‘रघुराम आमुचे नेतो रे!’ हा अग्रलेख (२९ डिसेंबर) वाचला. लोकसत्ताच्या ‘बळीराजाची बोगस बोंब’ या अग्रलेखातील विधानांना पुष्टी देणारे विधान रघुराम राजन यांनी केल्यामुळे संपादक सुखावल्याचे या अग्रलेखात प्रतीत होत आहे.
बळीराजावरील या अग्रलेखामुळे संपादकांवर टीका झाली, त्यांना शेतीचे ज्ञान नाही असेही कोणी म्हटले, त्यांना माझी पाच एकर जमीन देतो त्यांनी ती कसून दाखवावी, असे विधानही या निमित्ताने करण्यात आले या सर्वाची झाडाझडती अग्रलेखात घेतली आहे.
पण अग्रलेख हे ठिकाण जशास तसे उत्तर देण्यासाठी किंवा आपल्यावर झालेल्या आरोपाचे खंडन करण्यासाठी नसते हे भान संपादकांनी ठेवले नाही. रघुराम यांच्या विधानाचे सविस्तर विश्लेषण करून कृषी कर्जाविषयी गंभीर चर्चा या निमित्ताने संपादकांना करता आली असती. ‘परतफेडी’च्या नादात ही संधी ‘लोकसत्ता’ने घालवली असेच म्हणावे लागेल.
देवयानी पवार, पुणे

राज्यकर्त्यांना पालख्या वाहणारेच हवे!
‘रघुराम आमुचे नेतो रे’ हा उपरोधिक अग्रलेख (२९ डिसेंबर) संबंधितांचे डोळे उघडेल असे मला वाटत नाही. ज्या पद्धतीने आपण लिहिलेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावरील अग्रलेखाचा राज्यकर्त्यांनी विधान सभेत निषेध केला व बाहेर शेतकऱ्यांच्या नेत्यांनी तारे तोडले, ते पाहता ‘थंड खोलीत बसून’ भारताच्या आíथक धोरणावर वेळीच भाष्य करणारे रिझर्व बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांना भाजपचे सरकार काम करू देईल असे दिसत नाही.
आपल्या देशात राज्येकर्त्यांनी त्या-त्या विषयातील तज्ज्ञांची कदर केल्याची उदाहरणे फार कमी आणि तशी कदर होत नाही, याचीच उदाहरणे अधिक आहेत. दिल्ली आयआयटीचे संचालक रघुनाथ शेवगावकर यांना दबावाखाली राजीनामा द्यावा लागल्याची बातमी (लोकसत्ता, २९ डिसें.)आली आहेच. या राज्यकर्त्यांना केवळ त्यांच्या पालख्या वाहणारेच चालतात.
मार्कुस डाबरे, पापडी (वसई)

अप्रस्तुत वाक्ये, अर्थहीन लेख
नव्या मुख्यमंत्र्यांना शरद पवार यांनी लेखाद्वारे दिलेल्या कानपिचक्या (लोकसत्ता रविवार विशेष, २८ डिसें.) वाचल्या. पवारसाहेब कसलाही अर्थबोध न होऊ देता अघळपघळ बोलत राहतात (याच्यानिमित्ताने, त्याच्या संदर्भात, अमक्याविषयी, तमक्यासाठी असे बऱ्याचदा अर्थहीन शब्दप्रयोग पवारसाहेब करीत असतात, त्याच धर्तीवर), त्याची आठवण करून देणारा हा लेख होता.
केळकर समितीचा अहवाल आपण पाहिलेला नाही आणि मुंबईतील प्रश्नांबद्दल विधानसभेत काय चर्चा झाली, त्याची राष्ट्रवादीच्याच आमदारांनी आपल्याला माहिती दिलेली नाही, असे पवार स्वत:च सांगतात. महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद आणि देशाचे संरक्षणमंत्रिपद एके काळी भूषविलेल्या नेत्याला पूर्ण माहिती घेऊन मगच बोलावे /लेख लिहावा असे वाटले नाही का? शिवाय, ‘वृत्तपत्रांतून वाचनात आले’ हा उल्लेख मात्र दोन-तीनदा त्यांनी लेखात केला आहे आणि ‘हे जर खरे असेल, तर माझी प्रतिक्रिया अमुक अमुक आहे’ अशी पुस्तीही त्यांनी जोडलेली आहे. ही सावधगिरी तर संपूर्ण लेखात इतकी बाळगलेली आहे, की मुंबईसाठीच्या पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील समितीबद्दल आपण स्वत:च जे बोललो, त्यात ‘कदाचित अनवधानाने असा उल्लेख आहे’ असेही पवार म्हणतात! म्हणजे आपण जे काही बोललो, त्याबद्दल यांना स्वत:लाच शाश्वती नाही! नाही म्हणायला, संपूर्ण लेखात मोदींनी नेहरू केंद्र, मुक्त विद्यापीठाबरोबरच केशवसृष्टी आणि रेशीमबागेला भेट द्यायला हरकत नाही, असे सांगून केवळ एक ‘शालजोडीतले’ वाक्य टाकले आहे आणि तेही खरे पाहता फारच अप्रस्तुत आहे!
सत्ता विनयाने शोभिवंत होते असा सल्ला देणाऱ्या पवारांना आपल्या पुतण्याने दुष्काळ-निवारणाबद्दल काढलेल्या (लघु)शंकेच्या वेळी असा जाहीर लेखी सल्ला द्यावासा वाटला नाही का? मराठा-मुस्लीम वेगळ्या आरक्षणाची गरज नव्हती, असे आता म्हणणाऱ्या पवारांचा पक्ष या आरक्षणांचा अध्यादेश काढणाऱ्या आघाडी सरकारचाच एक अविभाज्य घटक होता. मग तेव्हा आपल्या संख्याबळाच्या जोरावर पवारांनी असा अध्यादेश गांधीकुलोत्पन्न राहुलबाबांच्या पावलावर पाऊल ठेवीत टराटरा फाडून का टाकला नाही? नागपूर अधिवेशन ३० दिवस चालावे, असे म्हणणाऱ्या पवारांना आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात किंवा आपल्या पक्षाच्या सत्ताकाळात एकदाही असे का साध्य करता आले नाही?
एक मात्र खरे, आपल्या पािठब्याची गरज या सरकारला उरलेली नाही, या वस्तुस्थितीमुळे ‘अस्वस्थ’ होऊन हा लेख लिहिला गेला असावा, अशी प्रतिमा मात्र नक्कीच या लेखामुळे उभी राहते.
परेश वसंत वैद्य, गिरगाव, मुंबई</strong>

समस्यांना भिडायला आपण कधी सुरुवात करणार?
पंतप्रधानांनी ‘सीए इन्टिटय़ूट’ला स्वच्छता अभियानासाठी नामनिर्देशित केले आहे, अशी बातमी ‘लोकसत्ता’त अलीकडे वाचली. त्यावरून विशेष अर्थबोध झाला नाही म्हणून ओळखीच्या काही सीएंकडे चौकशी केली. त्यांपकी कुणीही याचे उत्तर देऊ शकले नाही.
सनदी लेखापाल (सीए) असलेल्यांनी हातात झाडू घेऊन स्वच्छता करणे हे जर अपेक्षित असले तर त्यांची संस्था हे कार्यक्रम करेलच. पण केवळ सीएच काय पण इतर व्यावसायिकांपकी किती जणांनी आपल्या घरी किंवा कार्यालयात यापूर्वी हातात झाडू घेतला आहे? मग एकदा कार्यक्रम करून फोटो काढून ‘इव्हेंट’खेरीज काय साध्य होणार?
 खरे म्हणजे त्यांच्या कौशल्याचा उपयोग अर्थव्यवस्था, बँकिंग, करव्यवस्था यांतील ‘सिस्टम’ स्वच्छ करण्यासाठी (तसेच इतर व्यावसायिकांचादेखील त्यांच्या-त्यांच्या क्षेत्रातील स्वच्छतेसाठी) उपयोग करून घेतला तर देशासाठी ते चांगले ठरेल. किंबहुना ते जास्त आवश्यक आहे. केवळ प्रतीकात्मक कार्यक्रमांपेक्षा समस्यांना भिडायला आपण कधी सुरुवात करणार? आणि ज्यांना हे करायची इच्छा आहे त्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे राहणार का?
कालिदास वांजपे, ठाणे</strong>

‘ओबीसी नागवंशीय म्हणजे बौद्ध’ हा दावा हास्यास्पद
हिंदू धर्मातून ६००० ओबीसींची ‘घरवापसी’ हे वृत्त वाचले. या बातमीत हनुमंत उपरे यांनी काही खोटे दावे बेधडक केले आहेत. ‘ओबीसी नागवंशीय म्हणजे बौद्ध’ हा त्यांचा दावा हास्यास्पद आहे. काही नागवंशीय राजे मथुरा-उजैन भागात (काश्मीरमध्येही) इसवी सनाच्या पहिल्या शतकात राज्य करत होते. नागालँडमधील नागा लोक नागवंशीय आहेत. हे सोडले तर भारतात नागवंशीयांचे संख्यात्मक प्राबल्य असल्याचे चित्र नाही. नागवंशीय म्हणजे ‘नाग’ हे देवक मानणारे. अशी अनेक प्राणी-वनस्पती- सूर्य- चंद्र वगरे देवके मानणाऱ्या जमाती भारतात पुरातन काळापासून राहत आहेत. फक्त नागवंशीय पूर्वी बौद्ध होते आणि ओबीसी म्हणजे नागवंशीय हे असले हास्यास्पद दावे करून हनुमंत उपरे धर्मातरासाठी जर भावनिक कारणे निर्माण करत असतील तर ही गंभीर बाब आहे.
दुसरी बाब म्हणजे ऐतिहासिक बौद्ध धर्मात जाती नव्हत्या हाही उपरेंचा दावा हास्यास्पद आहे. बौद्ध लेण्यांना दान देणाऱ्यांनी कोरवलेल्या शिलालेखांत दानकर्त्यांच्या जातींचा स्पष्ट निर्देश आहे. किंबहुना भारतातील सर्वच धर्मात जाती आहेत हे कटू असले तरी वास्तव आहे. त्यामुळे बौद्ध धर्मात गेल्याने जाती नष्ट होतील आणि ओबीसींची उन्नती होईल या दाव्यात कसलेही तथ्य नाही. सर्व ओबीसी नागवंशी आहेत, पूर्वी ते बौद्ध होते म्हणून ‘घरवापसी’ हा कुतर्क आहे. बौद्ध धर्माचे तत्त्वज्ञान धर्मप्रचाराचा पाया बनण्याऐवजी बनावट माहितीद्वारे धर्मातराला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करणे गर आहे. बरे, हा प्रचार करत सुटलेल्या हनुमंत उपरे यांनी स्वत:च धर्मातर केलेले नाही ही बाबही येथे उल्लेखनीय आहे.
संजय सोनवणी

‘भारतमणि’ चालेल!
‘सचिनचा ‘छोटेपणा ’’(२९ डिसेंबर) हे  प्रदीप भावे यांचे पत्र वाचले. या अनुषंगाने एक विचार मनात आला की भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च बहुमान आहे. तो फक्त देशासाठी, समाजासाठी आपले संपूर्ण जीवन ,कोणताही स्वार्थी हेतू मनात न आणता ज्यांनी झोकून दिले आहे अशा नररत्नांना द्यावा. कलावंत ४ खेळाडू यांच्या यशस्वितेमागे नाव मिळवणे, प्रचंड पसा मिळवणे असे हेतू असतातच. त्यांचे खेळासाठी किंवा कलेसाठी असलेले योगदान, जिद्द, शिस्त, संयम हे कोणीही नाकारत नाही. म्हणून त्यांच्यासाठी ‘भारतमणी’ हा स्वतंत्र सर्वोच्च बहुमान असावा
– रवींद्र भगवते, मुलुंड पूर्व (मुंबई)

Story img Loader