‘तोच खेळ पुन्हा पुन्हा..’ हा गिरीश कुबेर यांचा लेख (अन्यथा, १० जानेवारी) वाचला. त्यातील ‘खेळ’ हा शब्दप्रयोग कितीही समर्पक असला तरी दोन कारणांनी अतिशय अस्वस्थ करणारा वाटला. पहिले कारण म्हणजे दहशतवाद आणि त्यातून घडणाऱ्या हिंसक घटना वारंवार समोर येत राहिल्या, की त्याकडे बघण्याची आपली नजर आपल्याच नकळत कशी मरते हे त्यातून अधोरेखित होते. पॅरिसमध्ये घडलेल्या घटनांचे वर्णन करताना अनेक माध्यमांमधून ओलीसनाटय़ ‘रंगले’ होते असा शब्दप्रयोग करण्यात आला. घडणारे प्रसंग अटीतटीच्या खेळासारखे ‘नाटय़मय’ होते हे तर खरेच आहे; पण ते ‘रंगले होते’ (‘घडत होते’ नव्हे!) असे आपण सहज म्हणून जातो. एखादा ‘डेली सोप’ पहावा तसे ते प्रसंग पाहिले जातात, तशीच क्षणिक चुटपुट लागते आणि तशीच लगेच निघूनही जाते!
दुसरे कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारणात असे प्रकार बुद्धिबळ खेळावे तसे थंड डोक्याने खरोखरच ‘खेळले’ जातात हे वास्तव तर भयानक आहे. राजकारण, अर्थकारण आणि एकूणच मनुष्यस्वभाव यांचा अभ्यास सध्या ‘गेम थिअरी’ वापरून करण्यात येतो. दहशतवाद कसा ‘खेळला’ जात आहे ते वाचून ‘जेंगा’ या एका घरगुती चिनी खेळाची आठवण होते. त्यामध्ये सोन्याच्या चिपा असतात तशा आकाराचे लाकडी ठोकळे उभेआडवे रचून प्रथम अनेक थरांचा साधारण एक फूट उंचीचा मनोरा उभा केला जातो. आपल्यावर खेळाची पाळी आली, की खेळातून बाद न होण्याकरिता खालच्या थरांमधून एखादा ठोकळा अलगद काढायचा आणि मनोऱ्याच्या माथ्यावर नवा थर रचायला घ्यायचा असतो. सर्व जण ‘खेळात’ टिकून राहण्याकरिता हेच करत राहतात. परिणामी खालचे थर कमकुवत होत जातात आणि मनोऱ्याची उंची मात्र वाढत राहून तो दोलायमान होत शेवटी पडून जातो. मनोरा डळमळीत होत आहे हे दिसत असूनही ‘आजच्या घडीला मी खेळातून बाहेर फेकला जाता कामा नये’ असा तात्कालिक विचार करत सगळेच खेळाडू नाश ओढवून घेतात! मी थांबलो तरी इतर थांबतील याची खात्री काय, असा विचार करून कोणीच थांबत नाही. सगळ्या जगाचाच एक ‘जेंगा’ होत चालला आहे, ही जाणीव लेख वाचून प्रकर्षांने होते.
– प्रसाद दीक्षित, ठाणे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा