‘आता राज्य भ्रष्टाचारमुक्त करण्याची वेळ’ ही नरेंद्र मोदींच्या घोषणेची बातमी वाचून (लोकसत्ता, २२ ऑगस्ट) करमणूक झाली. महाराष्ट्राच्या कारभारावर टीका करायला एक राजकीय हल्ला म्हणून हे ठीक आहे; पण त्यामुळे मोदींवर विश्वास बसावा अशी परिस्थिती नाही.
गुजरातमधील कारभाराबद्दल बोलायचं झालं तर बाबुभाई बोखिरिया आणि पुरुषोत्तम सोळंकी या नावाचे दोन मंत्री खुद्द मोदींच्या काळात होते. गुजरातमधल्या ५८ धरणांत कुठल्याही टेंडर प्रक्रियेशिवाय मासेमारीसाठी कंत्राटं दिल्याचे सोळंकींवर आरोप होते. यामुळे राज्याचं ४०० कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा दावा केला जात होता. तत्कालीन राज्यपाल कमला बेनिवाल यांनी याबाबत निर्णय द्यावा, अशी भूमिका गुजरात उच्च न्यायालयाने घेतली. राज्यपालांनी गुजरात शासनाचा ‘अपुऱ्या पुराव्या’चा मुद्दा अमान्य करून सदर मंत्र्याला आरोपी करायला परवानगी दिली. सोळंकी यांनी यावर उच्च न्यायालयाकडे दाद मागितली, पण सोळंकी यांचा दावा कोर्टाने फेटाळून लावला.
बाबुभाई बोखिरिया हे मोदींच्या काळात गुजरातमध्ये जल आणि कृषी विभागाचे मंत्री होते. अवैध चुनखडीच्या खाणकामात ५४ कोटी रुपयांच्या घोटाळ्याचे त्यांच्यावर आरोप होते. त्याबद्दल त्यांना तीन वर्षांच्या कैदेची शिक्षा न्यायालयाने सुनावली होती. मात्र पुढे या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं. न्यायालयाने यासंबंधी बोखिरिया, मोदी सरकारला नोटिसा दिल्या होत्या.
‘मैं खाता भी नहीं और खाने देता भी नहीं’असं विधान मोदींनी त्यावेळी केलं होतं. गमतीची नसलेली गोष्ट म्हणजे बोखिरिया आता आनंदीबेन पटेल यांच्या मंत्रिमंडळातही आहेत. जलस्रोत, शेती, मासेमारी आणि गोरक्षा अशी खाती त्यांच्याकडे आहेत. रेड्डी बंधूंचे मित्र येडियुरप्पा हे तर आता भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत. त्यामुळे भ्रष्टाचाराचं पुढे काय होणार यावर वेगळं भाष्य करण्याची गरज नाही. आणि सोहराबुद्दिन चकमकफेम अमित शहा हे आता भाजपचे अध्यक्षच आहेत. तेव्हा आपण भ्रष्टाचारमुक्त राज्य कारभार करू हे मानायला त्यांचा पूर्वेतिहास किंवा वर्तमानातल्या घटनाही साक्षी नाहीत. येडियुरप्पांची पक्षाच्या उपाध्यक्षपदी झालेली निवड ही वेगळ्याच काही गोष्टी दर्शविते. स्वच्छ कारभारापेक्षा विशिष्ट जाती-समूहांची मतं मिळणं भाजप अधिक महत्त्वाचं मानते असा याचा अर्थ असेल, तर भाजप आणि काँग्रेसमध्ये फरक काय?
-अशोक राजवाडे, मालाड (पू), मुंबई
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा