सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांच्या निधनाची वार्ता समजल्यावर सर्वात प्रथम जाणीव झाली ती त्यांचा ‘कॉमन मॅन’ पोरका झाल्याची. गेली जवळपास सात दशके लक्ष्मण व्यंगचित्रांद्वारे ‘कॉमन मॅन’ ला केंद्रस्थानी ठेवून प्रामुख्याने राजकीय आणि सामाजिक विसंगतींवर भाष्य करीत होते. सभ्यतेची लक्ष्मणरेषा न ओलांडता नेमकेपणाने त्यांनी आपले हे काम केले.
 प्रा. श्री. म. माटे यांनी टीका कशी करावी यासंबंधी लिहिताना असे नमूद केले आहे की, टीका गायीसारखी असावी, वन्य पशूसारखी नसावी. गाईच्या अंगाला आपण जेथे स्पर्श करतो, तेवढाच भाग ती थरथरवते याउलट वन्य पशूला आपण प्रेमाने कुरवाळायला गेलो तरी ते वसकन अंगावर येते. लक्ष्मण यांची टीका पहिल्या प्रकारातली होती. प्रजेची दु:खं, समस्या, अडचणी आपल्या व्यंगचित्रांद्वारे समर्थपणे मांडणाऱ्या या कलाकाराला ‘प्रजासत्ताक दिनी’च मृत्यू यावा याला नियतीचा ‘काव्यात्म न्याय’ म्हणावे का ?
संजय श्रीपाद तांबे, देवरुख (रत्नागिरी)

सहकार्यामागचे सत्ता-संतुलन..
नुकतीच झालेली ओबामा-मोदी भेट सत्ता-संतुलनाचे तत्त्व अधोरेखित करते. हे समजून घेण्यासाठी जागतिक राजकारणाकडे पाहावे लागते.
 जागतिक घडामोडी पाहात असताना हे प्रकर्षांने जाणवते की, युक्रेन प्रश्नावरून अमेरिका-रशिया संबंध ताणले गेले आहेत, तर दुसरीकडे चीन ‘सिल्क रूट’च्या माध्यमातून पूर्वेकडील देशांत आपला प्रभाव वाढवत आहे, त्यामुळे अमेरिकेच्या ‘पाय्व्होट ईस्ट’ आणि भारताच्या ‘अ‍ॅक्ट ईस्ट’ धोरणांवर परिणाम होत आहे. याचबरोबर रशिया आणि पाकिस्तान या देशांतील संरक्षण-सामग्रीचा व्यापार आणि चीन-रशिया यांच्यातील ४०० अब्ज डॉलरचा तेलइंधन करार या घटना जटिल सत्तासमतोलाचे निर्देशक आहेत. एकंदरीत नव्या जागतिक राजकीय, आíथक व्यवस्थेचे परिणाम दिसावयास सुरुवात  झाली आहे.
साहिल सोनटक्के, पुणे.

‘पद्म’ पुरस्कारांच्या निकषांवर प्रश्नचिन्हच
सय्यद मोदी आंतराष्ट्रीय बॅडिमटन स्पध्रेत कॅरोलिना मारिनाला नमवून अव्वल बॅडिमटनपटू सायना नेहवालने प्राप्त केलेले अजिंक्यपद हे तिला पद्म पुरस्कार नाकारणाऱ्यांना चोख उत्तर आहे.
 भारतातील आरोग्यसेवेसाठी अब्जावधी डॉलर्सचा निधी देणारे  बिल गेट्स व त्यांची पत्नी मेलीना यांचा पद्मभूषण पुरस्कार देऊन केलेला सन्मान हा ‘पद्मभूषण पुरस्काराचा सन्मान’च  म्हटला पाहिजे. परंतु स्वत: शेतकरी नसूनही तसे असल्याचे दाखवत, अनिवासी भारतीय असल्याचा दावा करत पळवाट शोधणाऱ्या अमिताभ बच्चनचा पद्मभूषण देऊन केलेला सन्मान खटकणारा आहे, येनकेनप्रकारेण प्रसिद्धीच्या मागे लागलेल्या अमिताभ बच्चनने नि:स्वार्थीपणे केलेले सामाजिक कार्य किंवा दानशूरपणा कधीही दिसलेला नाही.
यंदाच्या पद्म पुरस्कार मानकऱ्यांच्या यादीतील थोडे अपवाद वगळता पुरस्कार देण्याच्या निकषावर मनात प्रश्नचिन्ह उभे राहते.
पम्मी/ प्रदीप खांडेकर, माहीम (मुंबई)

वकिलांचा अजब विधि-निषेध
पुण्यातील कार्यक्रमात वकिलांनी घातलेला गोंधळ िनदनीय आहेच, त्यातही पुणे बार असोसिएशनच्या अध्यक्ष विकास ढगे पाटील यांनी ‘कलाकारांनी आमचा सत्कार स्वीकारायचा नव्हता’ असे म्हणणे मुजोरपणाचे लक्षण आहे. पण ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही शाहीन धाडा प्रकरण पेटविले गेले असताना, गुंडांच्या खांद्याला खांदा लावून ‘शहापूर बंद’मध्ये वकील सहभागी झाले होते त्याबद्दल त्यांना किंवा त्यांच्या ज्येष्ठ वकिलांना काहीच वाटू नये ही गंभीर बाब आहे. न्यायालयाच्या आवारात जो काही उघडपणे धंदा चालतो, उदा. विरुद्ध पक्षाकडून केस कमकुवत करण्यासाठी लाच घेणे वैगेरे याबद्दल, ही ज्येष्ठ वकील काही लिहिताना वा जाहीरपणे बोलताना दिसत नाहीत.     
संदीप देसाई, ठाणे</strong>

नाव बदलून ‘हिंदू’ तरी म्हणा!
कोल्हापूरनजीक कणेरी या गावी नुकताच पार पडलेल्या ‘भारतीय विकास संगम-४’ अर्थात भारतीय संस्कृती महोत्सवाला वारेमाप प्रसिद्धी मिळाली. मात्र एक मुद्दा जो राहून राहून खटकला तो म्हणजे हा उत्सव म्हणजे अप्रत्यक्षरीत्या ‘भगवेकरणाचा’ प्रयत्न आणि केवळ िहदुत्ववाद्यांचा कार्यक्रम वाटला. उद्घाटन सोहळ्यापासून ते समारोपापर्यंत सनातनी हिंदुत्ववाद्यांचा प्रभाव जाणवत राहिला. १८ जानेवारी रोजी १००८ सुवासिनी कलशासहित उद्घाटन फेरीला उपस्थित होत्या.. अर्थातच, सनातन परंपरेनुसार विधवांना कार्यक्रमापासून लांब ठेवण्यात आले होते. उद्घाटन सोहळ्याला मा. मुख्यमंत्र्यांनी गायीचे पूजन करून उत्सवाची सुरुवात केली. रामदेव बाबांना बोलवून तर या महोत्सवाने कळस गाठला. आपल्या वाचाळ वृत्तीसाठी प्रसिद्ध योगगुरूनी ‘संस्कृती’ सोडून नरेंद्र मोदी हेच कसे खरे देशाचे तारणहार आहेत हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. तसेच महालक्ष्मी मंदिर परिसरात ‘स्वच्छता मोहिमे’ची नौटंकीही केली. प्रचंड मोठा जनसमुदाय गोळा करून त्यांनी एवढासा कचरा गोळा केला, तो टाकायला देवीच्या ओटीसाठी असणारी बुट्टी मागून घेतली. याच कार्यक्रमात, ‘सामाजिक कार्यकर्त्यां’ अपर्णा रामतीर्थकर यांचा समावेश होता. रामतीर्थकर यांनी तर ‘केवळ साडी नेसणाऱ्या, कपाळाला कुंकू लावणाऱ्या व हातात बांगडय़ा घालणाऱ्या स्त्रियांनाच प्रवेश दिला जावा’ अशी मागणी केली. ही मागणी करताना त्या स्वत: मात्र फक्त घडय़ाळ घालून आल्या होत्या.
जेव्हा आपण भारतीय संस्कृती असे म्हणतो तेव्हा त्यामध्ये केवळ हिंदू नव्हे तर जैन, बौद्ध व इस्लामी संस्कृतीचादेखील समावेश होतो हे विसरताकामा नये. २५०० ते ७०० वर्षांपूर्वीपासून या संस्कृती भारताचा अविभाज्य भाग आहेत. गौतम बुद्ध, वर्धमान महावीर यांनी सांगितलेले तत्त्वज्ञान आजही जगभर वाखाणले जाते. अशा परिस्थितीत केवळ हिंदू संस्कृतीचा उत्सव साजरा करून त्याला ‘भारतीय’ असे नाव लावणे पूर्णत: चुकीचे आहे. तेव्हा संयोजकांना अशी विनंती करावी वाटते की पुढील वर्षीपासून हा महोत्सव केवळ हिंदू धर्माभोवती फिरता न ठेवता सर्व धर्माना, संस्कृतींना सामावून घेणारा असा आयोजित करावा. तरच खऱ्या अर्थाने तो सर्वसमावेशक ‘भारतीय संस्कृती उत्सव’ ठरेल.
तसे जमत नसल्यास निदान नाव तरी बदलून भारतीयच्या जागी ‘हिंदू संस्कृती उत्सव’ असे नामकरण करावे!  
निखिल कांबळे, कोल्हापूर.

Story img Loader