स्वयंघोषित धर्मसंसदेने गेल्या शतकात होऊन गेलेल्या केवळ शिर्डी साईबाबांना लक्ष्य करत आसाराम बापू व अन्य अवतारांच्या बाबतीत सोयीस्कर मौन पाळलेले पाहता धर्मसंसदेचा खरा हेतू सहज ध्यानात येतो.
खरे पाहिल्यास शिर्डी साईबाबांनी स्वत:ला दैवी अवतार, परमेश्वर असे म्हणवून घेतल्याचा पुसटसा उल्लेखही नसताना त्यांना ते देव, गुरू नसून त्यांना मुसलमान म्हणत हिणवत समाजात विनाकारण सनसनाटी उत्पन्न करत गोंधळ माजवणे हे स्वत:ला शंकराचार्य म्हणवून घेणाऱ्या स्वरूपानंद यांना मुळीच गौरवास्पद नाही, किंबहुना ते त्याच्या असूयेचे दर्शन घडवणारे कृत्य आहे. धर्माबद्दल खराखुरा अभिमान दाखविण्यासाठी त्यांना समाजात बोकाळलेल्या भोंदुगिरीविरोधात बरेच काही करण्यासारखे आहे. माझा कुणीही वारसदार नसून मी एकटा आलो आणि एकटाच जाणार असे नि:स्पृहपणे सांगणाऱ्या शिर्डी साईबाबांना त्यांच्या जाण्यानंतर अनेक वर्षांनी अपमानित केले जाते आणि त्यांचा अवतार म्हणत समाजात भोंदुगिरी करणारे बापू मोकळे फिरतात, यासारखा दैवदुर्वलिास नाही! पूजाविधीसाठी श्रद्धाळूंकडून हजारो रुपये लुबाडणे, स्त्रीवर्गाच्या श्रद्धाळूपणाचा गरफायदा घेत त्यांना स्वत:च्या परिवारापासून दूर ठेवत त्यांचे नवे नामकरण करून, यांच्या कुटुंबीयांच्या गोत्राजागी आपले नाव लावायचे, त्यांच्या कुलदैवतांची नावे बदली करायची, असे कोणत्याही धर्मात न बसणारे (उपद्व्याप!) विधी साईबाबांचा अवतार म्हणवून घेणारा बापू पुणे-मुंबई व अन्य ठिकाणी साळसूदपणे करत असतो. अशा प्रकारास बळी पडलेल्यांना त्याच्या धर्मपत्नीची तसबीर कुलस्वामिनीचे प्रतीक म्हणून खरेदी करून घरात लावण्यास भाग पडले जाते. परंतु अमाप माया जमावणाऱ्या अशा व्यक्तीबाबत हे शंकराचार्य काहीच कसे बोलत नाहीत, असा प्रश्न मनात स्वाभाविकपणे आल्याशिवाय राहात नाही.
श्रीराम गुलगुंद, चारकोप (मुंबई)
उपक्रमांतून काय वाढवणार? बुद्धी की अंधानुकरण?
‘दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर ३५ हजार स्त्रियांनी केले अथर्वशीर्ष पठण’ या (‘लोकसत्ता’ नसलेल्या) विषयी पुरोमागी महाराष्ट्राचा नागरिक म्हणून खेद नोंदवावा असे वाटले. मुळात श्री गणपती हा १४ विद्या व ६४ कलांचा ईश आहे असे मानले जाते. यातून खरे तर बोध घेऊन लोकांच्या सर्जनशीलतेला वाव मिळेल असे उपक्रम व कार्यक्रम राबविणे अपेक्षित होते, पण असे होताना मात्र दिसत नाही. असे जर उपक्रम या गणेश मंडळांनी राबविले तर टिळकांचा सार्वजनिक गणेशोत्सवाचा कथित हेतू साध्य होण्याला झालीच तर मदतच होईल. त्याचप्रमाणे अथर्वशीर्ष, गायत्रीमंत्र वा तत्सम मंत्रांचे पठण व लेखन करावयास लावणे हे एकप्रकारे चाकोरीबद्ध गुलाम बनविण्यासारखे नाही काय? अशा प्रकारच्या कार्यक्रमांमुळे स्त्रियांना प्रसन्न वाटणे तर दूरच, पण एका ठिकाणी बसून मान, पाठ दुखणे, चक्कर येणे इ. त्रास होतात असेही अनुभव आहेत. दुसरा मुद्दा असा की केवळ स्त्रियांनीच का म्हणावे? या सर्वाची चिकित्सा आपण कधी करणार आहोत की नाही?
मंगेश घोडके, वांद्रे पूर्व (मुंबई)
हेही ढोंगच!
चित्रपट निर्माते, दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी श्रीगणेशाबाबत ‘मूर्खाना चतुर्थीच्या शुभेच्छा’, ‘जो देव स्वत:चे शिर वाचवू शकला नाही, तो इतरांचे रक्षण कसे काय करणार ?’ हे ट्विटरवर केलेले वक्तव्य चीड आणणारे आहे. गणेशभक्ती करणारे मूर्ख आणि त्यांना उपदेशाचे डोस देणारे वर्माच काय ते अतिशहाणे? दिशाभूल करणाऱ्या वक्तव्याचे पिल्लू सोडून प्रकरण अंगाशी आल्यावर माफीनाम्याचे नाटक करणे म्हणजे एकप्रकारचे ढोंगच आहे. भाविकांच्या श्रद्धास्थानांची टिंगल करणाऱ्या वर्मानी आपल्या कार्यकक्षेतच आपले ज्ञान पाजळावे. आपल्या चित्रपटांचा चाहता वर्ग व भक्त यांची कुठेच तुलना होणे केवळ अशक्य कोटीतील गोष्ट आहे. त्यामुळे आपल्या कोत्या बुद्धीतून जे विचार प्रक्षेपण होते ते आपल्या चाहत्यांसाठीच मर्यादित ठेवावे.
अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गरफायदा घेऊन मला काही तरी जास्त कळते, असे भासवण्याचा अतिशहाणपणा करणे म्हणजे आपण किती मर्यादित विचारांच्या चौकटीत रममाण होत आहोत हे लक्षात येते.
जयेश राणे, भांडुप (मुंबई)
.. उल्लेख मात्र गणपतीचा!
सदर श्लोक ही ‘गणेशज् प्रेयर’ असल्याचा उल्लेख ‘हिंदु व्हॉइस’ या गोरेगाव (मुंबई) स्थित संघटनेसाठी पी. देवमुथु यांनी संपादित, संकलित व प्रकाशित केलेल्या ‘ हिंदु प्रेयर्स- हिंदु प्रार्थनाएं’ नावाच्या पुस्तिकेत आहे. हिंदी-इंग्रजी भाषेतील या पुस्तिकेचे संपादक हेच ‘हिंदु व्हॉइस’ या नियतकालिकाचेही संपादक आहेत. अर्थात, सदर श्लोक हा विष्णुस्तुतीपर असल्याचा मूळ आक्षेप मान्य होण्याजोगा आहे, असा खुलासा डॉ. राजेंद्र बर्वे यांनी केला आहे.
ती स्तुती विष्णूची..
‘मनमोराचा पिसारा’ या सदरातील १ सप्टेंबरच्या पुष्पात डॉ बर्वे यांनी उद्धृत केलेला श्लोक मधुर आहे यात काही शंका नाही पण तो काहीसा अपरिचित आहे या त्यांच्या मताशी मी असहमत आहे .विष्णु सहस्त्रनाम म्हणणारे अनेक जण हा श्लोक रोज म्हणतात.. तो गणेश स्तुतीपर श्लोक नसून विष्णु स्तुतीपर श्लोक आहे.
डॉ. अनिल जोशी, पंढरपूर</strong>
ही सक्ती मागे घ्या
दूरचित्रवाणी संच, विद्युत जनित्रे (जनरेटर) भाडय़ाने घेऊन, थोडक्यात काय वाटेल ते करून, परवडत नसले तरी वाटेल तेवढे पसे खर्च करून (की वाया घालवून?) पंतप्रधान मोदी यांच्या भाषणाचे थेट प्रक्षेपण शाळांतून शिक्षक दिनी दाखवलेच पाहिजे, असा अट्टहासी आणि तद्दन हास्यास्पद आदेशच केंद्र सरकारने काढला आहे. हा अत्यंत अव्यवहार्य आणि हुकूमशाही प्रवृत्तीचा आदेश त्वरित मागे घेणे आवश्यक वाटते.
-श्री. वि. आगाशे, ठाणे</strong>