‘यूपीएससी’च्या (केंद्रीय लोकसेवा आयोग) कथित होऊ घातलेल्या बदलांवर सध्या चर्चा चालू आहे. यासंदर्भात ‘आळश्यांची पळवाट’ या पत्रातील (लोकमानस, १८ जुलै) मतांशी मी पूर्ण सहमत आहे. आपण भाषिक माध्यमात शालेय शिक्षण घेतल्याने आपले इंग्रजी ज्ञान कच्चे आहे, ही सबब अक्षम्य आहे (आणि तीच मराठी शाळांच्या मुळावर उठली आहे). पण त्यातल्या एका मताशी सहमत व्हावेसे वाटत नाही. पवार म्हणतात त्याप्रमाणे २०११ साली वैकल्पिक विषय काढून ‘सी-सॅट’चा अंतर्भाव ही भाषिक मुलांसाठी भेट आहे. ती असेलही; पण या परीक्षा पद्धतीमध्ये एकूणच या सेवांवर कोणते परिणाम होऊ घातले आहेत याचा गांभीर्याने विचार करायची वेळ आली आहे. आणि तो फार होताना दिसत नाहीये.
२०१०पर्यंत पूर्वपरीक्षेत वैकल्पिक विषय असे. अत्यंत खोलात जाऊन विषयाचा अभ्यास करावा लागे. भल्या भल्या हुशार मुलांनाही पूर्वपरीक्षेचा अडथळा पार करताना घाम फुटत असे. पण हे कष्ट उपसताना त्या वैकल्पिक विषयासह इतरही ज्ञान विद्यार्थी अर्जति करीत असे. बरेच विद्यार्थी सामाजिक शास्त्रे घेत. मग इतर विविध सामाजिक शास्त्रांच्या अंत:संबंधांचा अभ्यास करावा लागे. आणि त्याला उत्तम जोड द्यायला सामान्यज्ञान पेपर होताच. या सगळ्या प्रक्रियेतून तावूनसुलाखून निघाल्यावर विद्यार्थी अत्यंत अवघड अशा मुख्य परीक्षेला बसत असे. त्यासाठी त्याची शारीरिक, मानसिक, वाचिक, भाषिक आणि एकूण आकलनक्षमताही तयार झालेली असे. कारण तीच देश चालवणाऱ्या अधिकारीपदासाठी योग्य असे.
आज नव्या अभ्यासक्रमात परिस्थिती काय आहे? गणित, इंग्रजी आणि आकलन यांसारखे विषय प्रामुख्याने आल्यावर बँकिंग वा व्यवस्थापनवालेसुद्धा गल्लोगल्ली क्लासेस उघडू लागले आहेत. आणि आयआयटी, आयआयएम किंवा अभियांत्रिकीचे अतिशय गुणवान विद्यार्थी पूर्वपरीक्षा जेमतेम तीन महिन्यांत पार करू लागले आहेत. कारण सामान्यज्ञान पेपरची कोणतीही वेगळी गुणअर्हता नाही, दोघांचे गुण एकत्रित विचारात घेतले जातात आणि इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, सामान्याविज्ञान, चालू घडामोडी, पर्यावरण, आंतरराष्ट्रीय संबंध यांचा समावेश असलेल्या सामान्यज्ञान या विषयापेक्षा नवीन सी-सॅट हा पेपर नक्कीच स्कोिरग आणि झटक्यात पार करणारा ठरू शकतो. त्यामुळे सामान्यज्ञान विषयाकडे बऱ्यापकी दुर्लक्ष करूनही पूर्वपरीक्षा पार होते. पण मुख्य परीक्षेचे काय? सामान्यज्ञानाचे प्रत्येकी ५००० शब्दांचे चार पेपर तर एका वैकल्पिक विषयाचे प्रत्येकी ३००० शब्दांचे २ पेपर अधिक २५० मार्काचा निबंध अशा मुख्य परीक्षा नामक एका अग्निदिव्याला हा विद्यार्थी बसतो.
इथे एक प्रश्न निर्माण होतो. पूर्वपरीक्षेत अशी कोणती पात्रता त्याने विकसित केली? उत्तम इंग्रजी, उत्तम गणित म्हणजे पात्रता? वर उल्लेखिलेल्या संस्थांमध्ये शिकणारे ‘हुशार’ विद्यार्थी आपापल्या विषयात उत्तम असतीलही. परंतु एखाद्या सामाजिक विषयावर साध्या १० ओळी लिहिताना त्यांची भंबेरी उडत असते हे वास्तव आहे. आणि त्यात त्यांची चूक नाही. ते तशा व्यवस्थेतूनच वर आलेले आहेत. पण मग यांनी कोणत्याही गोष्टीवर प्रश्न विचारू शकणाऱ्या मुख्य परीक्षेला तोंड कसे द्यायचे? आणि यांच्यातूनच पुढे अधिकारी निवडले जाणार?
काही लोकांना वाटणाऱ्या कथित भेदभाव किंवा पक्षापातापेक्षा हे आव्हान अधिक गंभीर आहे आणि हा देशाच्या व्यवस्थेशी खेळ आहे. म्हणून यातून काही तरी मार्ग काढायला हवा. केवळ सामान्यज्ञान हा पेपर तरी ठेवायला हवा किंवा इतकाच जर सी-सॅट महत्त्वाचा वाटत असेल तर दोन्ही विषयांना सारखे महत्त्व द्यावे म्हणजे पक्षपाताची ओरडही कमी होईल आणि प्रक्रिया अधिक कठोर तसेच सर्वसमावेशकही होईल.
सौरभ गणपत्ये, ठाणे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा