‘पोरकट आणि प्रौढ’ हा अग्रलेख (२१ ऑक्टो.) वाचला. राजकारण, समाजकारण, विकास वगरे गोष्टी अर्थकारणाच्या आसाभोवती कशा फिरतात याची जाणीव हा अग्रलेख वाचकांना देतो. अकारण अस्मिता फुलवली की विकास आणि आíथक उन्नत्ती पूर्णपणे थांबते हे मराठी माणसास कोणी तरी सांगावयास पाहिजेच होते. अकारण फुलवलेल्या अस्मितेमुळे बेळगाव (की ‘बेळगावी’) हे राष्ट्रीय महामार्गावर आणि प्रमुख लोहमार्गावर असूनसुद्धा त्याचा विकास गोठलेला आहे. हे दिसत असूनही, आपल्याच मराठी माणसांना देशोधडीला लावणारे अस्मितेचे राजकारण शिवसेनेने आणि मनसेने सोडले नाही; तर मतदारांना आपापसात झुंजवण्याचे, आरक्षणाचे गाजर दाखविण्याचे जुनेच राजकारण काँग्रेसने/राष्ट्रवादीने कायम ठेवले.
परिस्थिती बदललेली आहे, तरुणवर्ग अस्मितेचे, जातीय आरक्षणाचे, प्रादेशिकतेचे राजकारण फेकून देऊ इच्छितो. त्याला आíथक प्रगती खुणावत आहे. हे वास्तव ना काँग्रेसने/राष्ट्रवादीने लक्षात घेतले ना शिवसेनेने. त्याचा परिणाम या निवडणुकीत दिसून आलाच. बदललेली परिस्थिती चाणाक्षपणे हेरली ती शरद पवारांनी. ‘मोदी स्नाना’ची वेळ आलेली आहे हे ओळखून तातडीने आपला पाठिंबा भाजपला जाहीर करून येण्याऱ्या आíथक गंगेत त्यांनी आपल्या स्नानाची सोय लावली. शिवसेनेच्या लघुदृष्टी ‘ध्रुतराष्ट्राने’ ‘संजय’च्या चष्म्यातून कुरुक्षेत्रातील परिस्थिती अवलोकन करण्याऐवजी निर्णय स्वत: घेतले तर(च) ‘शिववडय़ा’च्या पुढील प्रगतीत शिवसेनेला सहभागी होता येईल. पण फक्त कालबाह्य़ मराठी अस्मितेला शिवसेना कवटाळून बसेल, तर शिवसेनेची मनसे व्हावयास वेळ लागणार नाही.
नरेन्द्र थत्ते, अल-खोबर (सौदी अरेबिया)
भाजप-शिवसेनेने एकत्र येऊन महाराष्ट्राला मोठे करावे!
भाजप व शिवसेनेने आपापली सर्व शक्ती पणाला लावूनदेखील नियतीने (जनतेने) त्यांना पुन्हा एकदा एकत्र येण्याचाच कौल दिला आहे. स्वतंत्रपणे वाढण्याचे त्यांचे प्रयत्न खूप प्रामाणिक होते, पण जनतेला त्यांचे विलगीकरण अमान्य होते. आजवर महाराष्ट्राच्या जनतेने यांना मोठे केले व एक संधी यांच्या दारापाशी आज आणून ठेवलेली आहे. या संधीचा स्वीकार करत, गुण्यागोिवदाने कामाला लागणे यातच त्यांचे हित आहे. २५ वर्षांत पहिल्यांदा ते वेगळे झाले पण केवळ २५ दिवसांत लोकांनी त्यांना पुन्हा एकत्र येण्यासाठीचा कौल दिला. याचा अर्थ, एकमेकांना साथ देत दोघे मोठे झालात आता दोघे एक होऊन महाराष्ट्राला मोठे करा, हेच जनतेला सांगायचे आहे. या निवडणुकीत जनतेने प्रत्येकाला प्रत्येकाच्या कुवतीप्रमाणेच दिलेले आहे. यापुढे देण्या-घेण्यावरून कोणीही आपली कुवत विसरू नये यासाठीचा हा एक मापदंड आहे.
पुन्हा एकत्र येताना स्वाभिमान जरूर जपावे पण अहंकार नको.. यांचा अहंकार महाराष्ट्रापेक्षा मोठा नाही याची जाणीव लोकांनी दिलीच, इतके होऊनही तसेच वागायचे ठरवल्यास ‘जाणता राजा’ व ‘बोलके ठाकरें’सारखी अवस्था व्हायला वेळ लागणार नाही याचीही कल्पना असेलच.
गरजेपेक्षा जास्त संख्याबळ जनतेने या दोघांना मिळवून दिले. आता दोघांनी थोडा समजूतदारपणा दाखवण्याची गरज आहे. जागावाटपावेळी झालेला कर्मदरिद्रीपणा खातेवाटपावेळी करू नये. अटींच्या नावाखाली कोणीही आडकाठी करू नये. एकमेकांना पाण्यात पाहण्याचे थांबवून राज्यातील पाणीप्रश्नाकडे थोडेसे गांभीर्याने पाहावे. राजकारण जरूर करावे पण सूडाचे नको, विकासाचे!
उमेश स्वामी, अल्जेरिया
राष्ट्रवादीचे सहकार्य घेण्यात गैर काय?
भाजपला महाराष्ट्रात विस्तार करण्यात शिवसेना हाच एकमेव अडसर आहे; त्या अर्थाने शिवसेना हाच भाजपचा प्रमुख शत्रू आहे. शिवसेनेशी युती झाली तर मोदी सरकारला महाराष्ट्राच्या भल्यासाठी अनेक निर्णय घेण्यात अडथळा येईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मोठी मेहनत करून भाजपच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी जे यश मिळविले त्यात शिवसेनेला मोठा वाटा द्यावा लागेल. सेनेच्या संभाव्य अकार्यक्षमतेची जबाबदारीही भाजपला स्वीकारावी लागेल.
भाजप आणि राष्ट्रवादीच्या अनेक भूमिका समान आहेत. राष्ट्रवादीचे सर्व आमदार िहदू आहेत आणि ते सरकारमध्ये सहभागीही होणार नाहीत, त्यांची आíथक धोरणे समान आहेत. त्यामुळे सरकारच्या निर्णयावर प्रतिकूल परिणाम होणार नाही. राष्ट्रवादीच्या तथाकथित भ्रष्टाचाराचा सरकारच्या कामावर काहीही परिणाम संभवत नाही. सामाजिक अभिसरणाची प्रक्रिया भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र आल्याने अधिक व्यापक होईल. या दोन पक्षांचे टय़ूनिंगही जुळलेले आहे, हेही बघितले पाहिजे. राष्ट्रवादीमधील अनेक नेते भाजपमध्ये यापूर्वीच आलेले आहेत. लवासासारखी विकसित शहरे निर्माण करावीत, अशी दोन्ही पक्षांची भूमिका आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे वेगळ्या विदर्भाला राष्ट्रवादीचा विरोध नाही. मोदी सरकारच्या केंद्रीय निर्णयांवरही त्यांचा आक्षेप नाही. शरद पवारांनी सोनिया गांधींच्या राष्ट्रीयत्वावर प्रश्नचिन्ह लावले होते. तीच भूमिका भाजपचीही होती. मोदी सरकारचा गांधीवाद, पटेलवाद, विवेकानंदांचे वैश्विक िहदुत्व हे सर्व राष्ट्रवादीलाही मान्य आहेच. शिवाय राष्ट्रवादी काँग्रेसशी जवळीक वाढली तर त्यांच्या माध्यमातून ओबीसींप्रमाणेच मराठा समाजही भाजपशी जोडला जाईल. १९८०च्या दशकात शरद पवारांच्या नेतृत्वाखाली पुलोद अघाडी होती, त्यात भाजप एक घटकपक्ष होता.
थोडक्यात म्हणजे, केवळ शुद्ध राजकीय भूमिकेतूनच नव्हे तर, कार्यक्षम, निर्णयक्षम, परिणामकारक शासन देण्याच्या दृष्टिकोनातूनही राष्ट्रवादीचा पाठिंबा घेणे भाजपला लाभदायक ठरणार आहे. दीर्घकालीन सामाजिक अभिसरणाचा विचार केल्यास अशी नवी सरमिसळ होणे अधिक उपकारक ठरणार आहे. हाच व्यापक विचार करून या दिशेने पावले टाकणे आवश्यक आहे. भाजपने राष्ट्रवादीचा पाठिंबा घेण्यात, सध्याची राजकीय परिस्थिती पाहता काहीही गर नाही.
बाळासाहेब सराटे, औरंगाबाद</strong>
इंडोनेशियातील संस्कृत घोषवाक्ये
व्यक्तिवेध या सदरात जोको विडोदो यांच्याबद्दल लिहिताना (२१ ऑक्टो.) ‘जलस्वेव जयामहे’ असे इंडोनेशियाच्या नौदलाचे घोषवाक्य असल्याचे सांगितले आहे. ते वाक्य खरे तर ‘जलेष्वेव जयामहे।’ असे आहे. जलेषु हे जल या अकारान्त नपुंसकिलगी शब्दाच्या सप्तमीविभक्तीचे एकवचन आहे. जल या शब्दाने इथे समुद्र असा अर्थ अभिप्रेत आहे. त्यामुळे या घोषवाक्याचा ‘समुद्रावर आम्हीच विजयी होतो’ असा अर्थ अभिप्रेत असावा. इंग्रजीत ष असा उच्चार नसल्यामुळे त्यासाठी शास्त्रीय ग्रंथात २ हे रोमन अक्षर लिहून त्याखाली टिंब देतात; तर सर्वसामान्य लेखनात २ हे अक्षर तसेच वापरतात. त्यामुळे त्याचा उच्चार गरसमजाने ‘जलेस्वेव जयामहे’ असा होऊ शकतो. इंडोनेशियातील काही घोषवाक्ये पाहा. ‘जलेषु भूम्यां च जयामहे’ (मरीन कोअर), ‘कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन’ (एअरफोर्स स्पेशल फोस्रेस कोअर), राष्ट्रसेवकोत्तम (राष्ट्रीय पोलीस), त्रिसन्ध्या-युद्ध (पायदळ), धर्म-विचक्षण-क्षत्रिय (पोलीस प्रबोधिनी),द्वि-शक्ति-भक्ति (इक्विपमेंट कोअर), सत्य-वीर्य-विचक्षणा (सनिकी- पोलीस). एक मुद्दा लक्षात घ्यावा की इथे धर्म या शब्दाचा इंग्रजीतील रिलिजन असा चुकीचा अर्थ न घेता ‘कर्तव्य’ हा संस्कृतातील योग्य अर्थ गृहीत आहे.
दीनानाथ सावंत
गरम पाण्याचा घोट!
‘हाँगकाँगच्या आंदोलनात चीनचे भवितव्य’ हा परिमल माया सुधाकर यांचा लेख (२१ ऑक्टो.) हाँगकाँगबाबत साम्यवादी चीनची झालेली द्विधा मन:स्थिती सामोरी आणणारा आहे. चीनमध्ये सामान्य माणसाला उघडपणे मत व्यक्त करता येत नाही, पण हाँगकाँगची गोष्ट वेगळी आहे ती आधी ब्रिटिश वसाहत असल्याने तिथल्या जनतेला लोकशाही म्हणजे काय हे तत्त्वत: माहीत आहे आणि कम्युनिस्ट विचारसरणी त्यांना मान्य होणे कठीण आहे. त्यामुळे त्यांच्या कलाने घेतल्यास चीनची जनता त्यातून स्फूर्ती घेऊन बंड करू शकते व हाँगकाँगच्या जनतेला दडपण्याचा प्रयत्न चीनला जागतिक स्तरावर हीन ठरवू शकतो.
थोडक्यात, हाँगकाँग हा चीनसाठी गरम पाण्याचा घोट आहे.. तोंडात ठेवला तरी त्रास आणि टाकायचा म्हटला तरी तोंड भाजणे चुकणार नाही.
– माया हेमंत भाटकर, चारकोप गाव (मुंबई)