हातकणंगले तालुक्यातील रुई गावात पंचगंगा नदीच्या काठावर आढळलेल्या १२ फूट लांबीच्या मगरीचे दोरखंडाने जेरबंद केलेल्या अवस्थेतील छायाचित्र आणि त्यासंबंधीचे वृत्त (३० जुल) वाचले. राज्यातील जवळपास सर्वच नद्यांचे गटारगंगेत रूपांतर झाल्याचे चित्र पाहायला मिळते. एके काळी मगर, मासे, कासवे अशा अनेक जलचरांना जीवनदायी ठरणाऱ्या नद्या आता मृतवत् झालेल्या आढळतात. वाघ, गवे असलेले अरण्य जसे परिपूर्ण समजले जाते तसे नदीमध्ये मगरीसारखे जलचर असणे हे नदीची परिसंस्था (इकोसिस्टम) उत्तम असल्याचे निदर्शक असते.
नदीकाठच्या बेसुमार वीटभट्टय़ा, प्रचंड प्रमाणात केला जाणारा अवैध वाळू उपसा, नदीकाठच्या डगरींचे सपाटीकरण करून शेतजमीन म्हणून वापर, ओढय़ा-नाल्यांवर अतिक्रमण करून केलेली बांधकामे यामुळे नद्यांची परिसंस्था उद्ध्वस्त झाली आहे. त्यामुळे मगरींसारखे जलचर विस्थापित झाले. वास्तविक मगरी अतिक्रमण करत नसून मानवानेच त्यांच्या अधिवासावर अतिक्रमण केले आहे. एकूण सर्वच वन्यजीवांचे नसíगक अधिवास नष्ट झाल्यामुळे मानव आणि वन्यजीव यांच्यात संघर्ष होताना दिसतो. पन्नास-साठ वर्षांपूर्वी कृष्णा,गोदावरी यांसारख्या नद्यांमध्ये मोठय़ा संख्येने मगरी आढळत; परंतु तेव्हा मगरींकडे शत्रू या दृष्टीने पाहिले जात नसे. मगर आणि मानव यांच्यात एक सहजीवन अस्तित्वात होते. याचे उत्कृष्ट चित्रण श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांच्या ‘डोह’ या पुस्तकातील ‘सुसरींचे दिवस’ या दीर्घ लेखात वाचायला मिळते. नदीकाठची परिसंस्था टिकली, मानवी अतिक्रमण हटले, तर हा संघर्ष कमी होईल आणि सुसरींचे दिवस पुन्हा येतील. गरज आहे ती त्यांच्याकडे प्रेमाने बघण्याची.
डॉ. उमेश करंबेळकर, सातारा
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा