‘आंतरपॅथी संशोधन करायचे.. पण कोणी?’ हा डॉ. जगन्नाथ दीक्षित यांचा लेख (लोकसत्ता, २३ सप्टेंबर) वाचला. त्यामागील ‘खरी गरज आहे ती आंतरपॅथी संशोधनाची’ हे (विधान) संदिग्ध आहे.
एका उदाहरणावरून माझा मुद्दा स्पष्ट करतो. समजा, एखाद्या बुवाने सांगितले की, ‘अँपिसिलिनची पूड (=भस्म) दिवसातून तीन वेळा कपाळाला लावा म्हणजे निवडणूक जिंकाल’, तर ‘अँपिसिलीन’ या द्रव्याचा वापर झाला केवळ म्हणून ती ‘अॅलोपॅथी’ होत नाही.
वापरण्यात आलेल्या रसायनावरून नव्हे तर रोग उद्भवण्याची जी कारणमीमांसा केली जाते त्यावरून उपचार पद्धती ठरविली जाते.
रोगाची कारणमीमांसा कफ-पित्त-वात समजून त्याचा असमतोल दूर करण्याचा प्रयत्न केला तर त्या उपचार पद्धतीला आयुर्वेद म्हणता येईल, कफ-पित्त-वात यांमधील असमतोल शोधण्यासाठी क्ष-किरण वापरणारे यंत्र किंवा ईसीजी मशीन किंवा रक्तातील द्रव्ये तपासणी करणारे यंत्र वापरले किंवा कफ-पित्त-वात यांतील असमतोल दूर करण्यासाठी प्रतिजैविके (अँटिबायॉटिक्स) वा अगदी कर्करोगविरोधी औषधे वापरली तरी तो आयुर्वेदच आहे.
‘अॅलोपॅथीला राजाश्रय आहे’ या विधानातील अॅलोपॅथी या प्रचलित नावाचा वापरच चुकीचा आहे. ताप आल्यावर (बिघाडाच्या कारणांची मीमांसा न करता) गार पाणी ओतणे ही समजा ‘अॅलोपथी’ (विरुद्ध उपचार करणे) होईल. ‘राजाश्रय’ असलेली उपचार पद्धती ही प्रत्यक्षात आधुनिक वैद्यक (मॉडर्न मेडिसिन) आहे. स्थूल पातळीवरील किंवा सूक्ष्म पातळीवर शारीरिक बिघाड किंवा रसायनांच्या पातळीवरील (गुणात्मक/ संख्यात्मक) बदल किंवा विद्युतभारातील/ विद्युत्वहनातील बदल शास्त्रशुद्ध पद्धतींनी तपासून ते पूर्ववत आणण्याचे/ सुधारण्याचे/ काबूत ठेवण्याचे इत्यादी प्रयत्न या उपचार पद्धतीत होतात. अॅलोपॅथीत बिघाडाला (आंधळेपणाने) विरोध होतो. याउलट आधुनिक वैदक पद्धतीत बिघाडांची शास्त्रशुद्ध तपासणी आणि उपचार होतात.
फॉक्स ग्लोव्ह किंवा सदाफुली किंवा सर्पगंधा (रावलफिया सर्पँटिना) किंवा कोरफड, तुळस, कडुनिंब इत्यादींपासून तयार केलेली रसायने वरीलप्रमाणेच्या शास्त्रशुद्ध तपासणी आणि उपचार यासाठी वापरणे ही ‘आधुनिक वैद्यक (मॉडर्न मेडिसिन)’ पद्धतीच असते.
कफ-पित्त-वात यांचे ‘परीक्षानळी’त मोजता येणारे रासायनिक/ पदार्थविज्ञानशास्त्रीय गुणधर्म कोणते? त्यांच्या गुणात्मक पातळ्या नेमक्या कोणत्या? त्या कशा निश्चित करावयाच्या? इत्यादी मानदंड निश्चित झाल्याशिवाय कफ-पित्त-वात असमतोल शोधणे आणि काटेकोर शास्त्रीय पद्धतीने शारीरिक- रसायनिक- विद्युत असमतोल शोधणे यांत आंतरपॅथी संशोधन कसे शक्य आहे, ते स्पष्ट नाही.
कोणत्याही प्रकारच्या उपचारांमुळे, मग उदाहरणार्थ- अंगारा लावणे असो किंवा कोंबडे कापणे असो किंवा अलख-निरंजन असा उद्घोष असो, शारीरिक- रासायनिक-विद्युत असमतोल ‘सुधारू शकेल’ असे सुचविणारा प्रथमदर्शनी पुरावा कोणी मांडला तर त्या उपचारांबाबत आधुनिक वैद्यकशास्त्रात संशोधन शक्य आहे. संभाव्यतेची शक्यता दर्शविणाऱ्या कोणत्याही विषयावरील संशोधन विज्ञानाला वज्र्य नाही. आणि असे संशोधन आंतरपॅथी नसून आधुनिक वैद्यकशात्रच असेल.
एथिक्स समितीसमोर अधिक प्रभावशाली किंवा अधिक किफायतशीर नवनव्या संभाव्यता सादर होणे आवश्यक आहे. आणि साधनसामग्रीच्या मर्यादेत शक्य तितके सर्व संशोधन अवश्य व्हावे.
‘आयुर्वेद-होमिओपॅथी कोणत्या रोगांमध्ये निरुपयोगी आहेत?’ किंबहुना कोणत्या उपचारपद्धती अधिक प्रभावी/ टिकाऊ आहेत, याचे संशोधन संयुक्तपणे करता येईल. मात्र ज्ञात जोखीम (कॅल्क्युलेटेड रिस्क) उचलण्यास स्वेच्छेने तयार असलेले रुग्ण तयार होणे आवश्यक आहे. आंतरपॅथी संशोधनाच्या मर्यादा ज्ञात असणे महत्त्वाचे आहे.
‘आयुर्वेद व होमिओपॅथीच्या डॉक्टरांना आधुनिक संशोधनाची भाषा बोलता येत नाही’ ही स्थिती वाईटच आहे.
आजार होण्याच्या कारणमीमांसांबाबत आणि उपचारांच्या पद्धतीबाबत आधुनिक वैद्यकशात्रात अगदी मूलभूत बदलही झाले आहेत. तसे बदल किंवा ज्ञात गृहीतके योग्य आहेत किंवा नाही, याची तपासणी आयुर्वेद व होमिओपॅथी यांत झालेली दिसत नाही.
राजीव जोशी, पुणे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा