‘आंतरपॅथी संशोधन करायचे.. पण कोणी?’ हा डॉ. जगन्नाथ दीक्षित यांचा लेख (लोकसत्ता, २३ सप्टेंबर) वाचला. त्यामागील ‘खरी गरज आहे ती आंतरपॅथी संशोधनाची’ हे (विधान) संदिग्ध आहे.
एका उदाहरणावरून माझा मुद्दा स्पष्ट करतो. समजा, एखाद्या बुवाने सांगितले की, ‘अँपिसिलिनची पूड (=भस्म) दिवसातून तीन वेळा कपाळाला लावा म्हणजे निवडणूक जिंकाल’, तर ‘अँपिसिलीन’ या द्रव्याचा वापर झाला केवळ म्हणून ती ‘अ‍ॅलोपॅथी’ होत नाही.
वापरण्यात आलेल्या रसायनावरून नव्हे तर रोग उद्भवण्याची जी कारणमीमांसा केली जाते त्यावरून उपचार पद्धती ठरविली जाते.
रोगाची कारणमीमांसा कफ-पित्त-वात समजून त्याचा असमतोल दूर करण्याचा प्रयत्न केला तर त्या उपचार पद्धतीला आयुर्वेद म्हणता येईल, कफ-पित्त-वात यांमधील असमतोल शोधण्यासाठी क्ष-किरण वापरणारे यंत्र किंवा ईसीजी मशीन किंवा रक्तातील द्रव्ये तपासणी करणारे यंत्र वापरले किंवा कफ-पित्त-वात यांतील असमतोल दूर करण्यासाठी प्रतिजैविके (अँटिबायॉटिक्स) वा अगदी कर्करोगविरोधी औषधे वापरली तरी तो आयुर्वेदच आहे.
‘अ‍ॅलोपॅथीला राजाश्रय आहे’ या विधानातील अ‍ॅलोपॅथी या प्रचलित नावाचा वापरच चुकीचा आहे. ताप आल्यावर (बिघाडाच्या कारणांची मीमांसा न करता) गार पाणी ओतणे ही समजा ‘अ‍ॅलोपथी’ (विरुद्ध उपचार करणे) होईल. ‘राजाश्रय’ असलेली उपचार पद्धती ही प्रत्यक्षात आधुनिक वैद्यक (मॉडर्न मेडिसिन) आहे. स्थूल पातळीवरील किंवा सूक्ष्म पातळीवर शारीरिक बिघाड किंवा रसायनांच्या पातळीवरील (गुणात्मक/ संख्यात्मक) बदल किंवा विद्युतभारातील/ विद्युत्वहनातील बदल शास्त्रशुद्ध पद्धतींनी तपासून ते पूर्ववत आणण्याचे/ सुधारण्याचे/ काबूत ठेवण्याचे इत्यादी प्रयत्न या उपचार पद्धतीत होतात. अ‍ॅलोपॅथीत बिघाडाला (आंधळेपणाने) विरोध होतो. याउलट आधुनिक वैदक पद्धतीत बिघाडांची शास्त्रशुद्ध तपासणी आणि उपचार होतात.
फॉक्स ग्लोव्ह किंवा सदाफुली किंवा सर्पगंधा (रावलफिया सर्पँटिना) किंवा कोरफड, तुळस, कडुनिंब इत्यादींपासून तयार केलेली रसायने वरीलप्रमाणेच्या शास्त्रशुद्ध तपासणी आणि उपचार यासाठी वापरणे ही ‘आधुनिक वैद्यक (मॉडर्न मेडिसिन)’ पद्धतीच असते.
कफ-पित्त-वात यांचे ‘परीक्षानळी’त मोजता येणारे रासायनिक/ पदार्थविज्ञानशास्त्रीय गुणधर्म कोणते? त्यांच्या गुणात्मक पातळ्या नेमक्या कोणत्या? त्या कशा निश्चित करावयाच्या? इत्यादी मानदंड निश्चित झाल्याशिवाय कफ-पित्त-वात असमतोल शोधणे आणि काटेकोर शास्त्रीय पद्धतीने शारीरिक- रसायनिक- विद्युत असमतोल शोधणे यांत आंतरपॅथी संशोधन कसे शक्य आहे, ते स्पष्ट नाही.
कोणत्याही प्रकारच्या उपचारांमुळे, मग उदाहरणार्थ- अंगारा लावणे असो किंवा कोंबडे कापणे असो किंवा अलख-निरंजन असा उद्घोष असो, शारीरिक- रासायनिक-विद्युत असमतोल ‘सुधारू शकेल’ असे सुचविणारा प्रथमदर्शनी पुरावा कोणी मांडला तर त्या उपचारांबाबत आधुनिक वैद्यकशास्त्रात संशोधन शक्य आहे. संभाव्यतेची शक्यता दर्शविणाऱ्या कोणत्याही विषयावरील संशोधन विज्ञानाला वज्र्य नाही. आणि असे संशोधन आंतरपॅथी नसून आधुनिक वैद्यकशात्रच असेल.
एथिक्स समितीसमोर अधिक प्रभावशाली किंवा अधिक किफायतशीर नवनव्या संभाव्यता सादर होणे आवश्यक आहे. आणि साधनसामग्रीच्या मर्यादेत शक्य तितके सर्व संशोधन अवश्य व्हावे.
‘आयुर्वेद-होमिओपॅथी कोणत्या रोगांमध्ये निरुपयोगी आहेत?’ किंबहुना कोणत्या उपचारपद्धती अधिक प्रभावी/ टिकाऊ आहेत, याचे संशोधन संयुक्तपणे करता येईल. मात्र ज्ञात जोखीम (कॅल्क्युलेटेड रिस्क) उचलण्यास स्वेच्छेने तयार असलेले रुग्ण तयार होणे आवश्यक आहे. आंतरपॅथी संशोधनाच्या मर्यादा ज्ञात असणे महत्त्वाचे आहे.
‘आयुर्वेद व होमिओपॅथीच्या डॉक्टरांना आधुनिक संशोधनाची भाषा बोलता येत नाही’ ही स्थिती वाईटच आहे.
आजार होण्याच्या कारणमीमांसांबाबत आणि उपचारांच्या पद्धतीबाबत आधुनिक वैद्यकशात्रात अगदी मूलभूत बदलही झाले आहेत. तसे बदल किंवा ज्ञात गृहीतके योग्य आहेत किंवा नाही, याची तपासणी आयुर्वेद व होमिओपॅथी यांत झालेली दिसत नाही.
राजीव जोशी, पुणे.

इच्छामरण सुलभ होण्याची गरज..
‘सन्मान इच्छामरणाचा’ या विषयावरील चर्चासत्रात सामाजिक कार्यकर्त्यांनी तसेच वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी इच्छामरणाचा कायदा व्हावा, असे मत प्रदíशत केल्याचे वृत्त (लोकसत्ता, १४ ऑक्टोबर) वाचले. या विषयावर समाजप्रबोधन होणे गरजेचे आहे, असे मला वाटते.
दुसरे असे की, यातनारहित मृत्यू हा एक मूलभूत अधिकार आहे असे समजले जावे आणि तसेही समाजप्रबोधन केले जावे. पाश्चात्य देशांत ‘दिग्नितास’सारख्या संस्था इच्छामरणाची सोय करतात; पण ते अतिशय महाग आहे. त्यापेक्षा रुग्णास यातना होणार नाहीत एवढेच बघणे सोयीचे आणि स्वस्त असू शकेल. ‘वेदना व्यवस्थापनालय’ म्हणजेच ‘पेन मॅनेजमेंट क्लिनिक’सुद्धा महाग ठरू शकेल. तेव्हा रुग्णाला यातनेपासून मुक्ती देणाऱ्या औषधांचा सहज पुरवठा ही एक आवश्यक बाब ठरते.. पण यासाठी अनेक बदल घडावे लागतील.
सध्याचे कायदे अतिशय कडक आहेत, तेव्हा ते बदलणे आवश्यक आहेच. नातेवाईकांच्या मानसिकतेतसुद्धा काही बदल व्हावयास पाहिजे. ‘शक्य होते तेवढे केले’ या भूमिकेतून त्यांनी बाहेर पडले पाहिजे.
हे कठीण असते. असणारच, याची मला जाणीव आहे. मात्र एका वयानंतर प्रत्येकाने आपल्या बाबतीत काय केले जावे हे लिहून ठेवणे महत्त्वाचे मानले गेले पाहिजे. विशेषत:  हृदयविकाराच्या रुग्णांनी, आपल्याला झटका आल्यास सीपीआर (काíडओपल्मोनरी रेसुसिएशन) करावे किंवा करू नये तेही लिहून ठेवावे, मग इतरांना निर्णय घेणे सोपे होते.
आणखी एका बाबीवर विचार केला जावा आणि तो म्हणजे घरी अखेरचा श्वास घेणे, मुख्यत: वयोवृद्धासाठी नैसर्गिक मानले जावे आणि मरणाचा दाखला मिळणे सुलभ केले जावे. या बाबतीत डॉक्टरांच्या मनातील भीती कशी दूर करता येईल याचा विचार व्हावा आणि त्यानुसार पावले उचलली जावीत.
रघुनाथ बोराडकर, कोथरूड, पुणे</strong>

फलक आकारमानावर नियंत्रण हवे
हुडहुड चक्रीवादळ पूर्ण वेगाने विशाखापट्टणमला  सर्वात आधी धडकले व सगळीकडे वाताहत झाली. अर्थात रविवार असल्याने व सरकारने पूर्वसूचना दिल्याने रस्त्यावर वर्दळ नव्हती; परंतु किनारपट्टीवर उत्साही मंडळी दिसत होतीच. या वादळाची छायाचित्रे तसेच चित्रवाणीवरील दृश्ये पाहताना लक्षात आलेली आणखी एक गोष्ट म्हणजे जिकडेतिकडे प्रचंड उंचीचे भव्य, टोलेजंग लोखंडी जाहिरात फलक जमीनदोस्त झालेले होते. यामुळे मनुष्यहानी नाही, तरी नुकसान झालेच ना?
आतापर्यंत अनेक शहरांत एरवीसुद्धा साध्या वादळात/ पावसात असे फलक पडून रस्त्यावर दुखापती झालेल्या आहेत. यासाठी केंद्र सरकारने अशा जाहिरातींसाठी एक सर्वव्यापी धोरण आखणे गरजेचे आहे, ज्यात देशातील कुठल्याही जाहिरात फलकाचे कमाल आकारमान (उदाहरणार्थ, जास्तीत जास्त ८ बाय ४ फूट) निश्चित करणे गरजेचे आहे, जेणेकरून तो पडला तरी नुकसान होणार नाही. शहराच्या चौकांतील वा इमारतींवरील लोखंडी चौकटींचे- पत्र्याचे फलक कमी आकाराचे करणे गरजेचे आहे. अर्थात, कोठेही बांबूंवर उभारल्या जाणाऱ्या, बारमाही शुभेच्छा फलकांवर कायमची बंदी आणून रस्ते व चौकांचे विशोभीकरण टाळायला हवेच.
कुमार करकरे, पुणे

कामत यांना सलाम!
‘निष्ठेचा पत्रकार’ म्हणून दिवंगत एम. व्ही. कामत यांचा केलेला गौरव (अन्वयार्थ,१० ऑक्टो.) भावला. विविध इंग्रजी दैनिकांतून त्यांचे अभ्यासपूर्ण लेख गेली ५० वष्रे वाचत आलो. दर रविवारी ‘फ्री -प्रेस’मधील त्यांचे इंगजी पुस्तकांचे परीक्षण ज्ञानात भर घालणारे ठरले. हिंदूधर्मावरची त्यांची भाष्ये वाचून माझ्यासारख्याला तो धर्म उमजला. नुकतेच त्यांचे  जिहाद  वरील भाष्य फ्रीप्रेस मध्ये वाचले होते. जिहादसाठी केवळ मुसलमानांना जबाबदार धरता येत नसून त्यामागे अमेरिकेचे पद्धतशीर धोरण आहे, असा त्याचा आशय होता. कामत यांना माझा सलाम!
– मार्कुस डाबरे, पापडी, वसई

Story img Loader