जयललिता यांना बेहिशेबी संपत्ती असल्याचे आढळून आल्याने १८ वर्षांनी का होईना तुरुंगवासाची शिक्षा झाली.. पुढे त्या कदाचित निर्दोष सुटतीलही, तो भाग वेगळा. पण आपल्या ‘कृपाशंकरांनी’ ३५० कोटींची संपत्ती केवळ चारचाकी हातगाडीवर फेरीवाल्याचा धंदा करून कमावली. त्याबाबतीत सत्तेतून पायउतार व्हावे लागले. त्याबाबत मुंबईचे माजी पोलीस आयुक्त सत्यपाल सिंह यांची समिती तपासासाठी नेमली गेली. पुढे उच्च न्यायालयाने त्यांच्यावर फौजदारी कारवाई करावी की नाही यासाठी महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षांची परवानगी घेण्यासाठी त्यांच्यावर सोपवले, ती मिळालेली नाही.
कृपाशंकर सिंह हे खरोखरच स्वच्छ असतील तर सत्यपाल समितीचा अहवाल जाहीर करणे आवश्यक आहे. शिवाय विधानसभा अध्यक्षांना असे अधिकार असावेत किंवा नाहीत हेदेखील तपासून पाहणे गरजेचे आहे.
सुधीर सुदाम चोपडेकर, डोंगरी (मुंबई)
‘इथल्याच’ तरुण उद्योजकांचा उपयोग कसा करून घेणार?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेतील सभेत मूळ भारतीय वंशाच्या अमेरिकनांना भारतात येण्याचे आवाहन केले. मातृभूमी म्हणून भारताबद्दल मनात एक हळवा कोपरा असणे आणि येथील अस्वच्छ व भ्रष्ट व्यवस्थेस सामोरे जाण्याची मानसिकता बनविणे यात मोठे अंतर आहे. ‘परत या, परत या..’ अशी साद घातल्याने कोणी परत येत नाही, हे वेगळे सांगावयास नकोच! आíथक, व्यावहारिक तसेच सांस्कृतिक नाळ अमेरिकेशी जोडली गेलेल्यास ती तोडणे तसे कठीणच.
‘मेक इन इंडिया’चा नारा कितीही आकर्षक असला तरी त्यामुळे सर्वात जास्त उकळ्या फुटत असतील त्या व्यवस्थेचे सुकाणू हातात असणारे आणि टेंभे नाचवून ती हवी त्या दिशेला नेणाऱ्यांच्याच मनात! यात मोदी यांच्या उद्दिष्टांबद्दल शंका घेण्याचे कारण नाही; परंतु अशी आíथक गुंतवणूक भारतात यावी तर तशी सक्षम व्यवस्था-बांधणी करणे आणि मानसिकता बदलणे यासाठी काय ठोस योजना हाती घेणार तेही स्पष्ट करावे. आणि ब्रेन रीगेनबद्दल म्हणाल तर आजही याच मातीशी नाळ घट्ट जोडलेले त्याच बुद्धिमत्तेचे, वकुबाचे तरुण येथे आहेत, त्यांचा कसा उपयोग करून घेणार?
हे तरुण अजून भारतातच आहेत; म्हणजे फार किंमत देण्याची गरज नाही, म्हणत व्यवस्थेची जी रग त्यांना अनुभवावी लागते त्याचे काय?
मोदींना जे मॅन्युफॅक्चिरग अपेक्षित आहे त्यात भारतीय अमेरिकनांचा वाटा किती असेल हेही तपासून पाहावे लागेल. कारण त्यातील कित्येक सॉफ्टवेअर क्षेत्रातीलच आहेत व स्वत:च्या वकुबातील ‘प्रॉडक्ट’ निर्माण करण्याच्याही कोणी फारसे फंदात पडत नाहीत. त्या औद्योगिक निर्मिती वकुबाचे जे भारतात ‘मागे’ राहिलेले आहेत त्यांच्याकरिता ही आर्थिक गुंतवणूक मिळाली तरी बरेच साध्य होईल व मोदी नामाचा गजर कृतीत उतरला असे म्हणता येईल!
सतीश पाठक, कोथरूड, पुणे
जनतेऐवजी स्वार्थाकडे..
गेला महिनाभर महाराष्ट्रात जी राजकीय उलथापालथ चालू आहे ती पाहून २८ सप्टेंबरच्या अंकातील मुख्य बातमीस दिलेल्या ‘महाबजबजपुरी’ या शीर्षकाची सार्थकता पटली. गेल्या काही दिवसांत सत्तापिपासू नेत्यांची ज्या प्रकारे पक्षांतरे झाली ती पाहून प्रचंड चीड येत होती. काहींनी तर अनेक वष्रे एखाद्या पक्षात काढून, मोठमोठी पदे उपभोगून यंदा उमेदवारी नाही म्हणून किंवा दुसऱ्या पक्षातून निवडणूक लढवणे सोपे जाईल म्हणून पक्षांतरे केली. या कोलांटउडय़ा बघताना सर्व जागरूक नागरिकांना मनस्ताप झाला असेल यात शंका नाही.
बातमीत म्हटल्याप्रमाणे भाजपने सर्वाधिक नेते आयात केले आहेत, हे कृत्य त्यांच्या ‘पार्टी विथ अ डिफरन्स’ या ब्रीदवाक्यास विरोधाभासी वाटले. ज्या नेत्यांनी निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतरे केली आहेत ती केवळ स्वत:च्या फायद्यासाठी केली आहेत हे उघड आहेच. हे असे नेते निवडून आले तरीही ते जनतेपेक्षा स्वत:चाच स्वार्थ बघतील, असे वाटते.
कुशल जगताप, ठाणे.
राज यांना कदमांची माया दिसली नाही?
‘उद्धव ठाकरे व्यक्तिश: चांगले असले तरी त्यांच्यात राजकारणी व्यक्तीस आवश्यक परिपक्वतेचा अभाव आहे,’ असे भाजपचे एकनाथ खडसे यांनी केलेले वक्तव्य पटले. याच अर्थाचे उद्गार राज ठाकरे यांच्याविषयी काढले तरी ते बरोबर ठरतील. गेली कित्येक वष्रे मनसेत राहून कोटय़वधी रुपयांची माया जमवणारे राम कदम ज्या राज ठाकरे यांना परवापर्यंत दिसले नाहीत, ते राज ‘माझ्या हाती सत्ता द्या, मग मी हे करीन आणि ते करीन’ असे म्हणतात, तेव्हा तेसुद्धा किती अपरिपक्व आहेत याचे प्रचीती येते.
प्रदीप खांडेकर, माहीम (मुंबई)
बाळासाहेबांनी ‘लाथाडण्या’चा प्रश्नच येऊ दिला नसता..
‘बाळासाहेबांनी भाजपला लाथाडले असते’ हे वृत्त (लोकसत्ता, २९ सप्टें.) वाचले. ‘मनसे’ची प्रचार सभा म्हणजे राज यांच्याकडून उद्धव आणि शिवसेना यांच्यावर टीकास्त्र सोडले जाण्याची जागा एवढाच अर्थ आता उरला आहे. शिवसेना व भाजप दुरावल्यामुळे कदाचित या दोन पक्षांची दिलजमाई होईल अशी समस्त मराठी मनाला (वेडी) आशा वाटत होती, पण राज यांच्या अहंकारी वक्तव्यामुळे ती आशा हवेत विरली आहे.
शिवसेनाप्रमुख आज हयात असते तर त्यांनी केंद्रीय मंत्रिपदावर लाथ मारून युती तोडली असती हे राज यांचे म्हणणे पटत नाही. लोकसभा निवडणुकीतील अनपेक्षित यशाने अतिआत्मविश्वासाने फुरफुरणाऱ्या भाजप नेत्यांना बाळासाहेबांसमोर असले नसते औद्धत्य दाखविण्याचे धाडस झालेच नसते. आणि झाले असतेच तर बाळासाहेबांनी आपल्या खास ठाकरी भाषेत त्यांना असा जालीम जमालगोटा दिला असता की युती तोडण्याचा विचार त्यांनी तात्काळ सोडून दिला असता.
राहता राहिला प्रश्न आमदार पळविण्याचा! मनसेचा एक आमदार भाजपने पळविला म्हणून राज यांनी एवढी आदळआपट का करावी हे समजत नाही. साधनशुचितेचा पुळका आलेल्या मनसेने नाशिकमध्ये सत्ता हातची जाऊ नये म्हणून राष्ट्रवादीच्या गळ्यात कसे गळे घातले हा इतिहास फार काही जुना नाही.
उदय दिघे
केळकर यांची परंपरा अनास्थेने क्षीण केली
‘अभ्यासक्रमात अशोक केळकर यांचे योगदान’ हे विजय कोचरे यांचे पत्र (लोकमानस २३ सप्टें.) वाचले. साठ-सत्तरच्या दशकांत डॉ. अशोक केळकर, डॉ. स. गं. मालशे यांनी आयोजित केलेल्या प्रशिक्षण वर्गाचे आणि चर्चासत्रांची आठवण या निमित्ताने झाली.
पुण्याच्या ‘डेक्कन इन्स्टिटय़ूट’मध्ये आधुनिक भाषाविज्ञानावर एका महिन्याचा प्रशिक्षण वर्ग डॉ. अशोक केळकर यांनी आयोजित केला होता. ज्या प्राध्यापक- शिक्षकांनी आधी परंपरागत अभ्यासक्रमातील व्याकरण शिकविले होते, अशा प्राध्यापकांना डॉ. अशोक केळकर यांनी भाषा विज्ञानातील रूपीम, पदीम, स्वनिम या संकल्पनांचे इंग्रजी, मराठी, गुजराथी, हिंदी भाषांतील समर्पक उदाहरणे देऊन स्पष्टीकरण केले. त्याचे इंग्रजीतील अध्यापन, अपरिचित पाठय़विषय आणि आधुनिक दृष्टीचा अभाव यामुळे आधुनिक भाषा विज्ञान अध्यापकांना कठीण वाटत असे. पुढे मात्र डॉ. मालशे यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी उपयोजित अभ्यासक्रम एस. एन. डी. टी. विद्यापीठात सुरू झाला. वृत्त भाषांतर, अनुवादित साहित्य, मुलाखत, जाहिरात, स्त्री समस्याप्रधान साहित्य हे अभ्यास विषय नेमण्यात आले. ‘भाषा विज्ञान’ शिकविताना स्वतंत्र पाठय़पुस्तके उपलब्ध नव्हती. डॉ. ना. गो. कालेलकर, श्री. न. गजेंद्रगडकर यांची पुस्तके प्रसिद्ध झाली होती. डॉ. केळकर यांचे सुटे लेख संदर्भासाठी उपयोगी ठरत. मराठीतर भाषा हिंदी-गुजराथी, इंग्रजीमधील आदानप्रदानासाठी भाषा विज्ञानाचा अभ्यास उपयुक्त ठरे. डॉ. विजया चिटणीस-माडगूळकर यांनी डॉ. केळकरांच्या सहकार्याने ‘व्यावहारिक मराठी’ विषयावर फेब्रु. १९८० मध्ये चर्चासत्र आयोजित केलेलेही स्मरते. व्यवहारात मराठी अनेक स्तरांवर वापरली जाते. संशोधक स. गं. मालशे यांना आधुनिक समीक्षापद्धती, शैली विज्ञान, १९ व्या शतकातील स्त्री समस्या, संशोधन प्रक्रियेचे स्वरूप इ.बद्दल साऱ्याच सहभागींना कुतूहल होते.
अर्धशतकापूर्वीची संशोधक-मार्गदर्शकांची परंपरा पूर्णत: खंडित झाली आहे, असे म्हणता येणार नाही. मात्र ही व्यासंगी-ज्ञानलालसा शिक्षकांची परंपरा उत्तरोत्तर क्षीण होत चालली आहे. केवळ अध्यापन नव्हे, तर मराठी भाषा आणि साहित्याविषयी असलेल्या अनास्थेमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
– वि. शं. चौघुले, विलेपार्ले पूर्व (मुंबई)