दिल्ली बलात्कार प्रकरणातील एका आरोपीची मुलाखत ‘इंडियाज् डॉटर’ या लघुपटात असल्यामुळे संसदेत आणि सरकारी पातळीवर गोंधळ सुरू आहे. तो लघुपट आणि खास करून ते वादग्रस्त वक्तव्य सर्वासमोर आलेच पाहिजे. याची प्रमुख तीन कारणे :
१) आरोपीची क्षुद्र आणि विकृत मानसिकता समोर येईल.
२) बलात्काराच्या प्रकरणांमध्ये अद्यापही एक सर्वसाधारण समज आढळतो की चूक आधी त्या मुलीचीच असली पाहिजे. ही सामाजिक मानसिकता उघडी पडेल.
३) लैंगिक अपराधांच्या आरोपींना अधिकाधिक कडक शिक्षा कशी मिळेल याची सरकारी पातळीवर तयारी सुरू होईल.
मोदी सरकार दिल्ली पराभवानंतर आणि राज्यसभेतील अभिनंदन ठरावातील दुरुस्ती संमतीच्या प्रकरणानंतर या प्रकरणात जास्तच बॅकफूटवर गेले आहे. त्या लघुपटावरील प्रसारणाच्या बंदीमुळे देशाची अशी कोणती अब्रू वाचणार आहे? जिथले न्यायमूर्तीसुद्धा अशा प्रकरणांत गुंतले जातात, तिथे सामान्य महिलांची काय परिस्थिती असेल याची कल्पना सहज येते. दुसरे असे की, बलात्काराच्या प्रकरणातील आरोपी अल्पवयीन असेल तर त्याला शिक्षा का म्हणून कमी व्हावी? एखादा पुरुष बलात्कार करतो, म्हणजे तो अल्पवयीन राहिला नाही, हे सत्य न्यायालयाने मान्य करायला हवे. या आणि इतर अनेक गोष्टी आहेत, ज्यांची चर्चा होऊन कठोर उपाययोजना केल्या पाहिजेत जेणेकरून शिक्षेच्या भीतीने तरी बलात्कार होणार नाहीत.
समीर कुलकर्णी, बीड.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा