सध्या गाजत असलेला धनगर बांधवांच्या आरक्षणाचा मुद्दा हा तसा खूपच किचकट आहे, शिवाय काही स्वार्थी लोक याचा लाभ उठवण्यासाठी सामान्य जनतेला वेठीस धरताना दिसत आहेत, या वाहत्या गंगेत कुणीही काहीही माहिती चिटकवून मोकळा होत आहे,. घटनात्मक बाबी काय आहेत हेसुद्धा तपासून घेतले पाहिजे.
उपलब्ध झालेल्या अनुसूचित जनजातीच्या लाभार्थी जातींची यादी पाहता खालील माहिती मिळाली (सर्व ठिकाणी कंसातील आकडे मूळ यादीतील क्रमाप्रमाणे) :
राजस्थान – (४) – धनका, तडवी, तेतारिय, वलवी -Dhanka, Tadvi, Tetaria, Valvi ; छत्तीसगड – (३३) उरांव, धानका, धांगड – Oraon, Dhanka, Dhangad (धनगड नाही) ; मध्यप्रदेश – (१४) धनवार-Dhanwar (३५) उरांव, धानका, धांगड – Oraon, Dhanka, Dhangad (धनगड नाही); गुजरात – (८) धनका, तडवी, तेतारीय, वलवी -dhanka, tadvi, tetaria, valvi ; महाराष्ट्र – (१३) धनका, तडवी, तेतारीय, वलवी -dhanka, tadvi, tetaria, valvi (१४) धनवार – Dhanwar
या पूर्ण यादीमध्ये धनगर किवा धनगड या शब्दाचा उल्लेख नाही,
धांगड, धनका, धानका अशा, थोडेफार उच्चार- साम्य असलेल्या जातींचा उल्लेख आहे.
काहींच्या मते घटनेत चुकून धनगरच्या ऐवजी धनगड असे आहे, किवा, बरेच जण बाहेरील राज्याचे दाखले देत सुटले आहेत, ज्याची सत्यासत्यता तपासली पाहिजे, बऱ्याच जणांनी धांगड (Dhangad ) याच (इंग्रजी) शब्दाला धनगर या शब्दाचा अपभ्रंश आहे अशी समजूत पसरवली आहे.
दुसरी गोष्ट म्हणजे एका जागी तर जातीचे प्रमाण पत्रच दाखल्याखातर सोशल मीडिया वर टाकलेले आढळले, ते उत्तर प्रदेशचे आहे, परंतु तेथील यादीमध्ये ‘धनगर ’ या जातीचा कुठेही उल्लेख नाही. उत्तर प्रदेशची ती यादी १५ जातींची आहे, त्यांत ‘धनगड’ वा ‘धांगड’ देखील नाही.
एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही यादी बनवताना अतिशय काटेकोर पणे कुठल्याही जातीचे नुकसान होणार नाही किंवा शब्दचुकीमुळे किंवा बोलीभाषेतील बदलामुळे संभ्रम निर्माण होऊ नये म्हणून बऱ्याच ठिकाणी जातींच्या नावापुढे साम्य असलेल्या जाती किंवा पोटजातींचा उल्लेख केलेला आढळतो.
उदाहरण घ्यायचे झाल्यास महाराष्ट्राचेच घेऊ या : (१७) गामित, गामता, गावीत, मावची, पदवी, – Gamit, Gamata, Gavit, Mavchi, Padavi. असे साम्य असलेले शब्द या यादीमध्ये आधीपासूनच समाविष्ट करण्यात आले आहेत, जेणेकरून भविष्यात काही घोळ होता कामा नये. अशी असंख्य उदाहरणे आपल्याला या यादीत पाहायला मिळतील.
तात्पर्य एवढेच की आपल्याकडे कोण आणि कसा अपप्रचार करेल याचा नेम नाही, परंतु जो ज्यांचा हक्क आहे तो अबाधित राहिला पाहिजे, आणि घटनेच्या चौकटीत योग्य निर्णय घेतला गेला पाहिजे. कुणावरही अन्याय होता कामा नये.
– सुशिम कांबळे, मुंबई
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा