आसारामसारख्या आध्यात्मिक अतिरेक्यांनी ठिकठिकाणी एकरोगणती जमिनींवर अतिक्रमण केले असल्याचे उघड झाल्याच्या बातम्या, जणू काही यापूर्वी कोणाला ठाऊकच नव्हते अशा थाटात प्रसिद्ध होत आहेत. अतिक्रमण केलेली जागा विरारची असो, नाशिकची असो की जोधपूरची. तेथील नगरपालिका, महानगरपालिका यांच्या समक्ष हे ‘पवित्र’ कृत्य झाले आहे आणि खोटय़ा आध्यात्मिक गुरूंनी ज्यांचा बुद्धिभ्रंश केला अशा अधिकाऱ्यांनी ‘मोक्ष प्राप्तीच्या’ अपेक्षेने लोटांगण घालून त्यांना त्या जागा ‘भूमिम् अर्पणमस्तु’ म्हणत सन्मानाने दिल्या आहेत, याबद्दल शाळकरी मुलाचेसुद्धा दुमत असणार नाही.
खरे तर ही आध्यात्मिक गुंडगिरीच आहे. वाहतुकीला अडचण होईल अशी रस्त्याच्या मधोमध शेंदूर लावलेल्या दगडाची तथाकथित धार्मिक स्थळे किंवा अतिक्रमणात असलेली आपली जागा बळकवण्याचा उपाय म्हणून पत्र्याच्या टपरीत वसवलेली तथाकथित देवालये हटवण्याचा प्रयत्न केला तर ‘धार्मिक भावना दुखावल्या’चा बोभाटा करून थेट आंदोलने करणारे भामटे असोत, एरवी कावळ्याच्या नजरेने मोकळ्या जागांच्या शोधात असलेले, पण आश्रमासाठी त्या जागांकडे काणाडोळा करणारे पुढारी असोत, बेहिशेबी संपत्ती आणि सोने-चांदी जमवलेल्या बाबाकडे दुर्लक्ष करणारे अधिकारी असोत की यौन शोषणासारखे गलिच्छ प्रकार समोर आल्यावरही त्याचे समर्थन करणारे तथाकथित भक्तगण असोत, हे सर्वच राष्ट्रद्रोही आध्यात्मिक दहशतवादी आहेत. दाऊद काय आणि भोंदू बाबा काय, दोघेही सारखेच ! देशातील कोटय़वधी आबालवृद्धांना (त्यात आजच्या आणि उद्याच्या युवकांची मोठी संख्या आहे) भक्तिमार्गाच्या नावाखाली कर्तृत्वहीन बनवणारे हे आध्यात्मिक आतंकवादी जास्त धोकादायक आहेत.
प्रफुल्ल चिकेरूर, नाशिक
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा