केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञानमंत्री हर्षवर्धन व माहिती- प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी भारतीय विज्ञान परिषदेत केलेली वक्तव्ये ही संघ परिवाराच्या विचारप्रणालीची, अवैज्ञानिक आणि अवास्तव आहेत. प्राचीन भारतात विज्ञानाची काही प्रमाणात प्रगती झाली होती हे निर्वविाद सत्य. पण भारत जातिवाद व कर्मकांड यांच्यात जसजसा अडकत गेला तशी त्याची वैज्ञानिक वाढ खुंटत गेली.
आज याच जाति-वर्णवादी समाजव्यवस्था, कर्मकांड व धर्मवादाचे समर्थन करणारे सरकार केंद्रात आहे. महाराष्ट्रात जादूटोणाविरोधी कायदा लागू करण्यास याच पक्षांच्या वतीने विरोध करण्यात आला होता. प्राचीन भारताच्या वैज्ञानिक शोधांच्या नावाने राष्ट्रवाद भडकवायचे, पण राजकारण मात्र मूलतत्त्ववादाचे करायचे असे सरकारचे वागणे आहे.
वास्तवात देशात विज्ञानाचा विकास वैज्ञानिक विचारपद्धत रुजविणे, शिक्षण तसेच संशोधांनावरचा खर्च वाढवणे यातूनच देशाचा विकास होऊ शकतो. आज हुशार विद्यार्थी मूलभूत विज्ञानाचे शिक्षण घेण्याऐवजी व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या निवडीला जास्त पसंती देतात. यातून देशाच्या संशोधनाला खीळ बसत आहे. औद्योगिकीकरणानंतर जी प्रगती पाश्चात्य देशांनी साध्य केली किंवा चीन व रशिया या देशांनी शिक्षण-विज्ञानाला महत्त्व देऊन साध्य केली, ती आपण गतवैभवाच्या फुशारक्या मारून मिळवू शकत नाही.
तेव्हा कोणताच वैज्ञानिक आधार नसलेली ‘बकवास’ विधाने करण्याऐवजी शिक्षण व विज्ञानाच्या विकासासाठी सरकार काय करीत आहे, याची मांडणी केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञानमंत्री यांनी करणे आवश्यक आहे.
अॅड. संजय पांडे, वर्धा
‘भविष्य’ थांबवा!
‘सांगे वडिलांची कीर्ती’ हा अग्रलेख (६ जाने.) विज्ञाननिष्ठेचा पुरस्कार करतो. विज्ञानाच्या कसोटीवर घटना तपासून पाहण्याची मानसिकता समाजात वाढीस लागायला हवी तरच या भंपकपणाला आळा बसेल. पण ही काही एका रात्रीत होणारी गोष्ट नाही, त्यासाठी प्रसारमाध्यमांनीही पुढाकार घेतला पाहिजे. आपल्या वर्तमानपत्रातील भविष्य हे सदर ताबडतोब बंद करायला हवे. ‘प्रयत्नांची साथ हवी’, ‘भ्रमात राहू नका’, ‘शेतीची कामे होतील’ अशा निर्थक विधानांनी ते भरलेले असते आणि भाबडा समाज ते वाचून दिनक्रम ठरवतो. अशा सामाजिक पर्यावरणात वैज्ञानिक दृष्टी विकसित व्हावी अशी अपेक्षा करणे जरा जास्तच होत नाही का?
गार्गी बनहट्टी, दादर (मुंबई)
‘येक’ नव्हे ‘अनेक’ मूर्ख..
दर्पणकार बाळशास्त्री जांभेकरांनी १८४० मध्ये लिहिलेल्या ‘विज्ञाननिष्ठ मानव घडवण्याची गरज’ या लेखापासून ‘लोकसत्ता’च्या ‘सांगे वडिलांची कीर्ती’ (६ जाने.)पर्यंत असंख्य वेळा घसाफोड करूनही सामुदायिक निर्बुद्धता किंचितही कमी होत नाही आणि विद्यापीठ पातळीवरील स्वत:ला बुद्धिवंत समजणाऱ्या आयोजकांना ‘आपण भूतकाळाची आरती ओवाळून देशाचे भविष्य अंधकारमय करीत आहोत’ याची जाणीव होत नाही, याला काय म्हणावे? ‘एके काळी आमच्या देशात सोन्याचा धूर निघत होता’ हे सांगून आपल्या आजच्या आíथक दारिद्रय़ाला अधोरेखित करणे काय आणि ऋग्वेदाचे किंवा बौद्धायनाचे संदर्भ देऊन आपल्या विमान- पायथागोरस शोधाच्या इतिहासाचे गुणगान गात आपला आजचा वैज्ञानिक मागासलेपणा जगजाहीर करणे काय, दोन्ही सारखेच! ‘सोन्याच्या धुरा’चा आíथक महासत्तेशी किंवा ‘विज्ञान प्रगती’चा वैज्ञानिक महासत्तेशी संबंध असतो हेही भल्याभल्यांना समजू नये, याचे आश्चर्य वाटते.
– प्रफुल्ल चिकेरूर, नाशिक
श्रीपाद पु. कुलकर्णी (पुणे), अक्षय नलावडे (परांडा, जि. उस्मानाबाद), राजीव मुळय़े (दादर, मुंबई), यांनीही याविषयीची पत्रे पाठविली आहेत.
रोगी ‘जन-धना’ने कसा वाचेल?
