डॉ. अशोक केळकर यांच्या निधनाची वार्ता वाचताना मला १९७४ साली तेव्हाच्या पुणे विद्यापीठातल्या तीन आठवडय़ांच्या मराठी नवभाषाविज्ञान शिबिराची आठवण झाली. त्या वेळी १०० गुणांच्या पेपरात २० गुण वाङ्मयीन निबंध, ४० गुण पारंपरिक व्याकरण आणि ४० गुण जुजबी भाषाशास्त्र अशी मांडणी होती. ती बदलून नवं वर्णनात्मक भाषाविज्ञान आणण्याचा घाट घातला गेला. केळकर सर आम्हाला प्रशिक्षण देण्यासाठी येत. त्यांची स्वनिम, पदिम, रुपिम ही परिभाषा नव्या प्राध्यापकांना थोडीफार उमगायची आणि जुन्यांच्या डोक्यावरून जायची. केळकर सर मात्र स्थितप्रज्ञ मुनीप्रमाणे संथपणानं वर्गात यायचे व नवभाषा विज्ञान सोपं करून सांगण्याचा प्रयास करायचे. जुनी मंडळी त्यांचा मान राखून हुज्जत घालायची. सर शांतपणे निरूत्तर करायचे, तरीही अधूनमधून उभयपक्षी क्षोभ व्हायचा. इतर प्रशिक्षकांमध्ये डॉ ना. गो. कालेलकर, मु. श्री. कानडे, रा. शं. वािळबे आदींचा समावेश होता. या सगळ्यांमध्ये केळकर सरांची वैचारिक शिस्त, पद्धतशीर विषयमांडणी, फलकलेखन, आग्रही प्रतिपादन नव्या प्राध्यापकांना आदर्शवत वाटायचे. शंका पडल्या तरी विचारायचा धीर व्हायचा नाही, असा त्यांचा अनोखा दरारा व दबदबा होता!
त्यांनी डॉ. रा. भा. पाटणकर, गंगाधर पाटील, म. सु. पाटील यांच्या सहकार्यानं एम.ए. समीक्षाशास्त्राचा अभ्यासक्रम तयार केला. तो पुढील काही वर्षांतच पार पचपचीत करण्यात आला!
विजय काचरे, कोथरुड, पुणे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा