‘कसे बोललात लक्ष्मण!’ हे विशेष संपादकीय (२८ जाने.) ‘कॉमन मॅन’चा जन्मदाता स्वत: कसा आणि किती ‘अनकॉमन’ होता हे दाखवून देते. अभिरुचिसंपन्न वाचकांच्या आणि व्यंगचित्रकारांच्या दोन-तीन पिढय़ा त्यांनी घडवल्या असे म्हटले तरी ते योग्य होईल. व्यंगचित्र म्हटले की त्याचा संबंध विनोद आणि हास्य यांच्याशी जोडला जातो, पण लक्ष्मण यांची गरिबीशी संबंधित अनेक व्यंगचित्रे थेट काळजाला हात घालणारी      होती. त्यांच्या व्यंगचित्रांच्या सदरचे नाव जरी ‘कसे बोललात’ (यू सेड इट!) असे असले तरी कित्येक व्यंगचित्रांमध्ये एकही शब्द नसूनही नेमका आशय व्यक्त होत असे.  सध्याचा काळ वृत्तनिवेदकांनी आपापले ‘ब्रॅण्डिंग’ करण्याचा आहे. लक्ष्मण यांचा काळ असे  ‘ब्रॅण्ड’ तयार करण्याचा नव्हता.  तरीही असामान्य प्रतिभेच्या जोरावर साध्या आणि तटस्थ व्यक्तीचाही आपोआपच ‘ब्रॅण्ड’ कसा तयार होतो त्याचे लक्ष्मण हे उदाहरण होते. त्या अर्थाने हा ‘अनकॉमन मॅन’चा आपोआपच निर्माण झालेला आणि अनेकांना दिशादर्शक ठरणारा ‘आर. के. बॅनर’ होता असे वाटते.
– प्रसाद दीक्षित, ठाणे

जबाबदारीच्या ‘लक्ष्मण रेषेचे’ भान असणारा व्यंगचित्रकार !
विश्वविख्यात व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांचे निधन ही एक वेदना देणारी बातमी आहे. व. पु. काळे यांनी एके ठिकाणी लिहून ठेवले आहे की ‘कावळा मेल्याचे दु:ख होत होत नाही, पण मोर मेल्याचे दु:ख होते’. लक्ष्मण हे अक्षरश: व्यंगचित्र कलेतील मोरच होते!
चित्रातून व्यक्त होणारे भाव हीच खरी या कलेची सौंदर्य आणि शक्तिस्थळे असतात आणि ही सौंदर्यस्थळे ठळकपणे चित्रातून व्यक्त होत आणि म्हणूनच ती लोकांना आवडत. व्यंगचित्रांच्या खाली लिहिलेली वाक्ये म्हणजे तर वाचकांना एक निराळा अनुभवच असे. ती वाचताना वाचकाच्या चेहऱ्यावर नकळत स्मित अवतरत असे. एखाद्याविषयी वाटणारा राग हा ते अशा प्रकारे व्यंगचित्रातून रेखाटत असत की, प्रत्येकाला ती प्रतिक्रिया आपली वाटत असे. परिस्थितीला चपखल अशी ती व्यंगचित्रे आणि भाष्य असे! आणि हेच खरे या यशाचे रहस्य होते. लौकिक अर्थाने प्रसिद्धी ही कुठल्याही प्रकारे वाद न ओढवता मिळवता येते हे लक्ष्मण यांनी आपल्या कलेतून दाखवून दिले. वादांनी मिळणारी प्रसिद्धी ही वाद निवल्यावर निवळते याची त्यांना जाणीव असल्यामुळेच ते अशा सवंग प्रसिद्धीच्या मागे लागले नाहीत. जबाबदारीच्या ‘लक्ष्मण रेषेचे’ त्यांना शेवटपर्यंत भान होते. म्हणून कुठलाही वाद त्यांच्या व्यंगचित्रातून झाला नाही वा ते कोणाचे ‘टाग्रेट’ ठरले नाहीत.
अनिरुद्ध गणेश बर्वे, कल्याण</strong>

सर्वसामान्यांच्याच भावना!
‘कसे बोललात लक्ष्मण’ हे विशेष संपादकीय (२८ जाने.) सर्वसामान्यांच्याच भावना व्यक्त करणारं होतं. आर. के. लक्ष्मण यांनी आजवर चितारलेल्या राजकीय व्यक्तींच्या व्यंगचित्रांमधील वैशिष्टय़े अचूक नोंदवली आहेत. त्यामुळे आज ती पूर्वीची व्यंगचित्रे आठवून पुन्हा एकदा आठवली.
आर.के. हे अन्य वृत्तसमूहाचे  व्यंगचित्रकार, परंतु ‘लोकसत्ता’ने विशेष संपादकीय देऊन व्यावसायिक प्रगल्भता आणि मनाचा मोठेपणा दाखविला आहे. ‘आपल्याला जग बदलायचे आहे, अशा त्वेषाने कधीही त्यांनी चित्रे काढली नाहीत.’ हे स्तंभातील वाक्य बरेच काही बोलून जाते, लक्ष्मणच्या व्यंगचित्रासारखंच.
-संदीप राऊत, वसई

धार्मिक तेढ  कमी होण्यासाठी..
‘ओबामांकडून राजधर्माचं स्मरण’ ही ठळक बातमी (लोकसत्ता, २८ जाने.) वाचली. आलेल्या प्रत्येक आक्रमकाने आपल्या सत्ताकाळात आपला धर्म वाढविण्यासाठी सर्व वैध व अवैध मार्गाचा वापर केला. अजूनही धर्मातरांचे उद्योग चालू असून घरवापसीचेही नाव त्यास दिले जात आहे. मोदी सत्तेवर आल्यानंतर हे प्रकार वाढू लागले आहेत.
आपला धर्म आपल्या घरांपुरता, प्रार्थना स्थळांपुरता कोणी ठेवायला तयार नाही. तो लाऊडस्पीकरद्वारे वातावरणात व रस्त्यावर आणला जातो. अशामुळे धार्मिक तेढ वाढते. त्याचे परिणाम सर्व देशाला भोगावे लागतात. हे टाळण्यासाठी सर्वप्रथम कायद्याने धर्मातरावर बंदी घातली पाहिजे. ज्याला धर्मपरिवर्तन करायचे आहे त्याला ते न्यायालयाच्या आदेशानंतरच करता येईल अशी तरतूद केली पाहिजे.
यापुढे कोणतीही नवीन मशीद, मंदिर, गुरुद्वारा, गिरिजाघरांना बाहेर स्पीकर लावायची परवानगी देऊ नये. ज्यांना दिली आहे त्यांना आवाजाची मर्यादा ठरवून द्यावी. या उपाययोजनेनेही धार्मिक तेढ कमी व्हायला मदत होईल.
प्रवीण देशमुख

बराक ओबामा येऊन गेले, पण..
येणार येणार म्हणून आलेले पाहुणे आले आणि परत गेले, पण त्यांनी प्रत्येकाच्या मनात स्वत:बद्दलच्या स्मृती कोरून ठेवल्या. परराष्ट्र राजकरणात त्या मानाने नवखे असणारे नरेंद्र मोदी कुठेही कमी न पडता बरोबरीच्या नात्याने त्यांच्याशी असणारे जिव्हाळ्याचे संबंधही वृद्धिंगत करताना दिसले. कोणतेही अतिरेकी विघ्न न येता पाहुण्यांची भारतभेट झाली.  
सुरक्षिततेच्या दृष्टीने काही दरबारी रीतिरिवाज बदलावे लागले त्यात काहीच अयोग्य वाटण्याचे कारण नाही, पण ज्या वेळी राष्ट्रपती भवनात जे कार्यक्रम झाले त्या वेळी राष्ट्रपतींशी कार्यक्रमाचे यजमान म्हणून संवाद साधणे गरजेचे होते, पण तो तितका साधला  नाही. त्यामुळे राष्ट्रपती एकटे पडल्यासारखे दिसले. राष्ट्रपतीच काय पण उपराष्ट्रपती अन्सारी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्याशीसुद्धा संवाद साधताना ते दिसले नाहीत. प्रत्येक समारंभात  सब कुछ नरेंद्र मोदी असे चित्र दिसत होते. मला वाटते मोदींनी याबाबत पुढाकार घेऊन इतर राष्ट्रीय उच्चपदस्थांची अवघडलेली स्थिती सावरली असती तर सर्व कार्यक्रमांतील वातावरणात मोकळेपणा आला असता.
-अश्विनी भावे, सातारा  

सर्वच खर्च शिवसैनिकांनी करावा!
दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर ‘अखंड ज्योत’ तेवत ठेवण्याकरिता जी सोय करण्यात येणार आहे त्याचा खर्च साधारण लाखोंच्या घरात जात आहे. तो खर्च महापालिका करणार असल्याचे, म्हणजेच करदात्यांच्या खिशातून करण्यात येणार असल्याचे समजले. (लोकसत्ता, २८ जाने.)
मला बाळासाहेबांबद्दल खूप आदर असला तरी प्रामाणिकपणे असे वाटते की, हा खर्च पालिकेने न करता शिवसनिकांनी आणि बाळासाहेबांच्या समर्थकांनी एकत्र मिळून केला पाहिजे. या पुढे जाऊन मला असेही वाटते की, या स्मारकाचा खर्चही शिवसनिकांनीच करावा. महाराष्ट्रात आणि पूर्ण भारतभर इतके असंख्य समर्थक असताना करदात्यांच्या खिशात हात घालणे दिवंगत बाळासाहेबांनाही पटणारे नाही. शिवाय देणगी स्वरूपात घेतलेली रक्कम अगदी १ रुपयापासून सुरुवात करावी जेणेकरून प्रत्येक समर्थकाला फूल ना फुलाची पाकळी म्हणून मदत करता येईल. मला वाटते असे केल्याने त्या वास्तुबद्दल सर्वसामान्यांच्या मनात आपुलकीची भावना निर्माण होण्यास मदत होईल. मात्र हा निधी शिवसैनिकांनी स्वेच्छेने गोळा करावा.
– अक्षय फाटक

Story img Loader