‘अलीबाबा आणि आपलं पोर’ हा गिरीश कुबेर यांचा लेख (लोकसत्ता, २० सप्टें.) वाचला. चिनी सन्याची घुसखोरी आणि चिनी मालाने ओसंडून वाहणाऱ्या आपल्या बाजारपेठा यांच्या इतकाच किंवा अधिक धोका अलीबाबाच्या वेबसाइटकडूनही भविष्यात संभवतो असे वाटत नाही.
पहिले कारण म्हणजे खरेदी-विक्रीकरिता वापरली जाणारी कुठलीही वेबसाइट ही मध्यस्थ, अडते, दलाल यांना बाजूला ठेवून व्यवहार करण्यासाठीच असते. समभागांपासून विविध वस्तूंपर्यंत सर्व काही अशा स्वरूपात मूळ उत्पादकाकडून किंवा एकमेकांत थेट व्यवहार करून देता-घेता येण्याची सोय सध्याच उपलब्ध आहे. तेव्हा ही शिळीच संकल्पना वापरून अलीबाबाने नक्की कशाच्या जोरावर इतकी उडी मारली आहे हा प्रश्नच आहे. चीनमध्ये उगम पावणाऱ्या व्यवहारांवर अलीबाबाची फार मोठी भिस्त आहे आणि चीनचा एकूण पारदर्शकपणा पाहता हे विशेष उल्लेखनीय म्हणावे लागेल.
दुसरे कारण म्हणजे एखाद्या कंपनीचे मूल्यांकन किंवा पतमापन (अगदी अमेरिकेतसुद्धा) नक्की कसे होते हे गूढच आहे असे वाटते. सप्टेंबर २००८ मध्ये मंदीच्या तडाख्याने नामशेष होण्यापूर्वी अगदी काही दिवस अगोदपर्यंत या पतमापन क्षेत्रातील किती तरी विश्वविख्यात कंपन्या कसे नाकाने कांदे सोलत होत्या याचा प्रत्यक्ष अनुभव त्या काळी अमेरिकेमध्ये असलेल्या अनेकांनी घेतला असेल. भांडवली बाजारातील अनेक ‘धूर्त धोरणी’ लोकांना दर काही वर्षांनी नवनवीन बुडबुडे निर्माण करून अनेकांना गंडा घालण्याची सवयच असते. त्यामुळे मग एखादी कंपनी हेरून एकसुरात सगळे  ‘अहो रूपं, अहो ध्वनि’ करू लागतात. त्यातलाच हा प्रकार नसेल असे ठामपणे म्हणता येत नाही. एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीला तथाकथित ‘डॉट कॉम बूम’मध्ये अशा अनेक कंपन्या अक्षरश: कुत्र्याच्या छत्र्यांप्रमाणे कशा उगवल्या, त्यांचा किती गवगवा झाला, त्यांचे त्या काळातील मूल्यांकन किती होते आणि नंतर त्यांचे काय झाले हे अनेकांच्या लक्षात असेल. जगभरातील बाजारपेठांमध्ये चिनी वस्तू ओसंडून वाहत असतात त्याप्रमाणेच माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात भारतीय अभियंते बहुसंख्येने आढळून येतात. त्या क्षेत्रातही मुसंडी मारण्याची चीनची महत्त्वाकांक्षा असणारच आणि त्याकरिता नानाविध क्लृप्त्याही केल्या जाणारच. कोणताच धोका कमी लेखू नये हे खरे आहेच, पण अलीबाबामुळे डोळे दिपून जाण्याचीही काही गरज नाही.. ते उघडेच असलेले बरे!
प्रसाद दीक्षित, ठाणे

गुजरातचा यशस्वी फंडा आता महाराष्ट्रात!
‘उल्लू बनाविंग’ आणि ‘मिळमिळीत सौभाग्यापेक्षा..’  हे दोन्ही अग्रलेख (लोकसत्ता,  २२ व २३ सप्टें.) वाचले. उत्तर प्रदेशात लोकसभेच्या ७८ पकी ७२ जागा मिळाल्यावर अमित शहांचा उदोउदो झाला.  जर संघटना इतकी मजबूत बांधली गेली असती तर पोटनिवडणुकीत भाजपला अस्मान दिसलं नसतं. म्हणूनच शहांचा विजयी रथ महाराष्ट्रात नुसताच जमिनीवर आला नाही, तर आकडय़ांच्या चिखलात रुतला.एका अर्थाने भाजपच्या फुग्याला टाचणी लागली हे सर्वाच्याच दृष्टीने चांगले झाले. कारण डोक्यात उन्मादवायू गेल्याप्रमाणे उत्तरप्रदेशी भाजपीय ‘लव्ह जिहाद’ ते ‘पाकिस्तानात पाठवा’ अशा अतिरेकी घोषणा बेमुर्वतखोरपणे करीत होते. अर्थात सेक्युलरिझमच्या नावाखाली लंबक इतका एका बाजूला गेला होता की तो तितकाच दुसऱ्या बाजूला जाणे हा शास्त्रीय नियमच आहे. नव्या शासनामुळे जसं एकाच जमातीचं लांगूलचालन होणार नाही याची खात्री आहे, तसंच त्यांच्यावर अन्याय होणार नाही यात त्या पक्षाच्या अध्र्वयूनी लक्ष घालणे हाच ‘राजधर्म’ आहे. भाजपीय इतर पक्षांप्रमाणे मतदारांना टोप्या तर घालतच आहेत, त्याबरोबर खेकडय़ांप्रमाणे एकमेकांच्या पायात पाय घालण्याचे कसबदेखील त्यांनी आत्मसात केले. त्याची चुणूक म्हणजे तावडेंचं ‘पंकजा मुख्यमंत्री व्हाव्यात’ हे वाक्य. ज्याप्रमाणे औद्योगिक क्षेत्रात अ‍ॅक्विझिशन हा वाढीचा सोपा मार्ग समाजला जातो, तसेच आता राजकीय पक्षांचे झाले आहे.  दुसऱ्या पक्षातील नेते गळाला लावून पक्ष वाढवणे हा मोदी-शहा जोडगोळीचा गुजरातमध्ये यशस्वी झालेला हातखंडा होता. तोच फंडा वापरून इथे भाकडभरती चालू आहे. असो. जोपर्यंत राज्य भाजपत सामान्य वकुबाचे नेते आहेत, तोपर्यंत राजकीय  अन्नछत्रात काँग्रेस-राष्ट्रवादीचे ओरपणे चालूच राहणार.
सुहास शिवलकर, पुणे</strong>

बौद्धिक राडेबाजी!
‘मिळमिळीत सौभाग्यापेक्षा..’ हा अग्रलेख (२३ सप्टेंबर) वाचला. शाखांमधून बौद्धिके घेणे आणि मराठी अस्मितेच्या नावाखाली राडेबाजी करणे अशी ओळख असलेल्यांनी पत्रिका, गुण, गोत्र जुळत नसताना २५ वष्रे कण्हत, कुथत, धुसफुस, कुरबुरी सहन करत संसार केला तो एकमेकांच्या कुबडय़ांची गरज होती म्हणून. पण ‘वाघ्याचा पाग्या झाला तरी येळकोट जाईना’ अशी त्यांची अवस्था झाल्याचे दिसते.
आता एकमेकांची गरज नसल्याचा आव आणून स्वतंत्र होण्याची वल्गना करणाऱ्यांनी आपली कुवत काय आहे याचा विचार न करता जी बौद्धिक राडेबाजी चालवली आहे ती त्वरित थांबवावी. ‘वयं पंचाधिक शतम्’ हे विसरून शत्रूशी लढण्याचे सोडून एकमेकांशी लढल्याने काय होते हे कायम लक्षात ठेवावे.
चिदानंद पाठक, पुणे

मुंडेंपेक्षाही पंकजाच्या यात्रेला अधिक प्रतिसाद!
‘उल्लू बनाविंग’ हा अग्रलेख (२२ सप्टें.) वाचला . अग्रलेखातील पंकजा मुंडे यांचाविषयी मांडलेली मते खटकली. त्यांनी काढलेल्या संघर्ष यात्रेची दखल घेण्याची गरज नाही, अशी टिप्पणी अग्रलेखात आहे. लेखकाने या यात्रेत सहभागी होऊन अनुभव घेतला असता तर त्यांच्या लक्षात आले असते की पंकजाताईंना ऐकण्यासाठी किती प्रचंड गर्दी होत होती.  किंबहुना मुंडेसाहेबांनी काढलेल्या यात्रेपेक्षाही जास्त प्रतिसाद पंकजा यांच्या यात्रेला मिळाला आहे. आपल्या वृत्तपत्रातही सातत्याने यात्रेच्या बातम्या येत होत्या. तसेच विनोद तावडे व देवेंद्र फडणवीस यांनी केलेली विधानेही योग्यच होती, असे मला वाटते.
महादेव जायभाये, काकडहिरा, जि. बीड

वास्तववादी राहिले तरी..
महात्मा गांधी यांच्या हत्येच्या कटात स्वा. सावरकर यांचा सहभाग असल्याच्या संशयावरून त्यांच्यावर खटला चालू होता व सावरकर यांची बाजू न्यायालयात भिडे वकील मांडत होते.  सावरकर यांच्या मनात आपल्याला शिक्षा होईल की काय याची सारखी चिंता वाटत होती. त्यामुळे ‘मला शिक्षा तर नाही ना होणार? झाल्यास किती होईल’ असे प्रश्न सावरकर हे भिडे वकिलांना येता जाता विचारत. परंतु सावरकर यांना शिक्षा होणार नाही, असा  दिलासा भिडे देत राहिले आणि शेवटी तसेच झाले.  कालांतराने  कामानिमित्त मुंबईला आलेल्या भिडे यांना  सावरकर यांना भेटावे असे वाटले आणि ते सावरकर सदन येथे गेले. तेथे त्यांनी आपली ओळख सांगून सावरकर यांची वाट पाहत बाहेर बसले. काही वेळाने आतून भिडे यांना सांगितले गेले की, ‘सावरकर घरी नाहीत, ते काही कामासाठी बाहेर गेले आहेत. भिडे यांना आम्ही ओळखत नाही.’  वास्तविक तेव्हा  सावरकर घराबाहेर पडूही शकत नव्हते.  सावरकर वास्तववादी असतीलही परंतु त्यांचे असे करणे कोणत्या व्यक्तिविशेषणात बसते?
श्रीराम गुलगुंद, कांदिवली, मुंबई

आकाशवाणी  आणि मराठी
आकाशवाणीवरून दररोज तीन वेळा मराठीतून बातम्या दिल्या जातात. या   बातम्या वाचणाऱ्या निवेदिका- पंतप्रधान मोदी म्हणाली, गृहमंत्री राजनाथ सिंह म्हणाली- असा  सरसकट िलगबदल करतात.हिंदी बातम्यांमध्ये असलेल्या वाक्यरचनांचं तंतोतंत भाषांतर केल्यामुळे हे होत असावं. परंतु प्रत्येक भाषेचे नियम वेगळे असतात. हिंदीतील ‘पुलिस आयी’ हे  वाक्य मराठीत आणताना मराठी व्याकरणाचे नियम लावणे आवश्यक आहे. त्यामुळे ‘पोलीस आले’ असंच वाचण्याची आवश्यकता आहे. अर्थात, हे माझं अरण्यरुदनच ठरणार आहे.
– आनंद पत्की, दादर , मुंबई

Story img Loader