‘तरी तो रोगी वाचेना’ (५ जानेवारी) या अग्रलेखातून केलेली मीमांसा आवडली. राष्ट्रीयीकृत आणि जिल्हा बँका म्हणजे राजकीय पक्ष आणि खास करून सत्ताधाऱ्यांना मिळालेले आंदण असते. सगेसोयरे, मित्रआप्तेष्टांना कर्ज मंजूर करून द्या, हवी तेवढी कर्जमाफी द्या, हे नित्याचेच झाले आहे. या प्रकारात दिली गेलेली अनेक कर्जे ही तर बुडवण्याच्या उद्देशांनी घेतलेली असतात. या दुष्टचक्रात राजकारणी, सत्ताधारी आणि तेवढेच बँकांचे वरिष्ठ-कनिष्ठ अधिकारीसुद्धा जबाबदार असतात.
सुमारे २००० सालच्या उंबरठय़ावर रिझव्र्ह बँकेने ‘अनुत्पादक कर्जाची व्याख्या आणि त्यावर करावयाच्या तरतुदी’ यांचे कठोर निकष सर्व बँकांना लागू केले. या निकषांच्या अंमलबजावणीनंतर तरी अनुत्पादक आणि बुडीत कर्जाचे प्रमाण लक्षणीय प्रमाणात कमी होणे अपेक्षित होते. वास्तवात मात्र ते खूपच वाढत गेले आहे आणि आता ते धोकादायक पातळीच्याही पलीकडे गेले आहे. याची जबाबदारी बँक व्यवस्थापनाची आणि त्यावर आपला दबाव ठेवणाऱ्या राजकारणी, सत्ताधाऱ्यांची तर आहेच, पण त्यासोबत बँकांचे लेखापरीक्षण करणाऱ्या संस्थांचीसुद्धा आहे.
लेखापरीक्षक हे बँकांसाठी धोकासूचकाचे काम करत असतात. मात्र काही बँकांमध्ये, व्यवस्थापन आणि लेखापरीक्षण यांची होणारी युती किंवा लेखापरीक्षकांचा निष्काळजीपणा खूपच धोकादायक ठरतो. एक लेखापरीक्षक म्हणून काम करताना, मला ही गोष्ट अनेक प्रसंगी जाणवली आहे. विशेष करून काही राष्ट्रीयीकृत आणि छोटय़ा सहकारी बँकांमध्ये वैधानिक लेखापरीक्षक, आपली जबाबदारी पार पडताना अनेक कारणांनी अक्षम्य कर्तव्य-कसूर करतात. त्यामुळे कर्जमंजुरीची आणि वसुलीची प्रक्रिया जशी पारदर्शक असणे गरजेचे आहे, किंबहुना लेखापरीक्षणाची प्रक्रिया त्याहीपेक्षा कठोर, पारदर्शक आणि दंडात्मक असणे गरजेचे आहे.
या साऱ्या प्रक्रिया जोपर्यंत कठोर आणि पारदर्शक होत नाहीत आणि सरकारी-राजकारणी यांचा बँकांमधील हस्तक्षेप थांबत नाही, तोपर्यंत बँकांचा जीव जातच राहणार आणि सर्वसामान्यांचे घामाचे पसे बुडतच राहणार. सत्ताधारी मात्र बँकाच्या सुधारणांची तोंडपाटीलकी करतच राहणार.
अंकुश मेस्त्री, बोरिवली (मुंबई)
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा