चौसष्टाव्या वर्षांतून ते येत्या २० जानेवारीला पासष्टीत पदार्पण करतील, पण चौसष्ट कलांचा स्वामी अशी त्यांची ओळख गेली चार दशके आहे.. मणिपुरी रंगभूमीची सांगड आधुनिक नाटय़कलेशी घालून नवा कलाप्रकारच म्हणावा असे दृश्यनाटय़ जन्माला घालणारे रतन थिय्याम हे जगभरच्या ज्येष्ठ नाटय़कर्मीपैकी एक म्हणून गणले जातात. ज्या संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार त्यांना चाळिशीत- ८७ सालीच मिळाला, त्या शिखरसंस्थेने पुढील २५ वर्षांतले त्यांचे काम पाहून त्यांना सर्वोच्च मानली जाणारी ‘फेलोशिप’ प्रदान करावी, हे उचितच होते. त्यांच्यासह आणखी दोघा- एन. राजम आणि टी. एच. विनायकराम या कर्नाटक संगीताच्या क्षेत्रातील ज्येष्ठांना हा मान मिळाला असला तरी सर्वपरिचित असेल ते थिय्याम यांचे नाव. हा परिचय त्यांनी स्वत मिळवला आहे. मणिपुरी नृत्य-कीर्तनाची परंपरा घरातच असल्याने बालपणीच ती शिकून, रतन यांनी चित्रकलेचे शिक्षण घेण्याचे ठरवले. मात्र, शिकतानाच त्यांना लिखाणाचीही गोडी लागली आणि त्यांची पहिली कादंबरी वयाच्या २२ व्या वर्षी प्रसिद्ध झाली. पुढे आणखी पाच कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या, पण आधुनिक नाटके पाहणे, त्यांचे मणिपुरी रूप कसे असेल याचे चिंतन करणे या ध्यासाने त्यांनी दिल्लीच्या राष्ट्रीय नाटय़ विद्यालयात प्रवेश घेतला आणि तेथून १९७४ साली पदवी मिळवल्यावर दोनच वर्षांत मणिपुरी शैलीने आधुनिक नाटके सादर करणारे नाटय़पथक- ‘कोरस रेपेर्टरी थिएटर’ स्थापन केले. क करण्याचे ठरवले. सुरुवातीला त्यांनी स्वतच लेखन, दिग्दर्शन आणि प्रकाशयोजनेपर्यंतच्या जबाबदाऱ्या निभावल्या. मात्र, मणिपूर आणि जग यांचे आदान-प्रदान आपल्याला हवे आहे हे जाणून त्यांनी अन्य भारतीय भाषांतील किंवा अगदी इब्सेन आणि ब्रेख्त अशा पाश्चात्य नाटककारांचीही नाटके मणिपुरी रंगभूमीवर आणली. संस्कृत नाटकाशी, म्हणजे भारतीय रंगभूमीच्या आद्यरूपाशी मणिपुरी रंगभूमीची नाळ जुळलेली होतीच. थिय्याम यांनीही संस्कृत नाटकांचा आधार घेतला आहे. पण ‘अंधा युग’ सारखे सामाजिक/ राजकीय आशयाचे नाटकही त्यांनी मणिपुरी रंगभूमीवर आणले. ‘राष्ट्रीय नाटय़ विद्यालया’चे संचालकपद त्यांच्याकडे १९८८मध्ये होते, पण ते सोडून स्वतच्या रंगभूमीवर थिय्याम अधिक रमले आणि आजही कार्यरत आहेत.

Story img Loader