बारा वर्षांपूर्वी मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे गाडी चालवून पदपथावर झोपलेल्यांना चिरडून, एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी सलमान खानवरील सदोष मनुष्यवधाचा खटला नव्याने चालविण्यात येत आहे. खटल्याच्या सुनावणीच्या वेळी सलमान खानला आरोपीच्या िपजऱ्यात उभे करण्यात येते हे बातमीत समजते.
 पण हे समजत नाही की, त्याच्यावर मनुष्यवधाचा आरोप असताना त्याला मोकळे कसे राहता येते? त्याच्या जागी सामान्य माणूस असता तर त्यालाही सलमान खानप्रमाणे बाहेर राहता आले असते का? कोणी तरी कायदेशीर माहिती देईल का?
– मनोहर तारे, पुणे.

कुडमुडेच समाजापुढे येतात, हे ज्योतिषशास्त्राचे दुर्दैव!
प्रा. य. ना. वालावलकर यांच्या ‘आत्मप्रतारणा आता तरी थांबवा’ या पत्राच्या (लोकमानस, २० मे) अनुषंगाने अधिक सांगावेसे वाटते.
गणितासोबतच तर्क आणि अनुभूतीच्या आधारावर ज्योतिषशास्त्र तयार झाले असून, अनेक वर्षे त्याचा ध्यासाने अभ्यास केला तर हाती काही गवसते. मात्र बहुसंख्य लोक हे या शास्त्राचा अर्धवट अभ्यास करून, प्रसिद्धीपोटी नको ती भाकिते करतात. वास्तविक अत्यंत कळकळीचा प्रश्न नसेल, प्रश्न प्रश्नकर्त्यांसंदर्भातच नसेल, ज्याची कुंडली आपण पाहात आहोत त्या व्यक्तीला आपण केलेल्या मार्गदर्शनाचा काहीही फायदा होणार नसेल, तर भाकीत मुळीच वर्तवू नये, हा या शास्त्राचा मूलभूत नियम आहे.
मात्र बहुतेक ‘ज्योतिषी’ म्हणवणारे लोक याकडे काणाडोळा करतात. याच हव्यासी व्यक्तीमुळे या शास्त्रात आज शांती, रत्ने, गंडे अशा मूलत: शास्त्रबाह्य गोष्टी शिरल्या आहेत.
अनेक वर्षे केवळ व्यासंग म्हणून केलेल्या अभ्यासाधारे मी ठामपणे सांगतो की या शास्त्रात तथ्य तर आहेच, मात्र नि:स्वार्थी हेतूने अभ्यास केलेले व संख्येने अत्यल्प असणारे खरे अभ्यासक जिथे प्रत्येक ग्रहस्थितीच्या अनेक कुंडल्या गोळा करून, अभ्यास करून निष्कर्ष काढतात व भाकिताचे नियम हाती गवसले तरी मुळीच अकारण, ऊठसूट भविष्ये सांगत सुटत नाही, तिथे कुडमुडे ज्योतिषी हव्यासापोटी कोणी विचारण्याचा अवकाश की बरळत सुटतात, ही वस्तुस्थिती त्रासदायक आहे.
समाजापुढे नेमके हेच कुडमुडे ज्योतिषी येतात व परिणामी हे जे बोलतात तेच खरे ज्योतिषशास्त्र अशी समाजाची धारणा झाली आहे व खरे शास्त्र समाजापासून दूर राहिले आहे.
हे शास्त्र कुणी शिकावे, हे ठरविणारी स्वायत्त संस्था नाही. कुणीही येतो, अत्यंत जुजबी माहितीच्या आधारे सुटतो भविष्यकथन करत! बुद्धी, तर्कशास्त्र व ‘हे शास्त्र कुणी शिकावे’ यावर आज बंधन न राहिल्यामुळे जो स्वार्थी, हव्यासी माणसांचा गोतावळा निर्माण झाला आहे आणि त्यामुळे जे नको ते आचरण या शास्त्राच्या नावे घडत आहे, ते या शास्त्राचे दुर्दैव म्हणावे लागेल.
वरदविनायक खांबेटे

इंग्लंड-पर्यटन इच्छुकांची फसवणूक!   
गेल्या काही वर्षांपासून अमेरिकन वकिलाती प्रमाणे इंग्लंडच्या (युनायटेड किंग्डम) वकिलातीनेही त्यांच्याकडे आलेले ‘पर्यटन-व्हिसा’साठीचे अर्ज सर्रास नाकारण्याचे धोरण स्वीकारलेले आहे, परिणामी पर्यटकांना दहा ते बारा हजारांचे नुकसान सोसावे लागते. वास्तविक ही बाब पर्यटन कंपन्यांना चांगली माहीत असते तरीदेखील त्या पर्यटकांना अजिबात कल्पना देत नाहीत व प्रवाशांकडून अगोदरच तीन-तीन महिने सहलीचे संपूर्ण पसे वसूल करून घेतात. व्हिसा नाकारला गेला आणि पर्यटकाने पसे परत मागितले तर सíव्हस चार्ज, इत्यादीच्या नावाखाली अवाच्यासवा पसे लावून पर्यटकांना फसवतात, इतकेच काय पण भरलेले पसेही महिनोनमहिने परत करीत नाहीत.
 अशा परिस्थितीत ज्या सहलीमध्ये इंग्लंडचा समावेश असेल तिचे पसे संपूर्ण न देता फक्त व्हीसाचेच पसे द्यावेत व व्हिसा मिळाल्यावरच बाकीचे पसे द्यावेत म्हणजे व्हिसा मिळाला नाही तर आपली मोठी रक्कम गुंतून पडणार नाही. खरं तर अशा परिस्थितीत पर्यटन कंपन्यांनी निषेध म्हणून इंग्लंड देशाचा समावेश आपल्या सहलीत न केल्यास वकिलातीला ताळ्यावर आणता येईल, पण त्या तसे करीत नाहीत. कारण व्हिसा नाकारला गेला तरी त्यासाठीचे भरमसाठ चार्ज लावून आपलं उखळ पांढरं करण्याची संधी त्यांना मिळते. ठाण्यामधल्या एका प्रसिद्ध पर्यटन कंपनीने तेच केले आहे. ठाणे शहरातील पोलिसांकडे मध्ये तशी एक तक्रारही नोंदविण्यात आली आहे, त्यामुळे परदेशी जाणाऱ्या पर्यटकांनी सावध असावे.
चंद्रसेन टिळेकर, अंधेरी (पूर्व)

विनाशकाले विपरीत बुद्धी    
गेल्या वर्षी तीन राज्यांत सोनिया गांधी अध्यक्ष आणि राहुल उपाध्यक्ष असलेल्या कँाग्रेस पक्षाला पूर्णपणे अपयश आले. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत तर या पक्षाची पूर्णतया वाताहत झाली. एकाही राज्यात दोन आकडी संख्येच्या पुढे खासदार निवडून आणता आले नाहीत. तरीसुद्धा काँग्रेस पक्षाला प्रामाणिकपणे आत्मनिरीक्षण करून लवकरच दोन राज्यांत येणाऱ्या निवडणुकीसमोर जाण्याची बुद्धी होत नाही, राहुल गांधींना बाजूला सारता येत नाही आणि भ्रष्टाचाऱ्यांनाही टाळता येत नाही. याला म्हणतात विनाशकाले विपरीत बुद्धी!
श्रीराम गुलगुंद, चारकोप (मुंबई).

आठवले गटाची दुरवस्था इथेही कायम?
‘विजयोन्मादात रिपाइंचा विसर?’ या पत्रातून (लोकमानस, २० मे) व्यक्त झालेली व्यथा अगदी रास्त आहे. जेटली व स्मृती इराणी अशा पराभूत उमेदवारांची व्यवस्था सन्मानाने केली जाऊ शकते, अडगळीतील नेत्यांना राज्यपाल पदे दिली जातील. तर मग महायुतीसाठी राबणाऱ्या रि.पा.इं.(आठवले गट) साठी दिल्लीस मोदींपुढे साकडे घालण्याचे शिवसेना का टाळत आहे? रि.पा.इं. व त्यांच्या नेत्यांच्या दुरवस्थेची कथा फक्त मागील पानावरून पुढील पानावर सरकत राहाणार काय?
प्रदीप खांडेकर, माहीम(मुंबई).

आता संघपरिवाराबद्दलचा बुद्धिभेद उघड व्हावा!
देशातील जनतेने नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपला संपूर्ण बहुमत दिल्याने तथाकथित बुद्धिजीवी वर्गात प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. त्यांचा पारंपरिक समज असा की देशातील जनता कधीही संघपरिवाराच्या पाठीशी पूर्ण बहुमताने उभी राहणार नाही. काही खासगी वाहिन्यांवरील संपादक तर भाजपला अजून पन्नास वर्षे तरी स्वबळावर सत्ता मिळू शकत नाही असा कंठशोष करत होते. लोकसभेचे निकाल बघून त्यांच्या घशाला कोरड पडली आहे. भाजप सरकारने आपली सर्वसमावेशक आणि राष्ट्राला प्राधान्य देणारी धोरणे राबवायला सुरुवात केल्यावर आपण आपले नेहमीचे पठडीतले आरोप करू शकणार नाही हे खरे या तथाकथित बुद्धिजीवी वर्गाचे दुखणे आहे.
मला असे वाटते की, पुढील पाच वर्षांत संघपरिवारातील संघटनांचे कामकाज कसे चालते हे लोकांसमोर येईल आणि आजपर्यंत या तथाकथित बुद्धिजीवी पंडितांनी परिवाराबद्दल कसा बुद्धिभेद पसरवला होता याचा अनुभव लोकांना येईल.
उमेश मुंडले, वसई.

गुन्हेगारी आरोप असणाऱ्यांची सभा
नुकत्याच पार पडलेल्या सोळाव्या लोकसभा निवडणुकीद्वारे लोकसभेत फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेले १८६ खासदार निवडून आले आहेत. हे प्रमाण एकूण संख्येच्या ३४ टक्के इतके भरते. यंदा अशा कलंकितांमध्ये भाजपचे सर्वाधिक ९८ खासदार आहेत. काँग्रेसचे आठ खासदार असून शिवसेनेच्या १८ पकी १५ खासदारांवर कोणत्या ना कोणत्या स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे गुन्हेगारी आरोप असणाऱ्यांची सभा असे संसदेतील या महत्त्वाच्या सभागृहाला यंदा म्हटले गेल्यास नवल ते काय?
आत्माराम जोशी

Story img Loader