केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञानमंत्री हर्षवर्धन व माहिती- प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी भारतीय विज्ञान परिषदेत केलेली वक्तव्ये ही संघ परिवाराच्या विचारप्रणालीची, अवैज्ञानिक आणि अवास्तव आहेत. प्राचीन भारतात विज्ञानाची काही प्रमाणात प्रगती झाली होती हे निर्वविाद सत्य. पण भारत जातिवाद व कर्मकांड यांच्यात जसजसा अडकत गेला तशी त्याची वैज्ञानिक वाढ खुंटत गेली.
आज याच जाति-वर्णवादी समाजव्यवस्था, कर्मकांड व धर्मवादाचे समर्थन करणारे सरकार केंद्रात आहे. महाराष्ट्रात जादूटोणाविरोधी कायदा लागू करण्यास याच पक्षांच्या वतीने विरोध करण्यात आला होता. प्राचीन भारताच्या वैज्ञानिक शोधांच्या नावाने राष्ट्रवाद भडकवायचे, पण राजकारण मात्र मूलतत्त्ववादाचे करायचे असे सरकारचे वागणे आहे.
वास्तवात देशात विज्ञानाचा विकास वैज्ञानिक विचारपद्धत रुजविणे, शिक्षण तसेच संशोधांनावरचा खर्च वाढवणे यातूनच देशाचा विकास होऊ शकतो. आज हुशार विद्यार्थी मूलभूत विज्ञानाचे शिक्षण घेण्याऐवजी व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या निवडीला जास्त पसंती देतात. यातून देशाच्या संशोधनाला खीळ बसत आहे. औद्योगिकीकरणानंतर जी प्रगती पाश्चात्य देशांनी साध्य केली किंवा चीन व रशिया या देशांनी शिक्षण-विज्ञानाला महत्त्व देऊन साध्य केली, ती आपण गतवैभवाच्या फुशारक्या मारून मिळवू शकत नाही.
तेव्हा कोणताच वैज्ञानिक आधार नसलेली ‘बकवास’ विधाने करण्याऐवजी शिक्षण व विज्ञानाच्या विकासासाठी सरकार काय करीत आहे, याची मांडणी केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञानमंत्री यांनी करणे आवश्यक आहे.
अॅड. संजय पांडे, वर्धा
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा