बँक कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीच्या बातमीबद्दल (लोकसत्ता, २४) काही मुद्दे. बहुतेक वेळी द्विपक्षीय करार करताना ‘पूर्वलक्ष्यी प्रभाव’ दिला जात असतो. मध्यंतरीच्या काळात होणारी दरवाढ (इन्फ्लेशन) किंवा ‘काळाच्या आर्थिक मूल्या’च्या सिद्धांताचा विचार केला, तर खरोखरच त्या अर्थाने १५ टक्के वाढ म्हणता येईल का? ही धूळफेक नाही वाटत?
काही पारंपरिक दृष्टिकोन आणि पद्धती आता बँक कर्मचारी संघटनांनी आणि आय.बी.ए.ने बदलाव्यात. आपण करत असलेल्या मागणीचे प्रमाण योग्य आहे का, याचा संघटनांनी सुरुवातीलाच सारासार विचार करावा. २५ टक्क्यांवरून १५ टक्क्यांपर्यंतची संघटनांची समजूतदार(?) घसरण किंवा व्यवस्थापन प्रतिनिधींनी ११.५ टक्क्यांवर सुरुवात करून शेवटी १५ टक्क्यांवरची यशस्वी चढण करण्यासाठी दोन वर्षांहून जास्त काळ लागणे, ही अक्षम्य दिरंगाई आहेच. न्यायसूत्रानुसार उशिरा मिळणारा न्यायदेखील अन्याय असतो याचे भान दोन्ही पक्षांनी पाळायलाच हवे.
किमान वाढ आणि त्याची विस्तारमर्यादा (स्प्रेड) सर्व संघटनांनी आधीच ठरविली तर सोयीचे होईल. करारावर स्वाक्षरी करून पुन्हा एखादी संघटना (सध्या एन.ओ.बी.डब्लू.) आपण १५% वाढीवर समाधानी नाही, असे म्हणते. अशी वेळ का यावी?
बोलण्यासाठी इतका कालापव्यय(?) अपरिहार्यच असेल, तर २०१७ साली पुन्हा होणाऱ्या करारासाठी आतापासूनच बोलणी सुरू करावीत! म्हणजे कधी तरी ट्रेन राइट टाइम आल्यासारखे वाटेल. अजूनही काही मुद्दय़ांवर बोलणी बाकीच आहेत म्हणे.. लगे रहो!
पगारवाढीने पडणारा एकंदर ४७२५ कोटी रुपयांचा बोजा ही सरकारी बँकांतील दहा लाख कर्मचाऱ्यांवर केलेली द्विपक्षीय कृपा असली, तरी वाढीव आयकराची देय रक्कम, संघटनांना द्यायचा अतिरिक्त लेव्ही, हे सगळे हिशोब करून मगच बँक कर्मचाऱ्यांनी १५ टक्क्यांच्या विजयोत्सवाचे तोफगोळे उडवावे. समाधान एकच, व्यवस्थापकीय वर्गाला, दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँकेत शटर पाडून आत शांतपणे काम करत बसता येईल!
अद्यापही, ‘मारुती कांबळेचं काय झालं?’च्या थाटात ‘पेन्शनर-लोकांचं काय झालं?’ हा प्रश्न उरतोच, त्याची चर्चा २०१७ पर्यंत पुढे ढकलू या!!
मनोहर निफाडकर, निगडी (पुणे)
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा