‘भारत : एक रत्नखाण’ या अग्रलेखात (लोकसत्ता, १२ ऑगस्ट), ‘व्ही. पी. सिंग यांनाही भारतरत्न देण्यास हरकत नाही, कारण त्यांनी भारताची दुसरी फाळणी करून दाखवली’ अशी टिप्पणी करण्यात आली आहे.
 विश्वनाथ प्रताप (व्ही. पी.) सिंग यांनी फाळणी घडवली नाही तर जी फाळणी भारतीय समाजात पिढय़ान्पिढय़ा अस्तित्वात होती ती फक्त सकारात्मकरीत्या अधोरेखित केली. व्ही. पी. सिंग यांनी कदाचित जाणता-अजाणता त्या ‘नकारात्मक भेदभावा’च्या फाळणीच्या रेषेला ‘सकारात्मक भेदभावाचे’ स्वरूप देऊन बुजवण्याचाच प्रयत्न केला असेही म्हणता येईल. आत्तापर्यंतच्या लाभार्थी वर्गाला आपल्या ताटात ओरबाडून घेतलेली (व आता हक्काची वाटू लागलेली) पंचपक्वान्ने पोट खपाटीला गेलेल्यांशी वाटून घेणे या फाळणीने भाग पाडले. हे एक प्रकारचे ‘सोशल इंजिनीअरिंग’च होते. एक धाडसी राजकीय प्रयत्न व्ही. पी. सिंग यांनी करून बघितला (जो आधी आंबेडकरांनी  sociopolitical पद्धतीने करून पाहिला होता). आंबेडकर काय किंवा व्ही. पी. सिंग काय यांनी समाजाची दुखरी नस पकडून तिच्यावर एक अशी अत्यंत अवघड (पण तरीही अत्यावश्यक) शस्त्रक्रिया करण्याचा प्रयत्न केला की प्राथमिक रक्तस्रावानंतर संपूर्ण रुग्णाची (समाजाची) एकत्रित सुधारणा (रिकव्हरी या अर्थाने) आणि प्रगती व्हायला व्यवस्थित वेळच द्यावा लागणार आहे. त्यांच्या निर्णयांचा प्राथमिक धक्का पचवून त्याचे योग्य मूल्यमापन करायची मानसिक स्थिरता यायला आपल्याला समाज म्हणून अजून बराच काळ लागेल. पण एक गोष्ट निश्चित की ही दुखरी नस कापली नसती तर संपूर्ण समाजाला ‘गँगरीन’ व्हायचा जो धोका होता तो अंशत: तरी या निचऱ्यातून कमी झाला असेल. या प्रचंड असमतोलातून उद्या उद्भवू शकणारी रक्तरंजित क्रांती त्यांच्या या लोकशाही निर्णयातून टळलीही असू शकेल.
इस्रायल आणि पॅलेस्टाइन यांच्या बलाबलात जितकी प्रचंड विषमता आहे त्याहूनही अधिक विषमता भारतातल्या या फाळणीच्या दोन बाजूंच्या वर्गात शतकानुशतके होती व अजूनही आहे, त्यामुळे अमेरिका ज्या एकिभगी चष्म्यातून इस्रायल-पॅलेस्टाइन भांडणांकडे पाहते तशाच दृष्टिकोनातून या फाळणीकडे पाहणे समाज म्हणून आपल्याला परवडणारे नाही याचे माध्यमांसकट सर्वानीच भान ठेवणे अतिशय गरजेचे आहे.
प्रवीण नेरुरकर, मुंबई

‘परंपरे’च्या नावाखाली जुगाराचा  भंपकपणा पुरे, आदेश पाळा
घरातील किंवा शेजाऱ्यांकडील शिंकाळ्यात ठेवलेले दूध-दही सवंगडी जमवून खायचे ही बाळकृष्णाची लीला सर्वज्ञात आहे. अर्थातच घरात टांगलेले शिंकाळे वयस्क व्यक्तीचाच हात पोहोचेल इतकेच उंच असणार हे उघड आहे. म्हणूनच बाळकृष्णाला सवंगडय़ांच्या पाठीवर उभे राहून दही-दुधाची चोरी करावी लागे. असे असताना कानठळ्या बसवणारी सवंग-नाचगाणी आणि जल्लोष करीत रस्त्यात उंचावरील (किंवा क्रेनला लटकवलेली ) बांधलेली दहीहंडी फोडण्याला परंपरा म्हणणे क्रूर थट्टा आहे. शिवाय अशा हंडीला पशांचे बक्षीस लावून तरुणांना आमिष दाखवणे हा एक प्रकारे जुगार आहे. दहीहंडीच्या सबबीखाली स्वत:ची प्रसिद्धी करवून घेणारे तरुण आणि अल्पवयीन यांच्या जिवाशी खेळत कसे नामानिराळे राहतात हे लोकसत्तेत अलीकडे प्रसिद्ध झालेल्या माहितीवरून स्पष्ट होते. बारा वर्षांखालील मुलांना उंच थरावर चढवताना त्याच्या पालकांची संमती घेतली जाते हा शुद्ध भंपकपणा आहे, कारण गोिवदा खेळताना कायमस्वरूपी जायबंदी झालेल्यांना शेवटी वाऱ्यावर सोडून दिले जाते आणि त्याच्या कष्टी पालकांना  आजन्म यातना भोगाव्या लागतात. अशा स्वरूपाचे वास्तव समोर असताना आजच्या दहीहंडी कार्यक्रमाला पारंपरिक कसे म्हणता येईल? मुंबई उच्च न्यायालयाने यासंबंधी दिलेला निर्णय सामाजिक हिताचा असून त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे झाली पाहिजे, असे माझे स्पष्ट मत आहे.
श्रीराम गुलगुंद, चारकोप कांदिवली (मुंबई)

दोन कोटी पावले पुढे पडोत..
‘दहीहंडी’ या  उत्सवाच्या बाबतीत उच्च न्यायालयाने आदेश दिल्यापासून या उत्सवावर अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. दहीहंडी उत्सव मागील काही वर्षांपासून ज्या प्रकारे साजरा केला जातो ते पाहून ‘श्रीकृष्णाने’ बहुधा उच्च न्यायालयाच्या रूपाने महाभारतातील शिशुपालाच्या शंभर अपराधांची आठवण पुन्हा एकदा आपणा सर्वाना करून दिली. त्यामुळेच उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे सर्वसामान्यांनी मनापासून स्वागत केले.
दहीहंडीचे आयोजन करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी मात्र ‘१८ वर्षांखालील गोिवदांना परवानगी द्या, हंडीच्या थरांना उंचीचे बंधन नको, आयोजनाच्या ठिकाणी आवाजाचे बंधन नको’ असा घोष लावला. शिवसेनेची मजल तर ‘आवाज वाढवा- अन्यथा जनआंदोलन करू’ या धमकीपर्यंत गेली.
मोठय़ा आवाजाचा त्रास कान, हृदय, मेंदू इ. सर्व महत्त्वाच्या अवयांवर वाईट परिणाम होतो हे विज्ञानाने सिद्ध झाले आहे. त्याला विरोध करणारे एक वैद्यकीय शिक्षणमंत्री व ज्यांचे चिरंजीव डॉक्टर आहेत व आता खासदारदेखील. असे नेते नागरिकांची पर्वा न करता अशा प्रकारे भूमिका मांडतात याचे खरोखर वाईट वाटते. खरे म्हणजे ध्वनिप्रदूषण या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाने आधीच बंधने घालून दिली आहेत, त्यामुळे ही सर्व मंडळी गेली अनेक वष्रे कायद्याचे पालन करीतच नाहीत पण आता तर न्यायालयालाच आव्हान देत आहेत.
शिवसेनेने खरे म्हणजे प्रताप सरनाईक यांचे अनुकरण करावयास हवे. उलट ते एकाकी पडल्याच्या बातम्या येत आहेत. आता कदाचित सरनाईक यांना कळेल की योग्य निर्णय त्रासदायक कसे ठरतात. या निमित्ताने सर्वसामान्यानांच आवाहन आहे की, न्यायालयाचे निर्णय जे मानत नाहीत त्यांच्याबद्दल न भिता पोलिसांकडे तक्रारी आपणच करू या. प्रत्येक जण एक पाऊल चालला म्हणजे मुंबई-ठाण्यातील जनता दोन कोटी पावले पुढे जाईल.
मिलिंद पाटणकर (नगरसेवक) ठाणे</strong>

दरडावण्या नको, आपले उत्सव असह्यच
उत्सवांवर बंदी आणलेली सहन करणार नाही, अशी गर्जना उद्धव ठाकरे यांनी केलेली वाचली. आत्तापर्यंत किती तरी वेळा हे ‘सहन करणार नाही’ ऐकले आहे. संबंधितांनी ‘समजूत’ काढली की यांची सहनशक्ती वाढते. दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्र यांना आलेले बाजारी रूप यांना कुणी तरी जनहित याचिका केल्याशिवाय दिसत नाही का?  कल्याणकारी हुकूमशाहीचे समर्थन यांचे वडील करीत असत त्याचे काय झाले? कागदी वाघ हे.
मशिदींवरच्या भोंग्यांचा, रस्त्यावरच्या नमाजाचा विचार व्हायला हवाच आहे, पण त्याचबरोबर गणपतीच्या- नवरात्राच्या दिवसांतल्या जीवघेण्या गोंगाटाचा, पुण्यातल्या असहय़ विसर्जन मिरवणुकीचा सुद्धा नव्याने विचार व्हायला हवाय. हिम्मत असली तर करून दाखवा हा विचार. उगा आपले निवडणुकीच्या तोंडावर हे सहन करणार नाही, ते चालू देणार नाही अशा पुचाट दरडावण्या पुष्कळ झाल्या. आता, हे तरी ‘करून दाखवा’च.
कल्याणी नामजोशी

थेट प्रक्षेपण, हे समाजप्रबोधन?
निवडणुका तोंडावर आल्यामुळे सार्वजनिक दहीहंडी, गणेशोत्सव या सगळ्यांना यंदाच्या वर्षी ऊत येणार आहे. उच्च न्यायालय काय आदेश देत आहे, सर्वसामान्य नागरिकांची कशी ससेहोलपट होत आहे याची कुठल्याही राजकीय पक्षांना कसलीही फिकीर नाही. पशाची मस्ती आणि बाहुबळांचा माज इतका वाढला आहे की कुठलेही पोलीस दल या गोष्टींना आळा घालेल असे वाटत नाही. नवल याचे वाटते की ऊठसूट याच गोष्टींचे भांडवल करून रोज रात्री चर्चा घडवून समाज प्रबोधनाचे सत्कार्य करू पाहणारे आमचे मराठी वाहिनीवाले दिवसभर दहीहंडीचे लाइव्ह प्रक्षेपण का करीत असतात? आपल्या कुठल्याही गोष्टींचे टीव्ही कव्हरेज होत आहे, असे समजले की भल्याभल्यांचा तोल जातो तिथे या राजकीय गुंडांचे काय? वाहिन्यांनी नुसत्या दिखाऊ/निष्फळ चर्चा करण्यापेक्षा कृती करून आपले सामाजिक भान दाखवून द्यावे!
– प्रदीप अधिकारी

Story img Loader