‘अलीबाबा आणि आपलं पोर’ हा गिरीश कुबेर यांचा लेख (लोकसत्ता, २० सप्टें.) वाचला. चिनी सन्याची घुसखोरी आणि चिनी मालाने ओसंडून वाहणाऱ्या आपल्या बाजारपेठा यांच्या इतकाच किंवा अधिक धोका अलीबाबाच्या वेबसाइटकडूनही भविष्यात संभवतो असे वाटत नाही.
पहिले कारण म्हणजे खरेदी-विक्रीकरिता वापरली जाणारी कुठलीही वेबसाइट ही मध्यस्थ, अडते, दलाल यांना बाजूला ठेवून व्यवहार करण्यासाठीच असते. समभागांपासून विविध वस्तूंपर्यंत सर्व काही अशा स्वरूपात मूळ उत्पादकाकडून किंवा एकमेकांत थेट व्यवहार करून देता-घेता येण्याची सोय सध्याच उपलब्ध आहे. तेव्हा ही शिळीच संकल्पना वापरून अलीबाबाने नक्की कशाच्या जोरावर इतकी उडी मारली आहे हा प्रश्नच आहे. चीनमध्ये उगम पावणाऱ्या व्यवहारांवर अलीबाबाची फार मोठी भिस्त आहे आणि चीनचा एकूण पारदर्शकपणा पाहता हे विशेष उल्लेखनीय म्हणावे लागेल.
दुसरे कारण म्हणजे एखाद्या कंपनीचे मूल्यांकन किंवा पतमापन (अगदी अमेरिकेतसुद्धा) नक्की कसे होते हे गूढच आहे असे वाटते. सप्टेंबर २००८ मध्ये मंदीच्या तडाख्याने नामशेष होण्यापूर्वी अगदी काही दिवस अगोदपर्यंत या पतमापन क्षेत्रातील किती तरी विश्वविख्यात कंपन्या कसे नाकाने कांदे सोलत होत्या याचा प्रत्यक्ष अनुभव त्या काळी अमेरिकेमध्ये असलेल्या अनेकांनी घेतला असेल. भांडवली बाजारातील अनेक ‘धूर्त धोरणी’ लोकांना दर काही वर्षांनी नवनवीन बुडबुडे निर्माण करून अनेकांना गंडा घालण्याची सवयच असते. त्यामुळे मग एखादी कंपनी हेरून एकसुरात सगळे ‘अहो रूपं, अहो ध्वनि’ करू लागतात. त्यातलाच हा प्रकार नसेल असे ठामपणे म्हणता येत नाही. एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीला तथाकथित ‘डॉट कॉम बूम’मध्ये अशा अनेक कंपन्या अक्षरश: कुत्र्याच्या छत्र्यांप्रमाणे कशा उगवल्या, त्यांचा किती गवगवा झाला, त्यांचे त्या काळातील मूल्यांकन किती होते आणि नंतर त्यांचे काय झाले हे अनेकांच्या लक्षात असेल. जगभरातील बाजारपेठांमध्ये चिनी वस्तू ओसंडून वाहत असतात त्याप्रमाणेच माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात भारतीय अभियंते बहुसंख्येने आढळून येतात. त्या क्षेत्रातही मुसंडी मारण्याची चीनची महत्त्वाकांक्षा असणारच आणि त्याकरिता नानाविध क्लृप्त्याही केल्या जाणारच. कोणताच धोका कमी लेखू नये हे खरे आहेच, पण अलीबाबामुळे डोळे दिपून जाण्याचीही काही गरज नाही.. ते उघडेच असलेले बरे!
प्रसाद दीक्षित, ठाणे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा