‘अ पार्टी विथ डिफरन्स’ असे घोषवाक्य असणाऱ्या भारतीय जनता पक्षाचा अगदी थोडाफार, उरलासुरलेला ‘डिफरन्स’देखील जशी निवडणूक जवळ येत आहे तसतसा तो फारच वेगाने नष्ट होत आहे. कदाचित नुकत्याच मिळालेल्या वारेमाप विजयापुढे त्यांना आता नतिक मूल्ये व संस्कृती वगरे तद्दन भंपक गोष्टी वाटू लागल्या असाव्यात, म्हणूनच एरवी भ्रष्टाचारात अखंड बुडालेले लोक आता भाजपमध्ये येऊन पवित्र होत आहेत. पुढील काळात त्यांच्यावरील ‘आरोप राजकीय हेतूने प्रेरित होते,’ असेही शहाजोगपणे म्हणण्याचा काँग्रेसी कोडगेपणा यांनी अंगात पुरेपूर घेतला आहेच. आता अशा आयारामांमुळे सत्ता मिळालीही तरी त्यांच्या कारभारात व सध्याच्या काँग्रेसी कारभारात काय फरक असणार?
भाजप हा जर बाकीच्या राजकीय पक्षांप्रमाणे असता तर या बाजारूपणाची दखल घेण्याची गरज नव्हती; परंतु एरवी सगळ्या देशप्रेमाचा व देशभक्तीचा ठेका घेतलेले आम्हीच अशा रा. स्व. संघाचे हे अपत्य. त्यामुळे एरवी सल्लामसलत करणाऱ्या संघाच्या विशेष ‘वैद्यांनी’देखील काही मात्रा या अपत्यास दिलेली ऐकिवात नाही. तसेच या पाठशाळेचे प्रमुख भागवताचार्य यांनाही कदाचित बदलत्या वाऱ्याप्रमाणे प्रामाणिकपणा व नतिक मूल्यांपेक्षा कोठल्याही मार्गाने का असेना, पण सत्ताच महत्त्वाची असे वाटू लागले असावे.
हृषीकेश वराडकर, नाशिक
वैयक्तिक बाबीला प्रसिद्धी देऊन काय साधणार?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्याचे पडसाद सर्वत्र उमटत आहेत. जागतिक मीडियाने या बातमीची दखल घेतली आहे.. पण बातम्या कुठल्या व्हाव्यात आणि जनतेने त्यातून काय घ्यावे, हा कळीचा मुद्दा आहे. काल-परवा काही वाहिन्या-वृत्तपत्रे तर (‘लोकसत्ता’अपवाद!) एक बातमी पोहोचवत होते, ते म्हणजे ‘नवरात्रीमुळे पंतप्रधानांचा उपवास- त्यांनी काहीही खाल्ले नाही, केवळ फलरस घेतला’. विशेष म्हणजे हे वृत्तांकन पंतप्रधान कार्यालयातून देण्यात आले होते.. ही वैयक्तिक व सामान्य बाब असली तरी नेत्यांकडून जनतेला केवळ भावनिक संदेश जाण्यापेक्षा जर आपण विज्ञान-तंत्रज्ञान-प्रगती यांच्या गप्पा मारत असू तर तो संदेशही त्याला साजेसा असावा..
रामानुजन नावाचे थोर गणिती केवळ इंग्लंडमध्ये थंड पाण्याने आंघोळ करण्याच्या अट्टहासामुळे न्यूमोनिया होऊन अकाली गेले, पहिल्या महिला डॉक्टर आनंदी जोशी आहारात योग्य बदल न केल्याने अकाली गेल्या. तेव्हा धावपळ-दगदग, त्यात उपवास त्यामुळे हायपोग्लायसेमिया-चक्कर या शक्यता बघता आणि पंतप्रधानांचे वय लक्षात घेता त्यांनी उपवासाचा हट्ट- ते कितीही निरोगी असले तरी- ते जर खरोखरच विज्ञानाची कास धरत असले तर सोडला पाहिजे. त्यांची काळजी घेणारे वैद्यकीय पथक कदाचित सोबत असावे; पण त्यांना कदाचित पंतप्रधानांना भावनिक-धार्मिक बाबी आड येतील असा सल्ला देणे जड जात असावे.प्रश्न केवळ राजकारण-संदेश-आरोग्य-भावना यांचा नाही, तर हकनाक गोष्टींसाठी हट्ट धरण्याचा आहे. ज्या देशात देवीला नऊ दिवस वर्षांचे बारा महिने पुजले जाते त्या देशात महिलांवर सर्वात जास्त अत्याचार होतात हे कटू वास्तवही आपण स्वीकारले पाहिजे. परिस्थितीमुळे अनेकांना सक्तीचा उपवास घडतो याकडे डोळसपणे बघितले पाहिजे. शेवटी कोण काय करते, कुणाला कुठला संदेश द्यायचा, यापेक्षा सर्वसामान्य जनतेने त्यातून काय धडा घ्यावा हे महत्त्वाचे! – डॉ. प्रज्ञावंत देवळेकर, पुणे</strong>
पंतप्रधानांच्या ‘सफाई मोहिमे’तील फसवेपण..
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशानुसार येत्या २ ऑक्टोबरला ‘राष्ट्रव्यापी सफाई मोहीम’ हाती घेण्यात येत आहे. त्या दिवशी सर्व नेतेमंडळी रस्त्यावर उतरून झाडू हातात घेऊन वृत्तपत्रे आणि टीव्हीसाठी पोझ देणार. अशा प्रदर्शनीय गोष्टी इथल्या राज्यकर्त्यांना आणि जनतेला नेहमीच आवडत आल्या आहेत. मुंबईच्या महापौरांनी अनेकदा हे फार्स केले आहेत आणि वृत्तपत्रांनी टिंगलवजा शेरेबाजीसह ते छापले आहेत.
यांना फार्स म्हणणे काही लोकांना आवडणार नाही; पण कचरा पेटीत टाकायचा, इतरत्र नाही, हे तारतम्य असलेल्यांना अशा दिखाऊ मोहिमांची गरज भासत नाही. ज्यांना हे तारतम्य नाही त्यांच्यासाठी कितीही मोहिमा हाती घ्या, काही उपयोग नाही. ते रस्त्यात घाण फेकणार, फुटपाथवर थुंकणार, िभतीवर लघुशंका करणार. या बेजबाबदार नागरिकांत सुशिक्षित मोठय़ा प्रमाणावर आहेत. त्यापकी काही २ ऑक्टोबरच्या ‘शो’मध्ये आपल्याला पाहायला मिळतील.
जबर दंड आणि त्या शिक्षेची प्रामाणिक अंमलबजावणी हाच यावर खरा उपाय आहे.
अंधपणे पंतप्रधानांच्या कोणत्याही मोहिमेचे कौतुक करायची वृत्ती सध्या फोफावली आहे. विरोधी सूर लावणे, पंतप्रधानांच्या योजनेतील फसवेपण किंवा अव्यावहारिकता दाखवून देणे हा देशद्रोहासारखा गंभीर गुन्हा मानला जाऊ लागला आहे. परिणामी विचारमंथनाची प्रक्रिया आपल्या समाजातून लोप पावत चालली आहे.
अवधूत परळकर, माहीम (मुंबई)
शास्त्र ग्रह-योगांचे की अंत:प्रवृत्तीचे?
‘ज्योतिष वा अध्यात्म हवे, पण भीतीपायी नव्हे’ हे पत्र (लोकमानस, २६ सप्टें.) वाचले. ‘ज्योतिष हे शास्त्र नसले तरी तो एक विद्येचा विषय असल्यामुळे त्याचा अभ्यास व सखोल संशोधन होणे ही गरज आहे’ असे त्यात म्हटले आहे.
ज्योतिष हे शास्त्र आहे की नाही या वादात मी पडत नाही. मी स्वत: ज्योतिषाचा थोडा अभ्यास केला असल्याने सांगू शकतो की, पत्रिकेतल्या ग्रहस्थितीवरून माणसाच्या अंत:प्रवृत्ती त्याला कोणत्या भविष्याकडे नेण्याची शक्यता आहे हे समजतं. ते ‘अटळ’ नसते. त्याची पूर्वकल्पना असेल तर योग्य ते उपाय करून विचारशक्तीवरचा घातक अंत:प्रवृत्तींचा प्रभाव (तात्पुरता तरी) बाजूला करता येतो आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करणे माणसाला शक्य होते, असे माझे निरीक्षण आहे.
याबाबत संशोधन करायचे असेल तर प्रत्येक ज्योतिषाने आपल्याकडे सल्ल्यासाठी येणाऱ्यांच्या समस्यांची, त्यांच्या पत्रिकेतील ग्रहस्थितीची, त्यावरून केलेल्या निदानाची, उपायांची व यशस्वितेची नोंद ठेवावी. अयशस्वी प्रकरणांचे पुनरावलोकन करून आपल्या पद्धतीत बदल करावेत.
आणखी एका दिशेनेही संशोधन करणे शक्य आहे. मध्यंतरी कार व ट्रक यांच्या टकरीत झालेल्या अपघातात एक पूर्ण कुटुंब मृत्युमुखी पडले. त्या सर्वाच्या पत्रिकेत एकाच वेळी मृत्युयोग होता का? विमान अपघातात एकाच वेळी शेकडो माणसे मरतात. त्यांच्याही सगळ्यांच्या पत्रिकेत मृत्युयोग एकाच वेळी असतो का? मृत्यू पावलेल्यांच्या पत्रिका पाहून ग्रहस्थिती व भविष्यातली घटना यांच्यात खरोखरच काही कार्यकारण संबंध आहे का हे समजेल व त्यावरून ज्योतिष हे शास्त्र आहे की नाही याचे उत्तरही सापडेल.
अरुण कोर्डे, ठाणे</strong>
अविवेकी व्यक्तिपूजा
‘निर्बुद्धपणाची साथ’ हा ‘अन्वयार्थ’ (३० सप्टेंबर) वाचला आणि आजच्या माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात एका महाभ्रष्ट राजकारणी व्यक्तीसाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या निर्बुद्ध भारतीय विचारांचीही कीव आली. पूर्वीच्या काळी आपला राजा मृत्यू पावल्यावर त्याच्यावरील निष्ठेपोटी वा प्रेमापोटी बलिदान करणाऱ्या जनतेच्या गोष्टी आपण वाचल्या असतील; पण आजच्या आधुनिक युगात ज्या नेत्याने समाजातील गरीब, कष्टकरी जनतेच्या कष्टाच्या कमाईतूनच साकारलेल्या सरकारी तिजोरीची अमाप लूट केली, त्या भ्रष्ट नेत्यासाठीही आत्महत्या होतात, हा भारतात असणाऱ्या अंदाधुंद व अविवेकी व्यक्तिपूजेचा दाखलाच आहे.
आता तरी लोकांनी डोळसपणे या गोष्टीकडे पाहून जुन्या सवयी सोडल्या पाहिजेत, त्याशिवाय अशा व्यक्तिपूजक नेत्याचे चारित्र्य व राजकारण शुद्ध होणार नाही.
संदीप श्री. कुंभार, राहुरी (अहमदनगर)
‘फाइल’भरू शिक्षण!
‘कागदी घोडे रंगवण्याच्या ओझ्याने शाळा दमल्या’ ही बातमी (लोकसत्ता, २९ सप्टें.) वाचली. आज शिक्षकांची अवस्था अशी झाली आहे की, एकीकडे निरागस बालके गुरुजी काही तरी शिकवतील या आशेने येऊन बसतात, तर गुरुजींना कागदातून डोके काढायला वेळ नाही. कितीही प्रामाणिक शिक्षक का असेना, त्याला शिकवण्यासाठी उसंत मिळेल तर तो काम करेल! तपासणारे अधिकारीही मुलांची प्रगती न बघता कागदाच्या फायली किती भरल्या आणि किती उत्कृष्ट रंगवल्या यावरच कीस पाडणार. हे सर्व करून जरा कुठे वेळ मिळाला, की १९ प्रकारची अन्य अशैक्षणिक कामे आहेच दिमतीला, वरून विचारता ‘जिल्हा परिषद शाळेत गुणवत्ता का नाही?’
– दि. ग. महाले.