प्रा. राजेश्वरी देशपांडे यांच्या ‘समासातल्या नोंदी’ सदरातील ‘कात्रीत सापडलेला भाषाविवेक’ (२८ नोव्हेंबर) हा लेख वाचला आणि आवडला. समकालीन भाषाव्यवहारांतले पेच भारतीय संदर्भात त्यांनी मोठय़ा कौशल्याने उलगडून दाखवले आहेत. भारतासारखेच भाषिक वैविध्य असलेल्या युरोपात हे पेच युरोपी राष्ट्रांनी त्यांच्यापुरते कसे सोडवले आहेत हे खाली मांडत आहे.
भारतात जशा २२ अधिकृत भाषा आहेत, तशा युरोपीय समुदायात २४ भाषांना अधिकृत मान्यता आहे. इंग्रजी, फ्रेंच आणि जर्मन भाषांचा दबदबा जास्त असला तरी प्रत्येक युरोपीय नागरिकाने आपल्या मातृभाषेव्यतिरिक्त किमान दोन इतर युरोपीय भाषा शिकाव्यात असे समुदाय म्हणतो. भाषाशिक्षणाचा प्रसार आणि भाषाबहुलतेचे जतन करणे हे समुदायाने आपले एक प्रमुख सांस्कृतिक मूल्य मानले आहे. म्हणूनच बास्क आणि कॅटलानसारख्या प्रादेशिक भाषा आपले अस्तित्व आणि अस्मिता टिकवून आहेत. स्पेनच्या बास्कबहुल प्रांतात फिरताना नामफलकांवर स्पॅनिशबरोबर बास्क शब्द दिमाखात झळकताना दिसतात. काही वर्षांत कॅटलॉनिया हा वेगळा पश्चिम देश युरोपीय निर्माण होऊ शकतो इतकी कॅटलान अस्मिता प्रखर आहे, पण या अस्मितेला फारसे आक्रस्ताळे रूप आलेले नाही.
त्याचबरोबर एकीकडे इंग्रजी शिकून मिळणाऱ्या जागतिक रोजगारसंधींचा लाभ मिळवत आपापल्या भाषांचे संवर्धन करणे ही तारेवरची कसरत अनेक युरोपीय देशांना जमताना दिसते. आपल्या भाषेवर मनापासून प्रेम करणाऱ्या फ्रेंचांचा इंग्रजीविरोध हळूहळू मावळताना दिसतो. पॅरिस आणि तोलूसे या दोन मातब्बर अर्थशास्त्रीय विश्वविद्यालयांनी इंग्रजीचा स्वीकार केल्यावर त्यांची महती जगभर वाढली, आणि देशोदेशीच्या विद्यार्थ्यांची पसंती या विश्वविद्यालयांना मिळू लागली. २०१४ सालच्या अर्थशास्त्र नोबेलचे मानकरी ज्याँ तीरोल तोलूसेत शिकवतात, तर भांडवल आणि विषमतेचे मूलभूत, सापेक्षी विवेचन करणारे थोमा पिकेटी पॅरिसमध्ये शिकवतात. मात्र भांडवलावरचा त्यांचा जगप्रसिद्ध ग्रंथ पिकेटी यांनी (इंग्रजीमध्ये लिहिणे सहज शक्य असूनही) आवर्जून फ्रेंचमध्येच लिहिला, हे लक्षात घेण्यासारखे आहे.
अशावेळी प्रा. देशपांडेंच्या लेखाच्या शेवटी मराठी अभिजनांना दिलेली हाक महत्त्वाची ठरते. मराठीचा कळवळा जर अभिजनांना एवढा प्रकर्षांने येत असेल तर तो त्यांनी कृतीत आणणे आवश्यक आहे. याचे साधे उदाहरण म्हणजे विकिपीडिआ. या सर्वानाच खुल्या असलेल्या ऑनलाइन विश्वकोशात मराठीत अवघ्या ४० हजार नोंदी आहेत. महाराष्ट्रातल्या सांस्कृतिक विश्वातल्या दशसहस्रावधी लोकांनी (प्राध्यापक, साहित्यिक इत्यादी अभिजन) आपल्या आवडीच्या विषयांवर फक्त एक जरी मराठी नोंद लिहिली (किंवा स्वतंत्र ज्ञाननिर्मिती अवघड असल्यास इंग्रजी नोंदींचा अनुवाद केल्यास) तर मराठी विकिपीडिआत बहुमूल्य भर पडू शकते, आणि विद्यार्थ्यांना मदत. प्रा. देशपांडेंना अभिप्रेत असलेला भाषाविवेक मराठी समाजाला लवकर सापडो ही सदिच्छा.
– भूषण निगळे, सीहाइम-युगेन्हाइम (जर्मनी)
स्वभाषेचा अभिमान असल्यास कृतीची ‘नोंद’ तरी हवीच..
प्रा. राजेश्वरी देशपांडे यांच्या ‘समासातल्या नोंदी’ सदरातील ‘कात्रीत सापडलेला भाषाविवेक’ (२८ नोव्हेंबर) हा लेख वाचला आणि आवडला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 02-12-2014 at 12:47 IST
मराठीतील सर्व लोकमानस बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Readers response on loksatta news