ज्यास नेतृत्व करावयाचे आहे त्याने आपली कृती योग्य की अयोग्य इतकाच मर्यादित विचार करणे पुरेसे नसते. योग्यायोग्यतेच्या बौद्धिक निकषांच्या खेरीज त्याची कृती ह्रदयतेच्या कसोटीवरदेखील उतरावी लागते. मोदी यांना ते मंजूर नसावे. गुजरातच्या सीमा ओलांडून दिल्लीवर स्वार व्हावयाचे असेल तर त्यांना आपल्या चालचलनाचा विचार करावा लागेल.
नेतृत्वगुण सिद्ध करण्यासाठी केवळ करारीपणा, धडाडी आणि कार्यक्षमता यांच्याहीपेक्षा काही गुण आवश्यक असतात. त्यातील सर्वाधिक महत्त्वाचा म्हणजे सहृदयता. मूळ स्वभावात ती नसली तरी निदान ती आहे असे तरी दाखवणे समाजमनासाठी गरजेचे असते. नरेंद्र मोदी यांना ते माहीत नसावे वा असल्यास त्याची गरज वाटत नसावी. जो समाज विचार करताना बुद्धीपेक्षाही अधिक भावनेवर अवलंबून राहतो त्या समाजात या गुणाची गरज नितांत असते. त्याचमुळे अत्यंत पाश्चात्त्य जीवनशैली असलेले पं. जवाहरलाल नेहरू लहान मुलांना छायाचित्रासाठी का होईना अंगाखांद्यावर खेळवून चाचा नेहरू होतात. मोरारजी देसाई यांचे सरकार निर्बुद्धपणे हात धुऊन मागे लागल्यावर इंदिरा गांधी सामान्य महिलांच्या गळय़ात गळे घालून सहानुभूतीची लाट तयार करू शकतात आणि मुंबई जलप्रलयात सापडलेली असताना रस्त्यावर काय गंभीर परिस्थिती आहे हे पाहण्याचीदेखील तसदी न घेणारे विलासराव देशमुख जनतेला आपल्यापासून तुटलेले वाटतात. नेहरूंनी मुलांना अंगाखांद्यावर खेळवले नसते तरी काही बिघडले नसते. पण तरीही त्यांना ते करावेसे वाटले कारण असे केल्याने नेता सहृदयी आहे असा संदेश जनतेत जातो. वास्तविक विलासराव देशमुख मुंबईच्या रस्त्यावर पूर पाहण्यास आले असते तर परिस्थितीत लगेच सुधारणा झाली असती असे नव्हे. परंतु पावसात भिजलेला, छत्री सांभाळत कसाबसा तोल सावरत चाललेला मुख्यमंत्री जनतेसमोर आला असता तर आपल्या वेदना यास समजतात अशी भावना निर्माण होण्यास मदत झाली असती. दुसरे महायुद्ध संपत आलेले असताना आणि आपण जिंकणार हे स्पष्ट झालेले असतानाही अपंगावस्थेतील फ्रँकलिन रूझवेल्ट आपला लुळापांगळा देह सांभाळत देशोदेशी वणवण करीत होते ते काही गरज होती म्हणून नव्हे. तर अमेरिकेला तुमची काळजी आहे, असा संदेश पराभूत देशातील जनतेपर्यंत जावा ही भावना त्यामागे होती. त्याचमुळे दुसरे महायुद्ध जिंकूनदेखील अमेरिकेच्या विरोधात सार्वत्रिक नाराजी निर्माण झाली नाही. या तुलनेत अलीकडच्या काळातील जॉर्ज बुश यांच्या नेतृत्वाच्या मर्यादा जाणवू शकतील. ९/११ घडून अमेरिकेलाच दहशतवादाचा फटका बसलेला असताना त्या देशाबाबत सहानुभूती निर्माण होण्याऐवजी जगभर संताप निर्माण झाला त्याचे कारण अमेरिकेचे नेतृत्व सहवेदनेची भावना निर्माण करण्यास कमी पडले म्हणून. तेव्हा ज्यास नेतृत्व करावयाचे आहे त्याने आपली कृती योग्य की अयोग्य इतकाच मर्यादित विचार करणे पुरेसे नसते. योग्यायोग्यतेच्या बौद्धिक निकषांच्या खेरीज त्याची कृती हृदयतेच्या कसोटीवरदेखील उतरावी लागते. मोदी यांना ते मंजूर नसावे.
त्यांच्या आतापर्यंतच्या वागण्या आणि बोलण्यातून तरी हे प्रतीत होते. गुजरातेतील मुली या कुपोषित आहेत या निष्कर्षांवर प्रतिक्रिया व्यक्त करताना त्या आपल्या देहाबद्दल जास्त सजग आहेत, अशा प्रकारचे विधान मोदी यांनी केले होते. शहरांत भरपेट खाण्याची सोय झाल्यावर शरीरस्वास्थ्यासाठी लंघनाचा विचार करणाऱ्या उच्चभ्रू वर्गाबाबत असे बोलणे गैर नव्हे. परंतु मुद्दा या वर्गाबाबतचा नव्हता. हा वर्ग अतिपोषित असतो. कुपोषित नव्हे. मोदी यांचे भाष्य होते ते कुपोषितांबाबत. ते गैर होते. त्यांच्या न्यायाने इथियोपियातील समस्त भुकेकंगाल हे देहाबद्दलच्या सजगतेतून उपोषण करणारे आहेत, असे मानावयाचे काय? तेव्हा पंतप्रधानपदाची स्वप्ने पाहणाऱ्या एखाद्या नेत्याने असे उद्दाम विधान करणे हे त्याच्या मर्यादांची जाणीव करून देणारे असते. मोदी ती अनेकदा करून देतात. इस्लाम धर्मीयांच्या समारंभात त्यांनी त्या धर्मीयांची टोपी घालण्यासदेखील असाच नकार दिला होता. संघाच्या वा हिंदू धर्मीयांच्या कार्यक्रमांत अनेक जणांना तदनुषंगिक वस्त्रे वा फेटे आदी परिधान केले जातात. तेव्हा अशा सर्वाना संघाची वा हिंदू धर्मीयांची विचारधारा मान्य असते की काय? परंतु तरीही ते केले जाते कारण तो शुद्ध उपचार असतो. वस्तुत: ही प्रतीके ही सगळी वरवरच्या उपचाराचाच भाग असतात. त्यांचे महत्त्व तितकेच. अन्यथा संघाची दीक्षा घेतलेले अनेक जण असंघीय वर्तन करताना आढळले नसते. तेव्हा त्या इस्लाम धर्मीयांच्या समारंभात मोदी यांनी आयोजकांच्या विनंतीला मान देऊन त्यांच्या पद्धतीने डोके झाकले असते तर काही हिंदू धर्म बुडाला असता असे नव्हे. किंवा तसे केले असते तर मोदी यांच्या हिंदुहृदयसम्राट उपाधीला काही तडा गेला असता असेही नाही. तरीही इतका क्षुल्लक उपचार पाळण्यास मोदी यांनी नकार दिला. तसे केल्याने काही माथेफिरूंच्या मनात ते अधिकच वंदनीय झाले असतील. पण फक्त या मंडळींच्याच समर्थनावर आपण पंतप्रधानपदापर्यंत पोहोचू शकत नाही याची जाणीव त्यांना आहे काय? मोदी यांच्या ताज्या मुलाखतीने हा प्रश्न निर्माण होतो. आपण हिंदू राष्ट्रवादी आहोत, असे मोदी या मुलाखतीत म्हणाले. त्यात नवीन ते काय? त्यांच्या या विधानाची तुलना मूळचे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे यांच्या विधानाशी करता येईल. आपल्या अंगात सेनाप्रमुखांचे रक्त आहे आणि आपण मर्दाची अवलाद आहोत, असे उद्धव ठाकरे आपल्या सभांतून सांगतात. ते सांगण्याची मुळात गरजच काय? त्याचप्रमाणे आपण हिंदू राष्ट्रवादी आहोत, हे मोदी यांनी आवर्जून नमूद करण्याचे कारण काय? परंतु आपण हिंदू आहोत आणि इतरांच्या धर्माचाही आदर करतो असे त्यांनी म्हणणे ही काळाची गरज होती. या मुलाखतीने ती पूर्ण होत नाही. गुजरातेत २००२ साली जे काही झाले ते प्रत्यक्ष मी केले नाही, असेही मोदी म्हणाले. पण तसे कोणीच म्हणत नाही आणि तो प्रश्नही नाही. प्रश्न आहे तो जे झाले ते होऊ नये वा होत असताना रोखावे यासाठी मोदी यांनी काय केले, हा आहे. मोटारीखाली कुत्र्याचे पिल्लू आल्यावर आपले हृदय कसे कळवळते हे सांगणेही अप्रस्तुतच. हे त्यांचे विधान जितके दांभिक तितकेच विशिष्ट धर्मीयांची तुलना कुत्र्याच्या पिलाशी केली असा दावा करीत छात्या पिटणारे टीआरपिच्छुकही दांभिक. कुत्र्याचे पिल्लू मोटारीखाली जायबंदी झाल्यावर काय वाटते असे मोदी यांना विचारण्यात आले नव्हते. तेव्हा त्यांनी ते सांगण्याचीही काही गरज नव्हती. गुजरातेत जे काही झाले त्याबद्दल काय वाटते हा मूळ मुद्दा होता. तेव्हा त्याबद्दल आपणास खेद होतो, असे मोदी यांनी म्हणणे अपेक्षित होते. तेदेखील देशाच्या पंतप्रधानपदाचे स्वप्न ते पाहात आहेत म्हणून. त्या पदाची आस आणि आकांक्षा त्यांना नसतीच तर गुर्जरबांधवांच्या डाळढोकळय़ात आपल्या हिंदुहृदयसम्राटपदावर आणखी बराच काळ तरंगत राहण्यात त्यांना कोणताच प्रत्यवाय नव्हता.
परंतु गुजरातच्या सीमा ओलांडून दिल्लीवर स्वार व्हावयाचे असेल तर मोदी यांना आपल्या चालचलनाचा विचार करावा लागेल. मोठय़ा नेत्याने फक्त कणखरच असावे लागते हा गैरसमज आहे. कणखरांच्या कथित मर्दपणावर लोक भाळतात. पण ते दीर्घकाळ सांभाळायचे असतील तर मार्दवही लागते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा