* ‘‘कसेही’ करून आपला पक्ष राजकारणाच्या केंद्रस्थानी राहील याची पुरेशी तजवीज या पक्षाच्या ‘जाणत्या राजा’ने अगोदरच करून ठेवली आहे. पण दीर्घकाळात तेच धोरण ‘योग्य’ असल्याचे सिद्ध होऊ लागते’, (साहेबांचे ‘धोरण’- अन्वयार्थ, २८ ऑक्टो.) असे पुनर्वचिाराच्या (=तत्त्वशून्य कोलांटउडय़ांच्या) राजकारणाचे कवतिक करताना,
* ‘नेत्यांच्या मनातील तात्त्विक मृगजळास पूर आल्यामुळे जनतेच्या मनातून करपून चाललेला डाव्यांचा अंकुर फुलणार नाही, याचे भान करात वा येचुरी यांना असल्यास अधिक बरे’ (मृगजळास येई पूर.. : अग्रलेख, २८ ऑक्टो.) या शब्दांत धोरणांच्या पुनर्वचिारावर मात्र टीका केली आहे.
एकाच दिवशी, एकाच आवृत्तीत परस्परविरोधी – (न जे प्रिय सदोष ते, प्रिय सदोषही चांगले – अशी )भूमिका घेतली आहे.
‘राजकीय वास्तव हे डाव्यांच्या हाताबाहेर जाताना दिसते. भाजपचा उदय आणि त्यास खतपाणी घालणारा वाढता मध्यमवर्ग यामुळे डावे हे कालबाह्य़ ठरत असून..’ ही अग्रलेखातील टिप्पणी शरद पवार यांनी आजवर बऱ्याच वेळा बोलून दाखविलेल्या ‘धोरणांना’ तेवढीच लागू पडते.
उजव्या शक्तींचा प्रभाव वाढत आहे हे सत्यच आहे, आणि मोठय़ा समुदायाच्या मानसिकतेत असा बदल होण्यामागची कारणे शोधणे आवश्यक आहे.
प्रश्न असा आहे की उजवे नसणाऱ्या पक्षांनी किमान आणि तातडीने आवश्यक असलेल्या कार्यक्रमासाठी अंदाजे ३० टक्के मते मिळविणाऱ्या सत्ताधीशांच्या विरोधात एकत्र यावे? की त्यांना बिनशर्त शरण जावे? अर्थात पुरोगामी राजकारणाला कायमस्वरूपी विराम मिळाला आहे असा हताशपणा आला असेल तर भाग वेगळा. परंतु उजव्या शक्तींच्या वाढत्या अपेक्षा मोदी सरकार बऱ्याच प्रमाणात पुऱ्या करीत आहे असे अजून तरी दिसत नाही.
वाजपेयी सरकारने समोर टाकलेली पदे पटकावण्याचा अनुभव असल्यामुळे पवार यांनी दुसरा पर्याय स्वीकारला असावा. लोककल्याणाचे राजकारण पुढे जात आहे किंवा नाही, याचा विचार न करता, परिस्थितीला निमूटपणे शरण जाणे एवढीच जाण ‘जाणत्या राजा’ने दाखविली आहे असे दिसते.
डॉ. राजीव जोशी, बेंगळुरू.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा