‘‘भाषण’प्रधान!’ या शीर्षकाचे अवधूत जोशी यांचे पत्र (लोकमानस, ८ सप्टें.) वाचले.
शिक्षक, बी.एड्./ डी.एड्.धारकांची बेरोजगारी, नेट-सेट उत्तीर्णाना लागणाऱ्या ‘गांधीजीं’च्या (नोटांच्या) कुबडय़ा आणि राजकीय दबावाखाली होणाऱ्या कुलगुरूंच्या नेमणुका या सर्व समस्या शिक्षण क्षेत्रास भेडसावणे हे आपले दुर्दैवच आहे, मात्र ‘या प्रश्नांवर मोदींनी शिक्षक दिनी कोणताही धोरणात्मक निर्णय का घेतला नाही?’ या लेखकाच्या प्रश्नाचे उत्तर पत्रातच आहे.
शिक्षण क्षेत्राची ही दुरवस्था नव्या पिढीसमोर मांडल्यास त्या क्षेत्राबद्दल व त्यातील सक्रिय सहभागाबद्दल त्यांना कितपत आस्था, उत्साह राहिला असता? त्यामुळे प्राय: या क्षेत्राची चांगली बाजूच आधी मांडणे गरजेचे होते. नव्या पिढीला त्यातील सहभागासाठी प्रोत्साहन देणेच गरजेचे होते. आजची पिढी ही स्मार्ट आहे, भ्रष्टाचार वगरे गोष्टी सतत विविध माध्यमांतून त्यांच्या कानांवर पडतच असतात. याबाबत बोलण्यासाठी व कोणताही धोरणात्मक निर्णय जाहीर करण्यासाठी पंतप्रधानांना इतर व्यासपीठे आहेतच.
हा कार्यक्रम शालेय विद्यार्थ्यांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वानी पाहिला असला तरी त्याचा मुख्य उद्देश डॉ. राधाकृष्णन यांची शिकवण विद्यार्थ्यांसमोर मांडणे व मनात शिक्षण क्षेत्राबद्दल आस्था निर्माण करणे हा होता; त्यामुळे विद्यार्थ्यांच्या विकसनशील मनावर जास्तीत जास्त सकारात्मक गोष्टी िबबवण्यासाठीच आपल्या ‘प्रचंड अनुभवी’ पंतप्रधानांनी इतर गोष्टींचा उल्लेख टाळला असावा, असे मला वाटते व यासाठी त्यांचे टाळ्या वाजवून कौतुक करणे योग्यच ठरेल.
ऋता भिडे, ठाणे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा