देवेंद्र फडणवीस व पृथ्वीराज चव्हाण या आजी-माजी मुख्यमंत्र्यांच्या संवादावर आधारित लेख (रविवार विशेष, १८ जाने.) वाचनीय होते. दोघेही सुविद्य, सुसंस्कृत व स्वच्छ चारित्र्याचे असल्याने त्यांचे विचार अर्थातच मननीय होते. पण काही गोष्टी कळल्या नाहीत! त्या अशा :
माजी मुख्यमंत्र्यांनी नागरिकीकरणाच्या समस्या सांगताना जनतेच्या दृष्टीने जिव्हाळ्याच्या असलेल्या अनधिकृत बांधकामांच्या प्रश्नाचा योग्य उल्लेख केला आहे. घाम गाळून जमवलेली बचत एखाद्या सदनिकेत गुंतवायची आणि ज्या इमारतीत ती सदनिका आहे ती इमारतच अनधिकृत म्हणून घोषित व्हायची, असली परिस्थिती नेहमीच पाहायला मिळते. प्रश्न एकच पडतो की, या इमारती दिवसाढवळ्या धडधडीत सूर्यप्रकाशात कशा उभ्या राहतात? ‘स्थानिक प्रशासनाच्या नाकावर टिच्चून’ हा शब्दप्रयोग अर्थातच लागू होत नाही, कारण हे त्यांच्याबरोबर बिल्डर्सच्या असलेल्या संगनमतानेच शक्य होते. पृथ्वीराजजीसुद्धा म्हणतात की, गुंतलेले ‘राजकीय हितसंबंध’ यामागचे मूळ कारण आहे. त्यांच्यासारख्या स्वच्छ प्रतिमेचा राजकारणी या बजबजपुरीत किमान हे सत्य मान्य करतो हेच मोठे आहे. त्यावर त्यांनी उपायही सुचवला आहे ‘राजकीय इच्छाशक्ती’! या इच्छाशक्तीच्या अभावाचा अनुभव जनतेला खुद्द त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कालावधीतही दिसून आला. नोव्हेंबर २०१० ते मार्च २०१४ इतका काळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद त्यांनी भूषविले. त्या काळात त्यांनी या प्रश्नाबाबत ‘डीम्ड कन्व्हेअन्स’चा शोधलेला उपाय कागदपत्रांच्या अटीमुळे अपुराच ठरला. ही समस्या त्यांनी मुख्यमंत्री म्हणून असलेले सर्वाधिकार वापरून दूर केली असती तर महाराष्ट्राची जनता त्यांची आजीवन ऋणी राहिली असती.
देवेंद्र फडणवीसांनीदेखील त्यांच्या प्रतिमेला न साजेशी काहीशी धक्कादायक अशी विधाने केली आहेत. ‘लोकप्रिय घोषणा करणे हा आमचा धर्मच आहे.’ ‘आम्हाला जनतेने त्यासाठीच तर निवडून दिले आहे’. फडणवीस अजूनही विरोधी पक्षाच्या अंगरख्यातून बाहेर पडलेले दिसत नाहीत. अफाट आणि सवंग (किंवा ‘युटोपियन’) लोकप्रिय घोषणा देण्याची वृत्ती ही सामान्यपणे सत्तेवर निवडून येण्याची खात्री नसलेले पक्ष करतात. फडणवीसांची परिस्थिती भिन्न आहे. त्यांचा पक्ष सत्तेवर येण्याविषयी खात्री होती. त्यामुळे घोषणा करताना त्या अमलात आणता येतील याची शहानिशा करणे मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार म्हणून त्यांनी केली असणार. भावी सत्ताधारी पक्ष म्हणून जनतेने आपल्याला ‘लोकप्रिय घोषणा करण्या’साठी नव्हे त्यावर आधारलेला ‘वचननामा सिद्धीस नेण्या’साठी निवडून दिले आहे हे त्यांनी लक्षात घेतले पाहिजे. नाहीतर जनतेचा भ्रमनिरास व्हायचा.
देवेंद्रजी आणि पृथ्वीराजजी यांच्या एका मुद्दय़ावर सहमती दिसते- सिंचनाचा प्रश्न. चव्हाणांच्या मते मोठी धरणे बांधून पाण्याचा प्रश्न सुटणार नाही, तर त्यासाठी छोटे तलाव, सिमेंट बंधारे किंवा शेततळी बांधली पाहिजेत. ही सूचना नक्कीच स्वीकारार्ह असली तरी मोठय़ा धरणांना पर्याय नाही हे त्रिकालाबाधित सत्य आहे. ‘गेल्या २० ते २५ वर्षांत जलसंधारणावर बराच निधी खर्च झाला; पण प्रत्यक्षात कामे झालेली नसून बंधारे कागदावरच राहिले आहेत’ हे फडणवीसांचे विधान आता कागदपत्रांनिशी सिद्ध करण्याची वेळ आली आहे व त्याची पूर्ण जबाबदारी विद्यमान मुख्यमंत्री म्हणून त्यांच्यावरच राहणार आहे. या मुद्दय़ावर त्यांनी निवडणुका लढविल्या हे ते विसरले नसतील; तसेच ‘आम्हाला जनतेने लोकप्रिय घोषणा करण्यासाठीच तर निवडून दिले’ या भ्रमातही ते राहणार नाहीत, असा विश्वास त्यांची जनमानसातील एकंदर प्रतिमा पाहता ठेवता येतो, असे वाटते.
संजय जगताप, ठाणे.
जनतेच्या अपेक्षांशी यांचे देणेघेणे..
देवेंद्र फडणवीस व पृथ्वीराज चव्हाण या आजी-माजी मुख्यमंत्र्यांच्या संवादावर आधारित लेख (रविवार विशेष, १८ जाने.) वाचनीय होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 20-01-2015 at 12:47 IST
मराठीतील सर्व लोकमानस बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Readers response on loksatta news