शिवसेनाप्रमुखांच्या निधनानंतर दोन-तीन दिवसांत लादल्या गेलेल्या सार्वजनिक बंदविषयी फेसबुकवर अत्यंत योग्य प्रतिक्रिया व्यक्त करणाऱ्या निरपराध मुलींना नुकसानभरपाईपोटी प्रत्येकी ५० हजार रु. शासनाने देण्याबाबतचे वृत्त (लोकसत्ता, १६ जुल) वाचले. उशिरा का होईना त्या दोन मुलींना न्याय मिळाला. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची पायमल्ली करत निरपराध दोन मुलींना अटक करणाऱ्या आततायी, बेकायदा कृत्याची मोजावी लागणारी किंमत ५० हजार रुपये ही अखेर  तिजोरीतून म्हणजे जनतेच्याच खिशातून जाणार.
महाराष्ट्रात वैचारिक वादविवादाची जागा राडा संस्कृतीने, झोटिंगशाहीने गेली काही वष्रे घेतली आहे. आपल्यापेक्षा वेगळे मत व्यक्त करणाऱ्यांवर दगडफेक, जाळपोळ करत सार्वजनिक तसेच खासगी मालमत्तेचे नुकसान करणाऱ्या, दहशत पसरविणाऱ्या समाजकंटकांनादेखील दंड ठोठाविण्यात येईल वा त्यांच्यावर कडक कारवाई करून झोटिंगशाहीला धडा शिकविण्यात येईल तो सुदिन.
रजनी अशोक देवधर, ठाणे

समभाग व्यवहार हेसुद्धा पॉन्झी-तत्त्वच?
प्रदीप आपटे यांच्या ‘वित्तविश्वातील धूर्त-धोरणी’ या सदरातील ‘पॉन्झी तत्त्वाचा कॅलिडोस्कोप’ (१६ जुल) हा लेख वाचला . पॉन्झी तत्त्व किती वेगवेगळ्या स्वरूपांत अनुभवास येते ही बाब सामान्य माणसांनी विचार करावा अशी आहे. स्वत: गुंतवणूक करायची आणि त्यावर परतावा मिळवण्याकरिता नवीन गुंतवणूकदार आणायचे हे म्हणजे पॉन्झी तत्त्व असे एकदा मान्य केले की, किती तरी गोष्टी मूलत: पॉन्झी योजनाच आहेत असे वाटते. बाजारातून एखाद्या अतिशय चांगल्या कंपनीचे समभाग त्याच्या दर्शनी मूल्यापेक्षा किती तरी जास्त दराने खरेदी करणे म्हणजे तरी दुसरे काय आहे?
कितीही उत्तम लाभांश जरी मिळत असला तरी तो दर्शनी (मूळच्या) मूल्यावर असतो आणि त्यामुळे केलेल्या गुंतवणुकीवर पदरात पडणारा लाभाचा दर नगण्यच असतो. मग ही गुंतवणूक का केली जाते? याचे उत्तर एकच आणि ते म्हणजे दुसरा कोणी गुंतवणूकदार तोच समभाग आपल्याकडून भविष्यात आणखी जास्त किमतीला विकत घेईल अशी खात्री (की आशा?) असते! म्हणजे, आपल्यापेक्षा अधिक मूर्ख कोणी तरी भेटेल यावर बरेच व्यवहार होत असतात आणि ते सर्व एका अर्थी पॉन्झी योजनाच आहेत असे वाटते.
गुंतवणूक करून वस्तू आणि सेवांची केलेली प्रत्यक्ष निर्मिती आणि पसे मोजून ग्राहकाने त्याचा घेतलेला प्रत्यक्ष उपभोग हीच फक्त खरी अर्थव्यवस्था असते आणि बाकी सर्व ‘माया’ असते असे वाटते.
विनीता दीक्षित, ठाणे</strong>

या भेटीत चूक अशी..
मुंबईवरील २६/११ चा हल्ला हा एक काळा इतिहास आहे. हफिज सईद हा जागतिक अतिरेकी आहे. त्याने तो मुंबई हल्ल्याचा सूत्रधार नव्हता, असे आजपर्यंत सांगितलेले नाही; परंतु देशद्रोह, फितुरी, घरभेदीपणा यांबद्दल सतर्क असणे योग्यच, असा धडा आपल्याला इतिहासातून मिळालेला आहे. राजा जयचंदाने केलेले प्रताप करणारे तेव्हा होते, आजही असतील. महमद गजनी याला सोमनाथ मंदिराचा रस्ता कोणी दाखविला? तेव्हा घरभेदे हा आपल्याला शाप आहेच.     
वेद प्रताप वैदिक हे पत्रकार. पत्रकारांना राज्यकर्त्यांचे दरवाजे उघडेच असतात; परंतु या उघडय़ा दरवाजांतून कोण कशासाठी आत येतो हे लोकांना कळले पाहिजे. वैदिक हिंदी पत्रकार, एका हिंदी दैनिकाचे ते संपादक होते. पुढे एका हिंदी वाहिनीचे पत्रकार असताना त्यांनी दहा लाख रुपये बेहिशेबी घेतले, म्हणून काढून टाकले. असा इतिहास असलेला पत्रकार सगळ्या पक्षांच्या अनेक पुढाऱ्यांना धरून होता. भाजप सरकारने कितीही नाकारले तरी हाफिज सईदशी त्याची बठक तशाच मोठय़ा ‘सरदारांनी’ घडवून आणलेली असली पाहिजे अशी शक्यताही नाकारता येणार नाही. बाबा रामदेव यांनी सांगितलेच आहे की, वैदिक हाफिजचे मतपरिवर्तन करण्यासाठी भेटला होता. अग्रलेखात म्हटले आहे- ‘सरकारने आता तरी या वेडपट वैदिकास आवरावे’.. पण सरकार असे करील?
मार्कुस डाबरे, पापडी, वसई   

वैदिक-हाफिज भेटीचे वादळ विचारपूर्वक शांत करणे गरजेचे
‘वेडपट वैदिक’ या अग्रलेखातून (१६ जुलै) वेद प्रताप वैदिक यांच्याबद्दल माहितीपूर्ण मतप्रदर्शन वाचायला मिळेल अशी अपेक्षा होती; पण त्यांच्यापेक्षा रामदेवबाबा यांच्याबद्दल टीकेचा सूर निम्म्यापेक्षा जास्त जागा व्यापणारा आहे. शत्रू हाफिज सईदशी गाठभेट करणारे वेद प्रताप वाचकांसाठी अनोळखीच राहिले. याच भेटीसंदर्भात ‘लोकमानस’मधील सौमित्र राणे यांनी मांडलेला ‘या भेटीत गैर काय?’ हा मुद्दा पटण्यासारखा आहे; परंतु वसईच्या उमेश मुंडले यांचा ‘दोन्ही काश्मीर एकत्रित करून त्याला स्वातंत्र्य द्यावे.. अशा कल्पनेला आर.एस.एस. किंवा भा.ज.प. कधीही मान्यता देणार नाहीत’ हा युक्तिवाद बिनतोड आहे. वैदिक यांच्या या मतांचा समाचार अग्रलेखात विस्ताराने वाचायला मिळाला असता, तर वैदिक यांचा वेडपटपणा अधिक उठून दिसला असता.
माझे मत असे की, हाफिज सईद याची मुलाखत घेण्याची संधी अन्य कोणाही भारतीय पत्रकाराने सोडली असती का? अशा प्रकारच्या असामान्य मुलाखतीतून त्याच्या मनाचा थांग लागावा, असाही उद्देश ठेवण्यात काय चुकीचे आहे? उलट झाला तर त्या माहितीचा फायदाच देशाला होऊ शकेल. एक पत्रकार म्हणून त्यांनी मुलाखत घेण्यापूर्वी कोणाची परवानगी घेण्याची गरज वाटत नाही. शिवाय पाकिस्तान हा भारताला शत्रू मानतो, वेळोवेळी आपल्या भागात अतिरेकी पाठवतो व देशात विध्वंस करवतो अशा देशाच्या पंतप्रधानांना जर आपण शपथविधीसाठी खास निमंत्रण देऊ शकतो, तर एक पत्रकार अतिरेक्यांच्या नेत्याला भेटला तर त्यात आक्षेप घेण्यासारखे काय आहे?
दुसरे म्हणजे, अरुण जेटली किंवा सुषमा स्वराज यांनी कितीही म्हटले, की या गोष्टीशी सरकारचा दूरान्वयानेही संबंध नाही, तरी राजकीय वर्तुळात यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही. मात्र सरकारतर्फे जरी असा प्रयत्न झाला असे मानले तरी त्यात काय चूक आहे? आपल्या देशाची तर वाटाघाटीची परंपराच आहे. ज्या अतिरेक्यावर पाकिस्तानी नेत्यांचे व सेनेचेसुद्धा नियंत्रण नाही त्यांच्याबाबत त्या सरकारशी बोलण्यापेक्षा सरळ अतिरेक्यांशी अप्रत्यक्ष संपर्क करून  चाचपणी केली असल्यास त्यात चूक ती काय? हा राजकीय डावपेचांचा एक भाग असू शकतो. मोदींना त्यांच्या मार्गाने जाण्याची संधी दिली पाहिजे. मात्र हीच गोष्ट काँग्रेस सरकारने केली असती तर भाजपची प्रतिक्रिया किती प्रखर झाली असती हे वेगळे सांगायला नको. म्हणूनच तर याला राजकारण म्हणायचे.  
राहिला मुद्दा, वैदिक यांनी पाकिस्तानात वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आपल्या विचारस्वातंत्र्याचा उपयोग करून दोन्ही काश्मीर म्हणून एक स्वतंत्र राज्य करावे, ही कल्पना मांडणे कितपत योग्य, हा खरा चच्रेचा मुद्दा होऊ शकेल. भारतात जरी विचारस्वातंत्र्य असले तरी  घटनातज्ज्ञांच्या मते भारताच्या विघटनाबद्दल कोणालाही बोलण्याचा अधिकार नाही. तर तो देशद्रोह ठरू शकतो.
त्यामुळे हे निर्माण झालेले वादळ विचारपूर्वक व प्रबोधनाने शांत करणे गरजेचे आहे.   
प्रसाद भावे, सातारा

रामदेव यांचे सत्कार्य
वेद प्रताप वैदिकांवरून जे वादळ उठवले गेले त्यावर आधारित ‘वेडपट वैदिक’ (१६ जुलै) या अग्रलेखातील पुष्कळसे मुद्दे सयुक्तिक आहेत यात शंकाच नाही, पण बाबा रामदेव यांना झोडपण्याची संधी घेऊन त्यांच्यावर जी अतिरेकी आगपाखड केली ती बरोबर नाही असे म्हणावे लागेल. भूतकाळात त्यांनी केलेल्या आंदोलनात अनेक गरप्रकार झाले हे जसे पुढे आणले तसे त्यांनी आपल्या देशातच काय, पण जगातील अनेक देशांत योगशास्त्र आणि प्राणायाम या मानवी  शरीराचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी असणाऱ्या विषयाची गोडी निर्माण केली याबद्दल शब्दाचाही उल्लेख नाही हे खटकते. भारतासह जगातील कोटय़वधी लोकांचे आरोग्य योगासने व प्राणायाम यामुळे सुधारत आहे हे विसरून चालणार नाही.
– श्रीनिवास जोशी, डोंबिवली (पूर्व)

Story img Loader