‘तरी तो रोगी वाचेना’ हा अग्रलेख (लोकसत्ता, ५ जानेवारी) वाचला. राजकारण्यांची बँकिंग क्षेत्रातील लुडबुड थांबविणे हे तर अनिवार्य आहेच, पण जन-धन योजनेबद्दल अग्रलेखात उपस्थित केलेली शंकासुद्धा रास्त आहे. दहा कोटी खात्यांमधली ७३ टक्के खाती शून्य शिलकीची आहेत. सहा महिने समाधानकारक व्यवहार केल्यानंतर आणि घरटी एकाला, या अटींवर जन-धन योजनेमध्ये पाच हजार रुपयांचा ओव्हरड्राफ्ट मिळण्याची सुविधा आहे. शून्याहून अधिक रक्कम असलेल्या या उर्वरित २७ टक्के खात्यांमधील एकपंचमांश खात्यांनीही या अटी पूर्ण केल्या असे मानले तरी ५.४ कोटी खात्यांना येत्या सहा महिन्यांच्या कालावधीत प्रति खाते रु. ५००० च्या हिशेबाने तब्बल २७००० कोटी रुपयांचा ओव्हरड्राफ्ट बँकांना उपलब्ध करून द्यावा लागेल!
इतका पसा उभा करण्याची आपल्या बँकांची क्षमता आहे का? आणि यातून उद्भवू शकणाऱ्या बुडित कर्जाचे काय? नरेंद्र मोदींनी लोकांना सोन्यात पसा न गुंतवता बँकांमध्ये गुंतविण्याचा सल्ला दिला आहे. सोन्यावर भारतीयांची असणारी पारंपरिक श्रद्धा आणि त्यावर मिळणारा परतावा यांची बरोबरी करू शकेल, इतका बँक ठेवींवरचा परतावा आकर्षक नाही आणि आधीच ग्राहकसेवेबाबत खासगी बँकांच्या तुलनेत पिछाडीवर पडलेल्या राष्ट्रीयीकृत बँका जन-धन योजनेमुळे पार मोडून पडतील की काय, अशी भीती निर्माण झाली आहे.
सत्यव्रत इंदुलकर, ठाकूरद्वार (मुंबई)
यापुढे मंत्रोपचार.. वरदानशास्त्र.. बळीविद्या?
विमान किंवा अन्य आधुनिक संकल्पनांबद्दल ‘ठोस आणि तपशीलवार’ माहिती पुराणसाहित्यात नसताना, केवळ वरवरचा ‘उल्लेख’ म्हणजे ‘पुरावा’ असे जे समीकरण मुंबईतील भारतीय विज्ञान परिषदेत उलगडले ते अवैज्ञानिक व अविश्वासार्हच होय.
या पाश्र्वभूमीवर पुढल्या, १०३ व्या भारतीय विज्ञान परिषदेत ‘रोगांवरील मंत्रोपचार’, ‘बळी-विद्या’, ‘वरदान-शास्त्र’, ‘श्राप-विज्ञान’ वगरे विषयांवरही रिसर्च पेपर्स पब्लिश होतील आणि सरकारनेही बिनदिक्कतपणे या संशोधनांना निधी उपलब्ध करून द्यावेत.. कारण यांचाही ‘उल्लेख’ अनेक प्राचीन ग्रंथांमध्ये आढळतच असणार! अशा महत्त्वपूर्ण संशोधनांमुळे भारत नक्कीच महासत्ता ठरेल..
-अनुजा मंगल दत्ता, गिरगाव (मुंबई)
या थोरथोरांनी जरा सावित्रीबाईंचेही ऐकावे..
‘पायथागोरस सिद्धांत भारताचाच’ असे विधान करणारे केंद्रीय मंत्री हर्षवर्धन आणि त्याला दुजोरा देणारे शशी थरूर दोघेही थोर यात संशय नाही! सौरमाला, वैद्यक विज्ञान, रसायन शास्त्र व पृथ्वी विज्ञानात आपण आपले ज्ञान नि:स्वार्थीपणे जगाबरोबर वाटले होते या हर्षवर्धन-थरूर यांच्या विचारांशी सहमत होऊच; परंतु थरूर यांना हे ठाऊक नाही का, की आम्ही आमचे ज्ञान आमच्याच देशबांधवांपासून हजारो वर्षे लपवून ठेवले त्याचे काय? आमच्या पुराणांत काय नाही! सर्व काही आहे हो, परंतु संशोधन क्षेत्रात भारत कुठे आहे, हे या विद्वानांना नक्कीच ठाऊक असेल. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या शब्दांत सांगायचे झाले तर, ‘दे रे हरी पलंगा काही, पशुही असे बोलत नाही, तयास मानव म्हणावे का?’
चार इयत्ता शिकलेल्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी या दोन ओळींतून जे सांगितले ते आजच्या, पदव्यांची भेंडोळी असलेल्या विद्वानांना का ज्ञात नाही, याचे आश्चर्य वाटते.
ज्योत्स्ना दिलीप पाटील, नाशिक
भाषा नव्हती, तेव्हा विचार कसा होता?
शरद बेडेकर यांच्या ‘मानव विजय’ या सदरातील पहिला लेख (५ जाने.) वाचून एक जुनाच पण मला नेहमी पडणारा प्रश्न आठवला. लेखात म्हटल्याप्रमाणे शहाणा मानव समाजात एकमेकांशी संवाद साधण्यासाठी त्याच्या आवाजाचे काही शब्द व हळूहळू त्याची भाषा बनू लागली. भाषा आणि मेंदू एकमेकांशी साह्य करू लागले. प्रश्न असा आहे की विचार करण्यासाठी भाषा आवश्यक आहे का? आज आपला अनुभव असा आहे की आपण कुठल्या तरी भाषेत विचार करतो. भाषेशिवाय विचार अशक्य वाटतो. मग भाषेचा शोध लागेपर्यंत मानवाने विचार कसा केला असेल? कृपया जाणकारांनी माहिती द्यावी.
– अ. रा. उदगीरकर, नागपूर</strong>