जेथे सर्वाना विकास घडवून आणण्याच्या दृष्टीने लोकसत्ताक समान अधिकार असतील, असे हिंदुराष्ट्र सावरकरांना हवे होते..
रवींद्र माधव साठे
राष्ट्रवादाचा अभ्यास करताना स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या राष्ट्रवादाचा अभ्यास करणे आवश्यक आहे. २८ मे या त्यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर आज त्यांच्या राष्ट्रवादाचे पैलू जाणून घेऊ या. लोकमान्य टिळक आणि स्वा. सावरकर ही भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील दोन प्रभावशाली व्यक्तिमत्त्वे. आपण टिळकांच्या खांद्यावर उभे आहोत, असे सावरकर विनयाने म्हणत. भारत एक आधुनिक नवराष्ट्र म्हणून निर्माण होण्याच्या प्रक्रियेत सावरकरांचे जे द्रष्टेपण सिद्ध झाले, ते भारताच्या इतिहासातील भारतीयांच्या बौद्धिक संपदेचा सर्वश्रेष्ठ ठेवा म्हणता येईल.
हिंदुंनी स्वतंत्र भारत एकात्म, विज्ञाननिष्ठ आणि विजिगीषू कसा घडवला पाहिजे, याचे स्पष्ट दिग्दर्शन सावरकरांनी ‘हिंदुत्व’ या ग्रंथातून केले आहे. रत्नागिरीतील स्थानबद्धतेच्या काळात त्यांनी प्रत्यक्ष आचरणाने जातीभेदातील उच्चनीचतेची विषारी नांगी मोडून दाखविली. अस्पृश्यतेला हिंदु मानसिकतेतून सीमापार करण्यासाठी प्रयत्न केले. आपण स्वयंसिद्ध आणि निसर्गत: परिपूर्ण राष्ट्र आहोत, हे आत्मभान प्रखर करत हिंदुत्वाचे तत्त्वज्ञान निर्माण केले. ते तत्त्वज्ञान जगणाऱ्या संन्यस्त योद्धय़ांची तेजस्वी आणि अखंडित परंपरा प्रचलित करून त्यांनी दोन क्रांती केल्या. पहिल्या क्रांतीविषयी सांगायचे तर सावरकर बंधूंनी सर्वप्रथम संपूर्ण स्वातंत्र्याचा उद्घोष नाशिक येथे १९०० साली ‘मित्रमेळा’ या त्यांच्या संघटनेच्या व्यासपीठावरून केला. त्यासाठी सशस्त्र क्रांती अपरिहार्य आहे, हे त्यांनी आवर्जून सांगितले. त्यांनी सशस्त्र क्रांतीचे सर्वागीण तत्त्वज्ञान निर्माण केले. क्रांतिसंबंधित हिंसेला नैतिकतेचे अधिष्ठान प्राप्त करून दिले. क्रांतीचा स्वातंत्र्याशी आणि स्वातंत्र्याचा मानवी हिताशी म्हणजे मनुजमंगलाशी अपरिहार्य संबंध कसा आहे, हे त्यांनी दाखवून दिले.
स्वत्व आणि स्वत्वाच्या रक्षणार्थ गाजवावे लागणारे शौर्य या उदात्त मूल्यांची क्रांतीगीता सांगणारे सावरकर दार्शनिक आहेत. त्यांना पारतंत्र्याची चीड होती, स्वातंत्र्याची दुर्दम्य इच्छा होती आणि त्यासाठी शस्त्र चालविण्याचा त्यांचा निर्धार होता. सावरकरांनी हिंदुत्व आणि हिंदुराष्ट्रवादाचे तत्त्वज्ञान निर्माण करून दुसरी क्रांती केली. आज हिंदुत्वास देशात जी सर्वमान्यता व प्रतिष्ठा मिळत आहे, त्यात सावरकरांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. ‘एडवर्डला घालवून औरंगजेबाला गादीवर बसविण्यासाठी क्रांतिकारकांनी आपल्या रक्ताने फाशीचे खांब भिजविले नाहीत,’ असे बजावत सावरकरांनी हिंदुंना ते ‘स्वयमेव राष्ट्र’ म्हणून प्राचीन काळापासून अभिमानाने आणि वैभवाने कसे जगत आले आहेत, याची सोदाहरण जाणीव करून दिली. संयुक्त राष्ट्र संघाने एखाद्या समाजास राष्ट्रीयत्वाची पदवी प्राप्त होण्यासाठी जे आधुनिक निकष ठरविले, ते लागू केल्यावरही हिंदुंना राष्ट्र म्हणून उभे राहाण्याचा कसा निसर्गदत्त अधिकार आहे, हे सप्रमाण दाखवून दिले.
हिंदु राज्यकर्ते प्रारंभापासून आपले प्रशासन धर्मनिरपेक्ष राखण्यात यशस्वी झाल्याची साक्ष सावरकरांनी आपल्या साहित्यातून व वाणीतून दिली. आधुनिक पाश्चिमात्य विचारवंतांचे संशोधन या सिद्धान्तास पुष्टी देत असल्याने हिंदुत्वाच्या शासन प्रणालीत सर्व धार्मिक अल्पसंख्याक भयमुक्त अवस्थेत राहू शकतात, पण जर हिंदुत्वाचा आणि हिंदुराष्ट्रवादाचा त्याग केला तर मुस्लिमांचा अलगतावाद दूर करून राष्ट्राची सार्वभौमता, स्वतंत्रता, सुरक्षितता आणि एकात्मता अबाधित ठेवण्यात ‘हिंदी राष्ट्रवाद’ (जो भ्रांत होता) कार्यवाहीत आणला तर तो अयशस्वी ठरेल आणि परिणामी अखंड भारताचे ‘अखंड पाकिस्तान’ करण्याची प्रक्रिया सुरू होईल. ही प्रक्रिया खंडित करता येणार नाही, हा धोका सावरकरांनी फाळणीपूर्वीच दाखविला होता.
या दृष्टीने स्वातंत्र्यवीर सावरकरांचा हिंदुत्ववाद आणि हिंदुराष्ट्रवाद नेमका काय आहे, हे समजावून सांगावे लागेल. पहिली गोष्ट म्हणजे सावरकरांचे हिंदुत्व धर्मनिरपेक्ष आहे. ज्यामुळे एकत्वाची जाणीव निर्माण होते ते राष्ट्रीयत्व असेल तर सावरकरांचे हिंदुत्व समान परंपरा, समान इतिहास, समान भूतकाळ आणि भविष्यकाळाची समान स्वप्ने, समान भाषा इत्यादी अनेक सामायिक तत्त्वांवर उभे आहे. ते श्रुतिस्मृतिपुराणोक्त नाही. सावरकरांचे हिंदुत्व म्हणजे पूजापाठ, व्रतवैकल्ये, जानवे, स्तोत्रपठण, घंटा, धोतर नाही. ते जातपात न मानणारे, अस्पृश्यतेचे समूळ निर्मूलन करणारे आहे. ते यंत्रयुगाविषयी स्वागतशील आहे. त्याचा औद्योगिकीकरणाला पाठिंबा आहे. विज्ञान वरदान आहे, असे ते मानते. देश संरक्षणदृष्टय़ा समर्थ झाला पाहिजे, असे ते सांगते. त्यांचे हिंदुत्व अध्यात्म हा वैयक्तिक अनुभवाचा विषय समजून समाजाच्या प्रगतीसाठी भौतिकशास्त्राचा आधार घेतला पाहिजे, असा आग्रह धरणारे आहे. ते मानवतावादी आहे. विजिगीषू आहे. ते संकल्पनेत तर्काने आणि न्यायतत्त्वाने हिंदुराष्ट्र असले तरी व्यवहारात समूर्त होताना ते हिंदी राज्याचा अवतार घेऊन प्रकट होणारे आहे. हिंदुराष्ट्राच्या हिंदी राज्यात सर्वाना विकास घडवून आणण्याच्या दृष्टीने लोकसत्ताक समान अधिकार असतील, असे सांगणारे आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ ही घोषणा हे त्याचेच एक प्रतीक आहे. सावरकरांनी स्वातंत्र्यपूर्व काळात हिंदु महासभेच्या व्यासपीठावरून अनेक भाषणे केली, त्यात लोकशाहीचा पुरस्कार, ‘दरडोई एकमत’ असे उल्लेख अनेकदा केल्याचे आढळते.
स्वातंत्र्यवीरांनी १९२४ ते १९३७ या १३ वर्षांत रत्नागिरीतील हिंदु समाज एकसंध, सामर्थ्यशाली आणि विज्ञाननिष्ठ होण्याच्या दृष्टीने काय सुधारणा करता येतील याचा विचार केला. त्यांनी परधर्मात गेलेल्यांना पुन्हा हिंदु धर्मात येण्याचा मार्ग प्रशस्त केला. ज्यात्युच्छेदन आणि अस्पृश्यता निवारण केले. अंधरूढींचे निर्मूलन केले, कालबाह्य रूढींवर कठोर प्रहार केला. भाषाशुद्धी केली. बलोपासना उपदेशिली. विज्ञाननिष्ठा रुजविली. हिंदुंमध्ये बंधुभाव वाढीस लागेल, असे कार्यक्रम घेऊन सावरकरांनी प्रचाराचा धुमधडाका केला.
सावरकरांचे रत्नागिरी पर्व हे ज्ञानाच्या अधिष्ठानावर उभारलेले विधायक दृष्टीचे पुनर्निर्माण कार्य आहे. त्यांनी हिंदुंचा समाजशास्त्रीय अभ्यास करून गुणदोष समजून घेतले. गुणांचे वर्धन आणि दोषांचे निर्मूलन करण्याच्या दृष्टीने दिग्दर्शन केले आणि संकल्पित सुधारणा आदर्श स्वरूपात व्यवहारात आणून दाखविल्या. चातुर्वण्र्य नि जातिव्यवस्था समूळ गेली पाहिजे, असे त्यांनी नि:संदिग्धपणे सांगितले व त्याप्रमाणे वर्तन केले. अस्पृश्यता हा आपल्या आत्म्याविरुद्ध भयंकर अपराध आहे, असे मत त्यांनी मांडले.
जातिभेदाची निर्मिती एखाद-दुसऱ्या जातीने केली नसून सर्व समाज या दोषात वाटेकरी आहे, असे त्यांचे मत होते. जातिव्यवस्थेने जी जन्मजात उच्चनीचता समाजात प्रचलित होते, ती आपण मानणार नाही, असा मनोनिग्रह हिंदुंनी केला पाहिजे आणि सर्व जातींना विकासाच्या संधी आवश्यक त्या प्रमाणात उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. ही त्यांची भूमिका होती. महार मांगाच्या हातचे आणि मांग चांभाराच्या हातचे पाणी पीत नाही, हे लक्षात आणून देऊन उच्चनीचतेच्या आणि अस्पृश्यतेच्या भावनेने संपूर्ण हिंदु समाजाला ग्रासले आहे, तेव्हा उच्चनीचता आणि अस्पृश्यतेच्या विचारांचा अतिरेक अन्न आणि पेय प्राशन करताना सोडला पाहिजे. त्यामुळे हिंदु समाज एकजीव होण्याच्या अभिसरणाला गती मिळेल. इतर धर्मात गेलेल्यांना सन्मानाने पुन्हा हिंदु धर्मात आणण्याची शुद्धी चळवळ हिंदुंनी निष्ठापूर्वक हाती घेतली तर हिंदुंमधील उपेक्षित वर्गाचे भक्षण करण्याची जी लालसा राजकीय महत्त्वाकांक्षेने अन्य धर्मीयांमध्ये उत्पन्न होते तिची तीव्रता कमी होईल, असे सावरकर सांगत. जातिभेद, अस्पृश्यता ही विकृती शस्त्रक्रियेने उपटून टाकल्यावर हिंदु समाजपुरुषाची प्रकृती निरोगी होईल, असे ते म्हणत.
सध्या रशिया आणि युक्रेन संघर्ष धगधगत आहे. या दोन्ही राष्ट्रांवर मार्क्स आणि लेनिनचे संस्कार करण्याचा प्रयत्न सुमारे ७० वर्षे झाला. पण तिथे रुजला तो राक्षसी विस्तारवादी राष्ट्रवाद. स्वा. सावरकरांनी ‘पुढची किमान ५०० वर्षे तरी राष्ट्रवादाला मरण नाही’ असे भाकीत केले होते. परंतु आजच्या काळात तो रशिया वा चीनसारखा विस्तारवादी वा राक्षसी असला पाहिजे की भारतासारखा संयत असला पाहिजे हे ठरविण्याची आवश्यकता आहे. येथील हिंदु राष्ट्रवाद हा आक्रमक, प्रतिक्रियावादी नाही तर तो सर्वसमावेशक व सर्वाना पुढे घेऊन जाणारा आहे. ज्या काळात बॅ. जिना यांच्या नेतृत्वाखाली भारतातील मुस्लीम समाज भारतीय सांस्कृतिक राष्ट्रवादाला जीवघेणे आव्हान देत होता, त्या वेळी मुस्लिमांना उद्देशून सावरकर म्हणाले होते की, ‘याल तर तुमच्यासह, न याल तर तुमच्यावाचून आणि विरोध कराल तुमचा विरोध मोडून हे राष्ट्र पुढे जाईल.’ भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या पार्श्वभूमीवर स्वा. सावरकरांच्या विधानाची आज प्रचीती येत आहे.
ravisathe64@gmail.com