‘भारत : एक रत्नखाण’ या अग्रलेखात (लोकसत्ता, १२ ऑगस्ट), ‘व्ही. पी. सिंग यांनाही भारतरत्न देण्यास हरकत नाही, कारण त्यांनी भारताची दुसरी फाळणी करून दाखवली’ अशी टिप्पणी करण्यात आली आहे.
विश्वनाथ प्रताप (व्ही. पी.) सिंग यांनी फाळणी घडवली नाही तर जी फाळणी भारतीय समाजात पिढय़ान्पिढय़ा अस्तित्वात होती ती फक्त सकारात्मकरीत्या अधोरेखित केली. व्ही. पी. सिंग यांनी कदाचित जाणता-अजाणता त्या ‘नकारात्मक भेदभावा’च्या फाळणीच्या रेषेला ‘सकारात्मक भेदभावाचे’ स्वरूप देऊन बुजवण्याचाच प्रयत्न केला असेही म्हणता येईल. आत्तापर्यंतच्या लाभार्थी वर्गाला आपल्या ताटात ओरबाडून घेतलेली (व आता हक्काची वाटू लागलेली) पंचपक्वान्ने पोट खपाटीला गेलेल्यांशी वाटून घेणे या फाळणीने भाग पाडले. हे एक प्रकारचे ‘सोशल इंजिनीअरिंग’च होते. एक धाडसी राजकीय प्रयत्न व्ही. पी. सिंग यांनी करून बघितला (जो आधी आंबेडकरांनी sociopolitical पद्धतीने करून पाहिला होता). आंबेडकर काय किंवा व्ही. पी. सिंग काय यांनी समाजाची दुखरी नस पकडून तिच्यावर एक अशी अत्यंत अवघड (पण तरीही अत्यावश्यक) शस्त्रक्रिया करण्याचा प्रयत्न केला की प्राथमिक रक्तस्रावानंतर संपूर्ण रुग्णाची (समाजाची) एकत्रित सुधारणा (रिकव्हरी या अर्थाने) आणि प्रगती व्हायला व्यवस्थित वेळच द्यावा लागणार आहे. त्यांच्या निर्णयांचा प्राथमिक धक्का पचवून त्याचे योग्य मूल्यमापन करायची मानसिक स्थिरता यायला आपल्याला समाज म्हणून अजून बराच काळ लागेल. पण एक गोष्ट निश्चित की ही दुखरी नस कापली नसती तर संपूर्ण समाजाला ‘गँगरीन’ व्हायचा जो धोका होता तो अंशत: तरी या निचऱ्यातून कमी झाला असेल. या प्रचंड असमतोलातून उद्या उद्भवू शकणारी रक्तरंजित क्रांती त्यांच्या या लोकशाही निर्णयातून टळलीही असू शकेल.
इस्रायल आणि पॅलेस्टाइन यांच्या बलाबलात जितकी प्रचंड विषमता आहे त्याहूनही अधिक विषमता भारतातल्या या फाळणीच्या दोन बाजूंच्या वर्गात शतकानुशतके होती व अजूनही आहे, त्यामुळे अमेरिका ज्या एकिभगी चष्म्यातून इस्रायल-पॅलेस्टाइन भांडणांकडे पाहते तशाच दृष्टिकोनातून या फाळणीकडे पाहणे समाज म्हणून आपल्याला परवडणारे नाही याचे माध्यमांसकट सर्वानीच भान ठेवणे अतिशय गरजेचे आहे.
प्रवीण नेरुरकर, मुंबई
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा