दहीहंडी उत्सवाला उच्च न्यायालयाने लगाम घातल्याचे वृत्त (लोकसत्ता, १२ ऑगस्ट) वाचले. फक्त गोिवदा पथकांची सुरक्षाच नव्हे, तर दहीहंडीपासून नवरात्र ,चत्री नवरात्रापर्यंत राजकारणी नेत्यांनी सार्वजनिक रस्त्यांवर अनेक वष्रे बिनदिक्कत सुरूच ठेवलेल्या या धिंगाण्याला त्वरित चाप बसणे अत्यंत गरजेचे आहे. उत्सवप्रिय सर्वसामान्य जनतेच्या धार्मिक भावनांना हात घालून अत्यंत धूर्तपणे स्वत:च्या मतदार विभागात सार्वजनिक रस्त्यांचा वापर करत हे उत्सव सुरू केले ते स्वत:चे साम्राज्य बळकट करण्यासाठीच. अशा उत्सवात रस्त्यावर ज्यांना प्रत्यक्ष नाचवले जाते तो समाज उत्सवांचा कैफ चढल्याने आज कोणत्याही प्रबोधनापलीकडे गेला असून राजकीय नेत्यांकडून आपला वापर होतो आहे ही जाणीव त्याला होत नाही. परिणामी, गोिवदांना उंच थरावर चढवायचे, चीअर लीडर्ससारख्या तरुणींना स्टेजवर आणून सोहळा दिलखेचक करायचा, असले उद्योग ठाण्यासारख्या शहरात फोफावले आहेत. सुशिक्षित, सुसंस्कृत, जागरूक नागरिकांच्या या शहराला लागलेला हा राजकीय दादागिरीचा कलंक लांच्छनास्पद आहे.
गोविंदा पथकातील सहभागी गोविंदांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना केली, मात्र करदात्या सजग शांतताप्रेमी नागरिकांच्या हक्कांचे काय? जनतेच्या कररूपी महसुलातून बांधण्यात आलेले आणि सर्वासाठी असलेले सार्वजनिक रस्ते हे वाहतुकीसाठी आणि दळणवळणासाठीच असतात, याकडेही आता तातडीने लक्ष द्यायला हवे. राजकीय नेत्यांच्या दडपणाखाली अशा उत्सवांना विविध यंत्रणांकडून परवानगी दिली जाते, त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही. परिणामी अशा उत्सवांच्या संख्येत दर वर्षी भर पडत जाते. दहीहंडी एक दिवस तर नवरात्रात तब्बल नऊ दिवस हा राजकीय िधगाणा सार्वजनिक रस्त्यांवर सुरूच राहतो. कोणत्याही नव्याने अवतरलेल्या देवाची/देवीची नवसाला पावणारा, हाकेला धावणारा अशी जोरदार जाहिरात केली, धार्मिक गुरू, स्वामी, महाराजांना पाचारण केले, सिनेमात काम करणारे, नाचणारे, गाणारे, क्रिकेट खेळणारे, राजकारण करणारे असे सारे सेलिब्रेटी दर्शनाला आले की आपसूकच देव, उत्सव अधिकाधिक मोठा होत जातो. भाविकांच्या मोठय़ा रांगाही वाढतच जातात. देणगीचे आकडे फुगत जातात. त्यातून काही थोडेफार सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम केले की काम फत्ते.
शासकीय यंत्रणेतील अधिकारी, उच्चपदस्थ अशा व्यक्ती या सोहळ्यांना उपस्थितीची भेट देत असल्याने हा सर्व मामला पालिका, पोलीस यांच्या पूर्वपरवानगीने केला जात आहे अथवा कसे, तसेच पालिकेने घातलेल्या अटींचे पालन होत आहे वा नाही याची शहानिशा होताना आढळत नाही. अशा उत्सवांविरुद्ध कोणी आवाज उठविलाच तर त्याची मुस्कटदाबी केली जाते वा त्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करून अशा सोहळ्यांना दर वर्षी परवानगी दिली जाते. १/३ रस्ता सोहळ्यासाठी वापरून २/३ मोकळा ठेवण्याची अट पाळली जात नाही हे वास्तव आहे. राजकीय दादागिरीपुढे शासन यंत्रणा निष्प्रभ ठरतात आणि या दादांना खास वागणूक सवलती, परवाने प्राप्त होतात, परिणामी सर्वसामान्य माणसांची कोंडी सर्वत्र होते. त्याविरुद्ध कोणी तक्रार केलीच तर अर्जविनंत्या, जनहित याचिका, कोर्टकचेऱ्या, सुनावणी या चक्रात व शासकीय कार्यालयात खेटे घालण्यात बराच कालापव्यय होतो आणि रस्त्यावरचा हा धांगडधिंगा विनाव्यत्यय अगदी जोशात सुरूच राहतो. कालांतराने त्याला वहिवाटीच्या हक्कासारखा हक्क प्राप्त होऊन तो उत्सव अगदी अधिकृत (?) होतो. त्या परिसरातील रहिवाशांना कितीही त्रास होत असला तरी त्याविरुद्ध ब्र काढायची हिंमत फारशी कोणामध्ये उरत नाही. गोविंदांच्या सुरक्षेबरोबरच सामान्य नागरिकांच्या समस्यांचादेखील विचार व्हावा.
रजनी अशोक देवधर, ठाणे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा