हिंदू एथिकल फंड नक्कीच शक्य’ हा लेख (अर्थवृत्तान्त : लोकसत्ता, ८ डिसेंबर) वाचला. मुसलमानांचा फंड आहे, ख्रिश्चनांचाही आहे, मग हिंदूंचाच का नसावा, हा युक्तिवाद ग्राहय़ धरला जाऊ शकतो; पण त्यातून साध्य काय होणार आहे? मुस्लीम आणि ख्रिस्ती धर्माचे लोक जितक्या प्रमाणात आणि संख्येत जगभर पसरलेले आहेत, त्या तुलनेत हिंदू धर्मीयांचा गट ‘अल्पसंख्याकां’मध्येच गणला जाईल. मुस्लीम आणि ख्रिस्ती धर्मसंस्था किती पारदर्शीपणे आपला कारभार करतात, याची कल्पना नाही; परंतु हिंदू देवस्थानांचे व्यवस्थापन मात्र प्रायव्हेट लिमिटेड कंपन्यांसारखे असते, ज्यात सामान्य माणसाला त्यांच्या ‘आíथक तब्येती’ची (गुटगुटीतपणाची?) कल्पना कधीच दिली जात नाही, त्यामुळे हिंदू फंड जरी प्रत्यक्षात आला, तरी हा धर्माच्या नावाखाली गोळा झालेला (की गोळा केलेला?) अतिप्रचंड पसा देवस्थानांचे ‘संस्थानिक’ प्रामाणिकपणे फंडाच्या माध्यमातून बाजारात आणतील आणि पर्यायाने सरकारला/ जनतेला उत्तरदायी राहण्याच्या भानगडीत पडतील, हे दिवास्वप्नच वाटते.
दुसरे असे, की विविध धर्माच्या फंडांची तुलना करताना हिंदू फंडाला काय स्वीकार्य आणि काय वज्र्य असेल, याचा ऊहापोह केला आहे. जशी निसर्गात अन्न-साखळी असते, तशीच शेअर बाजारात व्यापार-साखळी असते. उदाहरणार्थ, दुचाकी/चारचाकी गाडय़ांची विक्री वाढली की, जसे गाडय़ा बनविणाऱ्या कंपन्यांचे समभाग तेजीत येतात, तसेच या कंपन्यांना सुटे भाग पुरविणाऱ्या कंपन्याही वधारतात. घरखरेदीला जोर चढला, की गृहनिर्माण कंपन्यांबरोबरच इलेक्ट्रॉनिक्स वस्तू उत्पादक कंपन्या आणि रंगनिर्मिती कंपन्यांनाही ‘अच्छे दिन’ येतात. त्यामुळे सिगारेट/तंबाखूच्या कंपन्या ‘गुंतवणूक-योग्य’ यादीतून हटविताना त्यांच्या वेष्टनासाठी लागणारा पेपर पुरविणाऱ्या कंपनीत हिंदू फंडाने गुंतवणूक केली, तर ती तितकीच वज्र्य मानायला नको का? एखादा बडा उद्योगसमूह तेल-कंपनी चालवतो आणि (कदाचित तेलातून मिळालेल्याच नफ्यातून) पवनचक्कीद्वारे वीजनिर्मितीही करतो. मग अशा उद्योगसमूहाबद्दल हिंदू फंडाची भूमिका काय असावी? मद्यनिर्मिती आणि जुगाराशी संबंधित कंपन्यांवर लेखकाने फुली मारली आहे; पण भगवान शंकर आणि सोमरसाचा संबंध होता आणि धर्मराज युधिष्ठिर हाही द्यूतात प्रवीण मानला जात होताच. इतकेच का, आजही उत्तर भारतात दिवाळीला जुगार खेळणे वा लग्न इ. प्रसंगी मद्यपान करणे हे सर्रास चालतेच की.
हिंदू हा धर्म आहे, की ती एक जीवनपद्धती आहे यावरची चर्चा कधीच थांबणार नाही. तसेच, हिंदूंमधल्या विविधतेमुळे एखादी गोष्ट कोणाला ‘एथिकल’ वाटेल, तर दुसऱ्या कोणाला ‘अनएथिकल’ (उदा. मांसाहार). शिवाय, शेअरबाजारावरील गुजराती प्राबल्य पाहता तो फंड ‘हिंदू फंडा’पेक्षा ‘गुर्जर फंड’ म्हणून विकसित होण्याची आणि त्यामुळे अकारण वादविवाद होण्याचीच शक्यता अधिक.
या सर्व पाश्र्वभूमीवर, भलेही मुसलमानांसाठी व ख्रिश्चनांसाठी धर्माधिष्ठित फंड असतीलही; पण जसा राजकारणात धर्म आणू नये, असे शहाणीसुरती मंडळी सांगतात, तसेच व्यापारात धर्म आणण्याच्या फंडा(फंदा)त पडू नये, हेच उत्तम.
परेश वसंत वैद्य, गिरगाव (मुंबई)
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा