गोपीनाथ मुंडे विद्यार्थिदशेपासूनच राजकारणातील बाळकडू प्यायले. भाजपची सत्ता असो अथवा नसो, मुंडेंचा वैचारिक पाया भक्कम होता. ओबीसी नेतृत्व असल्यामुळे त्यांची भारतीय जनता पक्षात घुसमट होतेय, अशा आशयाच्या बातम्याही अधूनमधून येत. गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये जाणार, अशा वावडय़ा उडविल्या गेल्या; परंतु ते अखेपर्यंत निष्ठेने भाजपमध्ये राहिले. केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर राष्ट्रीय राजकारणातही ते ओबीसी समाजाचे प्रतिनिधी ठरले होते. ओबीसी आरक्षणावरून पक्षाशी मतभेद असूनसुद्धा त्यांनी या मुद्दय़ावरून भक्कम बाजू पक्षात मांडली. ओबीसींच्या आरक्षण कोटय़ातून मराठय़ांना आरक्षण देण्यास त्यांचा अखेपर्यंत विरोध होता.
त्यांना राजकारणातून संपवण्याचा अनेकदा प्रयत्न झाला, पण मुरब्बी राजकारणी असल्यामुळे ते मोठमोठय़ा नेत्यांना पुरून उरले. भाजपच्या कट्टर हिंदुत्वाच्या चौकटीत त्यांनी स्वत:ला कधी बंदिस्त करून घेतले नाही. त्यामुळे त्यांच्यावर निष्ठेने जीव ओवाळून टाकणारा वर्ग ओबीसी, दलित, मुस्लीम, शेतकरी, कामगार असा सगळ्या स्तरांतून होता. त्यांचे नाव अनेक घटनांमध्ये गोवले गेले, परंतु सहीसलामत ते तारून निघाले.
ग्रामीण राजकारण, आमदार, राज्याचे उपमुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेते, खासदार ते लोकसभेतील उपनेतेपद असा लांबलचक, दीर्घ व यशस्वी राजकीय प्रवास करणारे गोपीनाथ मुंडे खिलाडू वृत्तीने राजकारण करीत. केंद्रीय ग्रामविकास मंत्री पदावर वर्णी लागल्यामुळे त्यांच्याकडून महाराष्ट्राला आणि देशालाही बऱ्याच अपेक्षा होत्या. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनामुळे महाराष्ट्रातील जनताच नव्हे, तर देशातील जनताही अभ्यासू लोकमान्य नेत्याला मुकली आहे.
सुजित ठमके, पुणे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा