कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्रातून काँग्रेसला हद्दपार करायचेच, असा चंग बांधून तयार झालेल्या ‘महायुती’मध्ये सगळ्याच नेत्यांच्या वक्तव्यात सर्वत्र विरोधाभास दिसतो. भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी महाराष्ट्रात पुढील सरकार भाजपचेच असेल आणि त्यासाठी आमची जय्यत तयारी झालेली आहे म्हणून खात्री दिली, त्याच दिवशी एका खासगी मराठी वृत्तवाहिनीवर शिवसेना नेते रामदास कदम यांनी जाहीर केले की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल आणि तेही उद्धव ठाकरेच असतील.
त्याच दिवशी जैतापूर प्रकल्प कुठल्याही परिस्थितीत आम्ही होऊ देणार नाही, अशी शिवसेना घोषणा करते आणि जैतापूर प्रकल्प अगदी वेळेत पूर्ण केला जाईल म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आधीच जाहीर करून टाकले आहे. वेगळ्या विदर्भाबद्दल दोन्हीही प्रमुख पक्षांच्या भूमिका टोकाच्या विरुद्ध आहेत. शिवसेनेने त्यांचे व्हिजन डॉक्युमेंट अगोदरच महाराष्ट्रभर सर्वदूर पसरवले आहे. सीमा भागातील मराठीजनांना पोलिसांनी झोडपून काढले की शिवसेनेला आपण यावर १९६९ साली अत्यंत आक्रमक आंदोलन छेडले होते त्याची आठवण होते; मात्र केंद्राकडे त्यासाठी कशी आणि काय स्वरूपात मागणी लावून धरणार त्यासाठी काही ठोस होताना दिसत नाही. ‘मोदी पंतप्रधान होताच गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मी स्वत: त्यांना भेटून मिळवून देईन’ या उद्धव ठाकरे यांच्या आश्वासनाचे काय झाले हे विचारण्यात काही हंशील नाही, कारण केंद्रीय मंत्रिमंडळात महत्त्वाचे खातेदेखील त्यांना हक्काने मिळवणे शक्य झालेले नाही.
जातीवर आधारित आरक्षणाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सक्त विरोध होता पण महायुतीकडून जो जो जातीवर आधारित आरक्षण मागेल त्याला ते मिळेल तसे आश्वासन देण्यात येत आहे. महायुतीतील इतर चार लहान पक्षांनी स्वत:चा दबावगट तयार करून वेगळ्या बठका घेऊन रणनीती ठरवायला सुरुवात केली आहे. मुख्य पक्षांचे जोपर्यंत जागावाटप प्रक्रिया पूर्ण होत नाहीत तोपर्यंत त्यांना त्यांचे उमेदवार ठरविता येत नाहीत.
मतदाराने संभ्रमात पडावे, अशीच ही परिस्थिती आहे. विक्री-कौशल्याचा एक फंडा म्हणून असे सांगितले जाते की तुम्ही गिऱ्हाइकाला समजावू शकत नसाल तर त्याला संभ्रमित करा आणि आपले साध्य साधून घ्या.
मोहन गद्रे, कांदिवली
मतदारांना ‘गिऱ्हाईक’ कोण बनवते आहे?
कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्रातून काँग्रेसला हद्दपार करायचेच, असा चंग बांधून तयार झालेल्या ‘महायुती’मध्ये सगळ्याच नेत्यांच्या वक्तव्यात सर्वत्र विरोधाभास दिसतो.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 12-08-2014 at 01:01 IST
TOPICSवाचकांची पत्रेReaders Letterवाचकांचे ईमेलReaders Emailवाचकांचे मेलReaders Mailवाचकांच्या प्रतिक्रियावाचकांच्या प्रतिक्रियाReaders Reaction
+ 1 More
मराठीतील सर्व लोकमानस बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Readers reaction on news