‘खबरदार, विचार कराल तर..’ या कॉ. पानसरे यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ लिहिलेल्या अग्रलेखातील (१७ फेब्रुवारी) ‘भांडारकर संस्थेवरील हल्ल्या’चा उल्लेख अप्रस्तुत वाटला. नरेंद्र दाभोलकर, कॉ. पानसरे यांच्यावरील हल्ला विचार संपवण्यासाठी केला गेला असू शकतो; परंतु भांडारकर प्राच्यविद्या संस्थेवरील हल्ल्याबाबत मात्र असे म्हणता येत नाही. जेम्स लेननामक परकीय व्यक्तीला हाताशी धरून रस्त्यावरील अश्लील विनोदाला इतिहास म्हणून प्रचलित करण्याच्या ‘अविचारी’  प्रयत्नाचा निषेध म्हणून भांडारकर प्रकरण घडले.
 नरेंद्र दाभोलकर, कॉ. पानसरे यांचे हल्लेखोर पसार झाले, मात्र भांडारकर प्रकरणातील तरुण ंआपला निषेध नोंदवून तिथेच घोषणा देत थांबले  होते. तेव्हा वृत्तपत्रातील कुणालाही या तरुणांना भेटून त्यांच्या निषेध कृत्यामागची पाश्र्वभूमी का समजून घ्यावीशी वाटली नाही? आजही हे तरुण जिवंत आहेत. तेव्हा दाभोलकर, पानसरे यांच्यावरील हल्लेखोर व भांडारकर प्रकरणातील तरुण यांची तुलनाच होऊ शकत नाही.
दाभोलकर-पानसरे यांच्यावरील हल्लेखोरांनी महाराष्ट्राला निश्चितपणे ‘खबरदार.. विचार कराल तर..’ हा इशारा दिला; पण भांडारकर प्रकरणातील तरुणांनी मात्र ‘खबरदार.. अविचार कराल तर..’ असा इशारा त्यांच्या निषेध कृत्यातून दिला आहे. म्हणून हा पत्रप्रपंच.
बालाजी जाधव, औरंगाबाद

धार्मिक शक्तींना राजाश्रय मिळतो आहे
‘खबरदार, विचार कराल तर..’ या अग्रलेखात (१७ फेब्रु.) म्हटल्याप्रमाणे, पुरोगामी विचारवंतांच्या महाराष्ट्रात वैचारिक समतोल ढासळतो आहे आणि तथाकथित प्रतिगामी-पुरोगामी संघटनांमध्ये गुंडगिरी बोकाळते आहेच; परंतु काही मुद्दे मात्र प्रकर्षांने खटकतात.
महत्त्वाची बाब म्हणजे, डॉ. दाभोलकरांच्या हत्येआधी अनेक वेळा काही धर्माध संघटनांनी त्यांना आणि कार्यकर्त्यांना उघडपणे इंटरनेटवरच्या त्यांच्या वेबसाइटवरून धमक्या दिल्या होत्या आणि त्याविरुद्ध अंनिसने पोलिसात तक्रारसुद्धा दखल केली होती आणि विशेष म्हणजे अंनिसला छुप्या पद्धतीने जमेल तितका त्रास द्यायचा असा विडाच धर्माध शक्तींनी आणि साधू-भोंदूंनी घेतला होता आणि आज तर तो वाढलाच आहे, हे अंनिसच्या कार्यकर्त्यांना काम करताना जाणवते आहे. काही महत्त्वाच्या कार्यकर्त्यांना आजही, ‘तुमचा दाभोलकर करू’ अशा आशयाच्या धमक्या येत असतात आणि पोलीसदल याबाबत अक्षम्य दिरंगाई दाखवते.  
कॉम्रेड पानसरे हेसुद्धा अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये, या वयातसुद्धा सक्रिय आहेत. काही दिवस आधी त्यांनी नेहमीप्रमाणेच धर्माध प्रवृत्तींवर टीका केली होती. म्हणजे आता या राज्यात समाजसंतुलन बिघडवणाऱ्या प्रवृत्तींवर उघडपणे टीका करणेसुद्धा ‘खूनपात्र गुन्हा’ ठरतो आहे काय? आणि असे असेल, तर प्रतिगामी धर्माध शक्तीची ताकद बळावते आहे, हे कसे नाकारणार? गेल्या काही महिन्यांत साधू-भोंदूंचा वाढणारा उपद्रव, इंग्रजी-चर्चच्या शाळांवर दिल्लीमध्ये झालेले हल्ले, हे सारे देशातील सामाजिक संतुलन बिघडवणारेच आहे. म्हणून धार्मिक शक्तींना कुठे तरी राजाश्रय मिळतो आहे की काय, अशी शंका घेण्यास जागा आहे.
राज्य सरकारकडून काय अपेक्षा करणार? त्यांची सत्तेची साठमारी आणि रुसवेफुगवेच संपत नाहीत. त्यामुळे विचारस्वातंत्र्याची ऐशीतशीच झाली आहे.
अंकुश मेस्त्री, बोरिवली (मुंबई)

Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Two hundred acres of farmland damaged by rangava in Shirala
शिराळ्यात गव्यांकडून दोनशे एकर शेतीचे नुकसान
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : “देवेंद्र फडणवीस यांनी जोर लावावा आणि आकाला..”, संतोष देशमुख हत्याप्रकरणावर काय म्हणाले सुरेश धस?
Image Of Dhananjay Munde
Dhananjay Munde : “माझ्याजवळचा असला तरी सोडू नका”, संतोष देशमुख हत्येप्रकरणी धनंजय मुंडेंकडून फाशीची मागणी
Satish Wagh murder case, Satish Wagh Wife ,
सतीश वाघ खून प्रकरणात पत्नी सामील, मारेकऱ्यांना पाच लाखांची सुपारी; पत्नी गजाआड
Important update regarding municipal elections in Maharashtra state
राज्यातील महापालिका निवडणुकीबाबत महत्वाची अपडेट, बावनकुळे म्हणाले…
criem news
विशाल गवळीने घरातच मुलीवर अत्याचार करून केली तिची हत्या , पत्नीच्या साह्याने मृतदेहाची विल्हेवाट

हिंसक प्रवृत्तीला जाब विचारण्याची तयारी आहे?
गोिवद पानसरे आणि त्यांच्या पत्नीवर खुनी हल्ला करण्यात आला. दीड वर्षांपूर्वी डॉ. नरेंद्र दाभोलकरांना अशाच प्रकारे संपवण्यात आले. महाराष्ट्रात ही विखारी प्रवृत्ती आली कुठून? राजरोसपणे पिस्तूल बाळगणारे आणि दिवसाढवळ्या खून करणारे असे कोण आणि किती जण आपल्या समाजात वावरत आहेत? कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेल्या पोलीस खात्याला याची जराही चिंता नाही का?
आपण सर्वच जण संवेदनहीन झालो असल्याचे हे लक्षण आहे असे मला वाटते. अशा घटना घडल्यानंतर सरकारला, पोलीस प्रशासनाला आणि या िहसक प्रवृत्तीला जाब विचारण्यासाठी आपल्यापकी किती जणांची रस्त्यावर उतरण्याची तयारी आहे? सर्व प्रश्नांची उत्तरे रस्त्यावर उतरून मिळत नाहीत हे खरे असले तरी याबाबतीत आता इतर कोणताही उपाय उरलेला नाही असे म्हणावे लागेल.
वेगळा विचार मांडणाऱ्या प्रत्येकाच्या पाठीशी समाज उभा आहे असे चित्र जोवर निर्माण होणार नाही तोवर असे हल्ले होतच राहतील आणि असे बळी पडतच राहतील.
ऋजुता खरे, चिपळूण       

नेभळटांचा महाराष्ट्र
डावी किंवा उजवी विचारसरणीच्या गप्पा मारत बसण्यापेक्षा या हल्लेखोरांना पकडण्यासाठी आपल्या सदसद्विवेकबुद्धीचा वापर करून प्रयत्न करणे जास्त महत्त्वाचे आहे. अन्यथा भविष्यात शेट्टींसारखे कार्यकर्ते आणि दाभोलकर, पानसरे अशा विचारी नेत्यांवर पाच-दहा हजार रुपयांसाठी हल्ले होत राहतील आणि महाराष्ट्र विचार करणे बंद करून टाकेल.. विचारांची शिदोरी असलेला महाराष्ट्र नेभळटांचा महाराष्ट्र होईल.
पांडुरंग वऱ्हाडे

पूर्वनियोजित दिसतो, तो पुरोगामी विचार-ऊर्जाकेंद्रे संपवण्याचा कट
गोविंद पानसरे यांच्यावरचा हल्ला हा एका पूर्वनियोजित कटाचा भाग आहे हे माझे विधान ‘लोकसत्ता’च्या संपादकांना मान्य नसल्यामुळे त्यांनी त्याचे   infantalization  म्हणजेच बालिशीकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे (संदर्भ: १७ फेब्रुवारीचा अग्रलेख). पूर्वनियोजित कट याचा अर्थ दाभोलकर, पानसरे यांसारखी पुरोगामी विचाराची ऊर्जाकेंद्रे संपवण्याचा कट. चहा प्यायला गेले असताना खून करून न येता, खून करायला जाताना नियोजन करून जाणे असा त्याचा अर्थ नव्हे.
दाभोलकर व पानसरे यांच्यावरील हल्ल्याच्या  modus operandi  मध्ये साम्य दिसते व गुन्हय़ासंबंधी विचार करताना modus operandi   हा महत्त्वाचा मुद्दा आहे. ती समान असल्याने मारेकरी एकच असतील असे वाटते. (आता हेच वाक्य मी असेही लिहू शकते की, गुन्हा घडवून आणण्याच्या पद्धतीला modus operandi  असे म्हणतात व गुन्हय़ासंबंधी विचार करताना modus operandi हा महत्त्वाचा मुद्दा आहे हे माननीय संपादकांनी लक्षात घेतलेले दिसत नाही.) पानसरे यांच्यावरील हल्ल्याचा निषेध करायला, विचारस्वातंत्र्याची बाजू मांडायला हा अग्रलेख लिहिला आहे, की नेता अत्यवस्थ असल्याचा दुखरा क्षण गाठून पुरोगाम्यांना झोडायला तो लिहिला आहे?  
विचारात व व्यवहारात धर्मनिरपेक्षतेच्या बाजूने व धर्माधतेविरोधी ठामपणे उभे राहणे, नतिक आचरण शिकवणाऱ्या धार्मिकतेचा आदर करणे हे पानसरे व दाभोलकरांमधील अजून एक मोठे साम्य! त्यामुळेच ते काय म्हणतात हे समजून घ्यावे असे सामान्य माणसाला वाटते, हे या दोघांतील एक समान शक्तिस्थान. हिंसेचा नुसता निषेध करणे पुरेसे नाही. तो तर केलाच पाहिजे; परंतु ही हिंसा निर्माण करणाऱ्या विचारांपर्यंत पोहोचून अहिंसात्मक मार्गाने हिंसेचा प्रतिवाद केला नाही, तर हिंसा करणाऱ्यांना अटकाव कसा बसणार?
आíथक हितसंबंधांचा विचार करतानादेखील पुरोगामित्व- प्रतिगामित्व हे मुद्दे विषयबाह्य ठरत नाहीत, कारण धर्म, जात यांच्या अस्मिताकारणात गुंतून पडलेला समाज हा स्वत:च्या अस्तित्वाला ग्रासणारे मूलभूत प्रश्नदेखील विचारत नाही.
मुक्ता दाभोलकर

* दिवंगत माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करणारी, त्यांना आदरांजली वाहणारी आणि त्या ओघाने व्यसनमुक्तीचा संदेशही देणारी अनेक पत्रे ‘लोकसत्ता’ कडे पोहोचली. त्यापैकी अगदी निवडक पत्रांनाच प्रसिद्धी देणे शक्य होईल.

Story img Loader