‘शिवसेना- मनसेसोबत पवारांची नवी आघाडी?’ ही बातमी (लोकसत्ता, ७ ऑक्टो.) वाचली. याबाबतचा माझा होरा खरा ठरेल असे मला अजूनही वाटते व तसा आशय वरील बातमीत दिसतो. युती तुटण्याचे राजकीय विश्लेषण करणे जरी सोपे नसले, तरी राजकारण हा सत्ताबजार आहे, हे महाराष्ट्रातील मतदारांना पुन्हा एकदा पटले आहे.
पवारांनी वेळोवेळी खेळलेल्या राजकारणातील खेळी पाहता असे वाटणे साहजिक आहे. युती तुटली (की तोडली?) की त्रिशंकू स्थिती होईल व अशा वेळी शिवसेनेला पाठिंबा देऊन (उद्धव ठाकरेंनाच पद देऊन?) महाराष्ट्रातील सत्तेत आपले राजकीय अस्तित्व टिकून राहावे यासाठी तरी हे सर्व घडते आहे की काय, असा संशय (पवारांच्या हालचाली पाहता) आल्यास गर नाही. मनसेची भूमिका ‘जिथे सत्ता तिथे आम्ही व त्यासाठी काहीही’ अशी असल्यामुळे ते समीकरणात कुठल्याही बाजूला जातील हे आपण नाशिकच्या अलीकडच्या घडामोडीत पाहिले आहेच.
सुरेश जाधव, अंधेरी (मुंबई)
बरे झाले, प्रचाराला वेळ कमी आहे
विधानसभा निवडणूक प्रचारात चार मोठे आणि अनेक राज्यपातळीवरील छोटे पक्ष आपापल्या आíथक, शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि वैचारिक (?) कुवतीनुसार भरच घालताहेत. हा गदारोळ चित्रवाणीसारख्या माध्यमांमुळे २४ तास आदळतो आहेच, पण मतदारांचा खरा छळ होतो आहे तो प्रत्येक पक्षाचे पुढारी विरोधी पक्षांवर करत असलेल्या वैयक्तिक आरोपांमुळे!
आपल्या पक्षाच्या लिखित जाहीरनाम्यावर बोलण्याऐवजी प्रत्येक पुढारी, विरोधी पक्षाचे पुढारी आणि त्यांचे खरेखोटे चारित्र्यहनन, यावरच लक्ष एकाग्र करताहेत आणि तसे करताना आपण याआधी काही वर्षे एकमेकांचे मित्र होतो, हेही ते सोयिस्करपणे विसरून जाताना दिसताहेत.
पूर्वी असे म्हटले जायचे की, एखाद्याने ओढलेली रेघ – त्या रेषेला हात न लावता- लहान करावयाची असल्यास तिच्या शेजारी आपली अधिक लांब रेषा ओढावी! पण आजकाल आपली रेघ ओढण्याचे कष्टही कोणी घेत नाहीत. दुसऱ्याची रेषा पुसण्याचा प्रयत्न मात्र आवर्जून सगळेच जण करताहेत. कालचे मित्र आजचे कट्टर शत्रू असल्यासारखे भांडताहेत आणि कोणास ठाऊक आजचे हे कट्टर शत्रू, उद्या सत्तेसाठी पुन्हा एकमेकांच्या गळ्यात गळेही घालतील. म्हणून असे म्हणावेसे वाटते की, बरे झाले निवडणूक प्रचाराला थोडाच अवधी मिळाला! नाही तर या सत्तालोलुपांनी आणखी किती काळ मतदारांचा छळ केला असता हे फक्त लोकशाहीच जाणे!
-मकरंद खेर, अहमदनगर.
पर्यायी वैद्यक पद्धतींची मदार लोकाश्रयावरच!
‘आंतरपॅथीमधील होमिओपॅथी’ या लेखात डॉ. मंदार जोशी यांनी होमिओपॅथीबद्दलचे वैज्ञानिक तर्क व संभव मांडला आहे. होमिओपॅथी बऱ्याच आजारांमध्ये आश्चर्यकारकरीत्या काम करते हे अनेकांना अनुभवास आले आहे. भारताने हा वैज्ञानिक ठेवा गेले शतकभर जपून ठेवला आहे. मंदार जोशी यांनी ब्रिटनच्या राष्ट्रीय आरोग्य व्यवस्थेतून होमिओपॅथीला हटवण्याचा प्रकार लेखात सांगितला आहे, त्या संदर्भात हा पत्रप्रपंच.
‘मेडिकल नेमेसिस’ या इव्हान इलिच यांच्या ग्रंथात असा उल्लेख आहे, की अमेरिकेत रॉकफेलर फौंडेशनने सर्व विद्यापीठांना देणग्या देऊन आधुनिक वैद्यकशास्त्राच्या संशोधनाला उत्तेजन दिले; मात्र त्या विद्यापीठात होमिओपॅथीबद्दल संशोधन होणार नाही अशी अट घातली. होमिओपॅथी पद्धतीत रासायनिक औषधांचे काम नाही, त्यामुळे मोठा व्यापार उद्योगधंदा नाही. अशा पद्धतीने पाश्चात्य किंवा आधुनिक विज्ञानाने होमिओपॅथीचे पद्धतशीर शिरकाण केले. जेव्हा एखादी राष्ट्रीय आरोग्य व्यवस्था बनते तेव्हादेखील आधुनिक वैद्यक विज्ञान हेच त्याचा कब्जा घेते, भारतातही हेच झाले. जगातल्या अनेक देशांमध्ये जिथे जिथे राष्ट्रीय स्वरूपाच्या वैद्यक व्यवस्था झाल्या तिथे पर्यायी उपचार पद्धतींचा गळा घोटण्यात आला.
भारतातही आयुर्वेद, होमिओपॅथी पद्धतींना सरकारी सेवांमध्ये अनुक्रमे नगण्य व शून्य स्थान आहे. पर्यायी वैद्यक पद्धती टिकवायच्या व वाढवायच्या असतील तर आरोग्यसेवांवर सरकारी प्रभाव मर्यादितच पाहिजे. भारतात राजाश्रय नसतानाही खासगी आरोग्यसेवांमुळे या पर्यायी पद्धती लव्हाळ्याप्रमाणे टिकून आहेत. प्रत्येक विज्ञान-तंत्रज्ञान स्वत:चे अर्थकारण व राजकारण घेऊन येते आणि त्या त्या उपचार पद्धती जगणार की मरणार हे या अर्थराजकारणावर ठरते. चीनने मात्र त्याबद्दल वेळीच काळजी घेऊन पारंपरिक चिनी वैद्यक, अॅक्युपंक्चर टिकवले व पसरवले.
आधुनिक वैद्यक विज्ञानाच्या काटेकोर व रिडक्शनिस्ट पद्धतीत पर्यायी पद्धती फारशा बसू शकत नाहीत. त्यामुळे या अर्थराजकारणात कोल्हा-करकोचाच्या फराळाच्या गोष्टीप्रमाणे सुरईतील खिरीवर फक्त करकोचाच ताव मारू शकतो, कोल्हा चतुर असला तरी तो उपाशी राहणार. पर्यायी उपचार पद्धतीत (आयुष) अनेक सद्गुण व बलस्थाने आहेत. त्यांचे संशोधन व सिद्धता करण्यासाठी योग्य पद्धती पाहिजेत. आमचे आरोग्य विज्ञान विद्यापीठ मात्र आंतरपॅथी संशोधनाबद्दल काहीही करत नाही हेदेखील वास्तव आहे. तर मग अशी कामे कोण करणार?
डॉ. शाम अष्टेकर, नाशिक
अनुकरणाचा प्रयत्न करून तरी पाहा..
‘धूळपेर’ सदरातील ‘रयत आणि (आजचे) राजे’ या लेखात (६ ऑक्टो.) आसाराम लोमटे यांनी मांडलेले विचार पटले. सर्व नेतेमंडळी छत्रपती शिवरायांच्या नावाचे फक्त भांडवल करण्यात धन्यता मानतात. अनुकरण करण्याचा विचार कुणाच्याही मनास स्पर्श करत नाही. समाजातील खरा उपेक्षित वर्ग अणि बऱ्याच भटक्या जमाती या त्यांची ‘व्होट बँक’ नसल्याने नेहमीच नेतेमंडळींनी दाखवलेल्या स्वप्नांपासून दूर राहिल्या आहेत. आणि व्होटबँक ज्यांची आहे, त्यांचेदेखील फार काही भले करण्याचा प्रयत्न झालेला दिसून येत नाही. आजच्या नेत्यांनी शिवरायांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न जरी करून पाहिला तरी परिस्थिती नक्कीच सुधारेल.
-श्रीराम तांदळे, बीड
मग, ५ महिन्यांपूर्वी लाज का नव्हती?
‘भाजपची अफझलखानाची फौज’ (लोकसत्ता, ७ ऑक्टो.) या बातमीमध्ये उद्धव ठाकरे यांनी जी मुक्ताफळे उधळली आहेत ती वाचून करमणूक झाली. उद्धव ठाकरे यांच्याकडे आता पूर्वीसारखा संयम राहिलेला नाही. लोकसभा निवडणुकांमध्ये मोदींच्या नावाने मतांचा जोगवा मागणारे व त्यांची भरभरून स्तुती करणारे हे शिवसेनावाले आता मोदी व अन्य भाजप नेत्यांना ‘अफझलखानाची फौज’ म्हणत आहेत. पाचच महिन्यांपूर्वी मोदींच्या नावे मते मागताना यांना लाज कशी वाटली नाही?
मानस शेटे, अलिबाग
पंतप्रधानांनी पक्षापेक्षा देशाला प्राधान्य द्यावे
जम्मू-काश्मीर राज्यातील बांधवांना ईदच्या सणादिवशीच पाकिस्तानच्या हल्ल्याचा सामना करावा लागला. तेव्हा, ते आपल्या देशात किती सुरक्षित आहेत याचा अंदाज येतो. सर्वात दुर्दैवी गोष्ट ही आहे, की सीमेवर जवान लढत आहेत, त्या भागातील निरपराध नागरिक मरण सोसत आहेत, असे असताना पंतप्रधान मात्र या सगळ्या घटनाक्रमापासून अनभिज्ञ असल्याप्रमाणे हरियाणा व महाराष्ट्रात प्रचारसभा घेण्यात गुंतले होते. हल्ला झाल्यानंतर सभा रद्द करून दिल्लीतून योग्य सूत्रे हलविण्याचे काम त्यांनी केल्याची माहिती प्रसारमाध्यमे तरी देत नाहीत. असे का व्हावे? आदरणीय केंद्रीय गृहमंत्रीदेखील, ‘भारतात सत्ता बदलली’ असल्याचे पाकिस्तानला सुनावतात. पाकिस्तानचे हल्ले पक्ष पाहून होत असते, तर त्या देशाने ‘कारगिल’चे दु:साहस नसते केले.
नुसत्या बोलबाता मारणे भाजपने आता तरी बंद करावे. मोठय़ा विश्वासाने दिल्लीत बसविलेल्या नेत्यांनी प्रत्यक्ष कृती करावी. पंतप्रधानांनी आता तरी पक्षापेक्षा देशाला तातडीचे प्रधान्य द्यावे ही नम्र विनंती.
अक्षय नलावडे, उस्मानाबाद</strong>
निवडणुकीआधीच हार!
हरियाणात काँग्रेसने आपल्या सत्तेचा गरवापर सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वडरा यांचे गरव्यवहार लपवण्यासाठी केला. अगदी हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर तेथील मुख्यमंत्र्यांनी रॉबर्ट वडरा यांनी केलेल्या सगळय़ा गरव्यवहारांना राजमान्यता देऊन त्यांनी गांधी घराण्यावरची निष्ठा अशा प्रकारे प्रगट केली असली, तरी निवडणुकीत काँग्रेसला आपली हार स्पष्ट दिसत असल्यानेच घाई-घाईत असे निर्णय घेतले जातात, म्हणजे ही निवडणुकीआधीच काँग्रेसची हार आहे.
– अनिरुद्ध गणेश बर्वे, कल्याण पश्चिम