गोपीनाथ मुंडे विद्यार्थिदशेपासूनच राजकारणातील बाळकडू प्यायले. भाजपची सत्ता असो अथवा नसो, मुंडेंचा वैचारिक पाया भक्कम होता. ओबीसी नेतृत्व असल्यामुळे त्यांची भारतीय जनता पक्षात घुसमट होतेय, अशा आशयाच्या बातम्याही अधूनमधून येत. गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये जाणार, अशा वावडय़ा उडविल्या गेल्या; परंतु ते अखेपर्यंत निष्ठेने भाजपमध्ये राहिले. केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर राष्ट्रीय राजकारणातही ते ओबीसी समाजाचे प्रतिनिधी ठरले होते. ओबीसी आरक्षणावरून पक्षाशी मतभेद असूनसुद्धा त्यांनी या मुद्दय़ावरून भक्कम बाजू पक्षात मांडली. ओबीसींच्या आरक्षण कोटय़ातून मराठय़ांना आरक्षण देण्यास त्यांचा अखेपर्यंत विरोध होता.
त्यांना राजकारणातून संपवण्याचा अनेकदा प्रयत्न झाला, पण मुरब्बी राजकारणी असल्यामुळे ते मोठमोठय़ा नेत्यांना पुरून उरले. भाजपच्या कट्टर हिंदुत्वाच्या चौकटीत त्यांनी स्वत:ला कधी बंदिस्त करून घेतले नाही. त्यामुळे त्यांच्यावर निष्ठेने जीव ओवाळून टाकणारा वर्ग ओबीसी, दलित, मुस्लीम, शेतकरी, कामगार असा सगळ्या स्तरांतून होता. त्यांचे नाव अनेक घटनांमध्ये गोवले गेले, परंतु सहीसलामत ते तारून निघाले.
ग्रामीण राजकारण, आमदार, राज्याचे उपमुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेते, खासदार ते लोकसभेतील उपनेतेपद असा लांबलचक, दीर्घ व यशस्वी राजकीय प्रवास करणारे गोपीनाथ मुंडे खिलाडू वृत्तीने राजकारण करीत. केंद्रीय ग्रामविकास मंत्री पदावर वर्णी लागल्यामुळे त्यांच्याकडून महाराष्ट्राला आणि देशालाही बऱ्याच अपेक्षा होत्या. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनामुळे महाराष्ट्रातील जनताच नव्हे, तर देशातील जनताही अभ्यासू लोकमान्य नेत्याला मुकली आहे.
सुजित ठमके, पुणे

गड आला पण सिंह गेला!
केंद्रीय ग्रामविकास मंत्री आणि आमच्या जिल्ह्याचे खासदार गोपीनाथ मुंडे यांच्या विजयी मेळाव्याचे थेट ‘अंतिम संस्कारात’ रूपांतर व्हावे हा किती दुर्दैवी योगायोग म्हणायला हवा. हा धक्का देश आणि भाजपसाठी जितका धक्कादायक आहे त्यापेक्षा कितीतरी पटीने मराठवाडय़ाचे नुकसान करणारा आहे. गेल्या ४० वर्षांच्या अथक परिश्रमानंतर मुंडे यांना आपल्या परिश्रमाची पावती केंद्रीय मंत्री पदाच्या रूपाने मिळालेली होती. मराठवाडय़ाला त्यांच्याकडून खूप अपेक्षा होत्या. या लोकनेत्याच्या जाण्यामुळे पुन्हा एकदा मराठवाडा दोन दशकांनी मागे राहणार असे दिसते.
मराठवाडय़ाला मागासपणाचा ‘शापच’ चिकटलेला दिसतो. विलासराव देशमुख, प्रमोद महाजन असोत किंवा आता मुंडे, या तिघांच्या आकस्मिक जाण्याने हेच अधोरेखित होताना दिसते. लोकसभा निवडणुकीत सर्व बाजूंनी विरोध होत असताना मुंडे यांनी विजयश्री खेचून आणली होती. त्यामुळे आजच्या त्यांच्या आकस्मिक अपघाती मृत्यूमुळे बीड जिल्हावासीयांची भावना ‘गड आला पण सिंह गेला!’ अशी झाली असणार हे निश्चित.
पक्षी कितीही उंच उडाला तरी त्याचे लक्ष नेहमीच घराकडे असते हा नसíगक नियम या अनुषंगानेच संपूर्ण महाराष्ट्राबरोबरच मराठवाडय़ाला मुंडे यांच्याकडून मोठय़ाअपेक्षा होत्या. त्या पूर्ण होतील अशी खात्री असल्यामुळेच जनतेने त्यांच्यावर विश्वास दाखविला होता. त्यांचे आकस्मिक जाणे म्हणजे अथक परिश्रमातून उभ्या केलेल्या मंदिरातील मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होतानाच दुर्दैवाने मूर्तिभंग होण्यासारखे होय.
सुधीर ल. दाणी, बेलापूर  (मूळ गाव : किन्ही काकद्याची, ता.आष्टी, बीड)

विरोधी पक्षाचा चेहरा
आज महाराष्ट्राने एक झुंजार लोकनेता अकाली आणि अपघाती गमावला .. गेल्या १४ वर्षांत महाराष्ट्रात विरोधी पक्ष जवळजवळ गरहजरच असल्याप्रमाणे नाममात्र दिसत होता (केंद्रात तर गेल्या १० वर्षांत विरोधी पक्षाचे दर्शनच दुर्लभ होते). गोपीनाथ हा एकच चेहरा महाराष्ट्रात होता की जो विरोधी पक्ष वाटत असे. तोही गेला!
आनंद वि. पटवर्धन, मुलुंड

..यातून नियतीला काय इशारा द्यायचा आहे?
गोपीनाथ मुंडे काळाच्या पडद्याआड गेले. प्रमोद महाजन, विलासराव देशमुख आणि मुंडे हे तिघेही जिवलग मित्र एकानंतर एक गेले. नियतीला यातून काही इशारा द्यायचा आहे का, काही कळण्यास मार्ग नाही.
मुंडे सर्व समाजाला बरोबर घेऊन चालत होते, हीच बाब नियतीला खुपली असणार. पाशा पटेलांबरोबर शेतीचे आंदोलन असो की उपमुख्यमंत्री असताना दाऊदला मुसक्या बांधून (फरफटत!) आणण्याची कणखर भाषा असो, हे मुंडेच करू शकत होते. त्यांच्या जाण्याने इतर मागासवर्गीयांचा वालीच गेला आहे, असे मानण्यास नियतीने भाग पाडले आहे.
सतीश एस. कऱ्हाडे, देगलूर (नांदेड)

अनाकलनीय मृत्यूनंतर उरलेली प्रश्नचिन्हे..
गोपीनाथ मुंडे यांचा मृत्यू हा चटका लावून जाणारा आहेच, पण अनाकलनीयही आहे आणि पुन्हा एकदा मंत्र्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा आहे. हा घातपात आहे की अपघात याचीही सखोल चौकशी व्हायला पाहिजे. बाहेर पडताना केंद्रीय मंत्र्यांना असलेली सुरक्षा मुंडे यांनी घेतली नव्हती का? एक गाडी थेट मंत्र्यांच्या गाडीला धडक देते याच अर्थ काय? त्यांनी पुरेशी सुरक्षा का घेतली नाही?
गोपीनाथ मुंडे यांचे काळाने हिरावून घेतलेले व्यक्तिमत्त्व महाराष्ट्राला परत मिळणार नाही ही खंत महाराष्ट्राला सतत सतावत राहील.
अनिरुद्ध गणेश बर्वे, कल्याण</strong>

म्हणणं ऐकून घेण्याची संस्कृती!
सत्यकथा मासिकात पहिल्यांदा लिहिलं त्याला आता एकेचाळीस र्वष झाली. जे सुचेल ते लिहून पाठवलं होतं. कोणाची ओळखदेख नव्हती. या मासिकाच्या संपादकांबद्दल-  म्हणजे श्री. पु. भागवत आणि राम पटवर्धन यांच्याबद्दल -अनेक दंतकथा बाहेर प्रसिद्ध होत्या. त्यामुळे एक भीतीयुक्त दरारा होता. सत्यकथेतलं साहित्य मात्र वाचतअसे.  लोकप्रिय साहित्यापेक्षा  काहीतरी वेगळं इथे दिसत होतं.  सत्यकथेने जर काळाची पावलं ओळखली नाहीत तर तिचा अस्त कसा अटळ आहे असा सूर  मी पाठवलेल्या लेखात होता. त्यामुळे लेख प्रसिद्ध होईल अशी आशाच नव्हती. पण अचानक एक दिवस लेख स्वीकारल्याचं  संपादकाचं पत्र आलं आणि मला आश्चर्याचा धक्का बसला. आपल्या मनासारखं होई पर्यंत लेखकाकडून साहित्य पुन्हा पुन्हा लिहून घेण्याबद्दल सत्यकथेची प्रसिद्धी होती. पण एक अक्षरही न बदलता त्यांनी मजकूर छापला. त्यानंतर केव्हातरी पहिल्यांदा मौजेचं कार्यालय पाहिलं आणि राम पटवर्धनांची ओळख झाली. या लेखावर नंतर खुद्द सत्यकथेतच आणखी चर्चाही रामभाऊनी घडवून आणली.
१९७० चं दशक हे अस्वस्थतेचं होतं. दलित साहित्य, डावं साहित्य, लघु (अ/)नियतकालिकांची चळवळ असे अनेक प्रवाह साहित्यात पुढे येत होते. त्यांचं आणि सत्यकथेचं जमत होतं असं नाही. सत्यकथेवर साहित्यातलं प्रस्थापित असण्याचा आरोप होता आणि तो मुळीच गरलागू नव्हता. पण गमतीची गोष्ट म्हणजे या सर्वाचं म्हणणं ऐकून घेण्याची संस्कृती रामभाऊ पटवर्धनांजवळ होती. त्यामुळे अशा मंडळींचंसुद्धा साहित्य अनेकदा सत्यकथेत पाहायला मिळे. त्यात कप्पेबंदपणा नव्हता.  मौज-सत्यकथेचं कार्यालय म्हणजे लेखन करणाऱ्यांचा एक महत्त्वाचा अड्डा होता .. तिथे अनेक चर्चा आणि वादविवाद झडत असत आणि त्यातून आपल्याला पुढचा मजकूर कसा मिळेल ते रामभाऊ नेमकेपणाने हेरत असत. लेखक लिहिण्याला उद्युक्त होईल अशा तऱ्हेने त्यांचे वाद असत. त्यातून नवीन काहीतरी गवसल्याचा आनंद मोठा होता. त्यांच्या कार्यालयाबद्दल, रामभाऊंबद्दल अनेक विनोद प्रचलित होते. पण त्यांच्या मुळाशी एक कौतुकाची भावना होती.  
रामभाऊ तेव्हा चुनाभट्टीला राहत होते. माझा जाण्यायेण्याचा रस्ता त्यांच्या घरावरून जात असे. आणि त्यांच्या आणि त्यांच्या पत्नीच्या प्रेमळ अगत्याचा लाभही मला मिळे.
 नामदेव ढसाळ, सुधीर बेडेकर, अशोक शहाणे, दि. के. बेडेकर, शरच्चंद्र मुक्तिबोध, दिलीप चित्रे, विलास सारंग, खानोलकर, पु. ल. देशपांडे अशा विविध प्रवृत्तीच्या लेखकांचं सत्यकथेत लेखन वाचायला मिळायचं. डावा विचार आणि सत्यकथा यांचं खरंतर जमण्या सारखं नसूनही सत्यकथेने ‘चार डावे दृष्टिक्षेप’ असलेला एक विशेषांक प्रसिद्ध केला होता.   
एका विशिष्ट विचाराचं साहित्य प्रसिद्ध करण्यापेक्षा सगळीकडे चौफेर नजर टाकून त्यातलं साहित्य स्वीकारण्याची दृष्टी रामभाऊं जवळ होती. त्यांच्याबद्दल लिहिण्यासारखं बरंच आहे. पण साहित्यावर निखळपणे प्रेम करणारा एक मोहरा आता आपल्यात नाही ही भावना कष्ट देणारी आहे. मराठीतल्या अत्यंत दुर्मिळ संपादकांत त्यांचं नाव आदरानं घेतलं जाईल यात शंका नाही.
-अशोक राजवाडे, मुंबई</strong>

Story img Loader