आहेत. जेथे व्यक्ती स्वत:ची काळजी करत असतानाही समाजाची काळजी बाळगते, तेथील समाजाची अवस्था सुसंस्कृत असते. व्यक्ती व समाज या दोघांचेही जीवन परस्परावलंबी व परस्परपूरक असते.

पं. दीनदयाळजींच्या शब्दात सांगायचे तर ‘व्यक्ती निघून जाते, पण समाज राहातो. जर व्यक्तीला स्वतंत्र व्हायचे असेल तर समाज स्वतंत्र झाला पाहिजे. जर व्यक्तीला अमर व्हायचे असेल तर समाज अमर झाला पाहिजे. समाजासाठी व्यक्तीचे समर्पण आवश्यक आहे. त्याचबरोबर, व्यक्ती समर्थ व्हावी आणि तिचा विकास व्हावा यासाठी तिला सर्व प्रकारचे स्वातंत्र्य देणे हे समाजाचे कार्य आहे. हा व्यष्टी- समष्टी संबंध आम्ही स्वीकारला आहे.’

समर्थ रामदासांनी दासबोधात एक श्लोक लिहिला आहे.

मेघ चातकावरी वोळेना, तरी चातक पालटेना,

चंद्र वेळेवरी उगवेना, तरी चकोर अनन्य, ऐसे असावे सख्यत्व॥

व्यष्टी-समष्टी संबंध कसा असावा याचे हे चपखल उदाहरण आहे.

येथे मेघ व चंद्र म्हणजे समाज आणि चातक व चकोर म्हणजे व्यक्ती असे समजता येईल. चातक मेघाची वाट बघत असतो आणि मेघ बरसला नाही तरी चातक त्यावर नाराज होत नाही. असे म्हणतात की, चंद्र प्रकाशला की त्याच्या प्रकाशात चकोर पाणी पितो पण चंद्र उगवला नाही तरी चकोर चंद्राशी आपले नाते व सख्यत्व सोडत नाही. आपल्या इतिहासात खंडो बल्लाळांचे आदर्श उदाहरण आहे. छत्रपती संभाजी महाराजांनी खंडो बल्लाळवर अन्याय केला तरीही ते समाजाशी एकनिष्ठ राहिले. ते शिर्के यांना जाऊन भेटले व त्यांना संभाजी महाराजांनी समजावले की, ‘आपल्यावर अन्याय झाला तरी समाजाशी गद्दारी करायची नाही’.

अमेरिकेचे  माजी राष्ट्राध्यक्ष जे. एफ. केनेडी यांचे प्रसिद्ध वाक्य आहे. अमेरिकन नागरिकांना उद्देशून केलेल्या भाषणात ते म्हणाले की, ‘असे विचारू नका की देश तुमच्यासाठी काय करू शकतो, तर असे विचारा की तुम्ही देशासाठी काय करू शकता’. व्यष्टीशिवाय समष्टीची कल्पना अशक्य आहे आणि समष्टीशिवाय व्यष्टीच्या जीवनाला काहीही मूल्य उरत नाही. म्हणूनच या दोन्ही घटकांमध्ये उत्तम समन्वय हवा, हेच भारतीय चिंतन म्हणते. व्यक्तीच्या विकासाची आणि समाजाच्या पूर्णतेची ही समन्वयात्मक विचारपद्धती म्हणजे भारताने जगाला दिलेली एक देणगीच आहे.

ravisathe64@gmail.com

Story img Loader