सर छोटूराम दुर्लक्षित का?
पंतप्रधानपदी असताना हत्या झालेल्या इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी ३१ ऑक्टोबर या दिवशी होती आणि त्याच दिवशी भारताचे दुसरे एक महापुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिनही होता. वल्लभभाई पटेल यांचा जन्म, त्यांचे बाडरेलीचे आंदोलन – सगळेच गुजरातमध्ये झाले. त्याशिवाय नर्मदा नदीवरील ज्या धरणप्रकल्पाला ‘सरदार सरोवर’ असे नामाभिधान आहे, तो वादाचा विषय झाल्यामुळे साहजिकच पटेलांचे नाव गुजरातशी जोडले गेले आहे. योगायोग असा की गुजरातचेच मुख्यमंत्री आता भारताचे पंतप्रधान झाले आहेत. त्यामुळे कोणत्याही गुजराती महापुरुषाला राष्ट्रीय दर्जाचे स्थान देणे त्यांना काही कठीण नाही.
गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षाचे राज्य आहे. त्यापलीकडे राजस्थानातही सत्ता भाजपकडे आहे आणि अलीकडेच झालेल्या हरियाणा विधानसभेच्या निवडणुकीतसुद्धा भाजपला संपूर्ण बहुमत मिळाले आहे. हरियाणामधल्या एखाद्या थोर विभूतीला, सरदार पटेलांप्रमाणेच, राष्ट्रीय दर्जाचे स्थान देण्यात काही अडचण नव्हती. महात्मा गांधींनी वल्लभभाई पटेलांना ‘सरदार’ ही पदवी दिली ती त्यांच्या बाडरेली आंदोलनाच्या कार्यामुळे; तर इंग्रज सरकारने हरियाणातील एका विभूतीस ‘सर’ ही पदवी दिली होती. या विभूतीचे नाव सर छोटूराम (जन्म : २४ नोव्हेंबर १८८१ – मृत्यू : ९ जानेवारी १९४५). सर छोटूरामांचे कार्य इतके अद्भुत आहे की आज लोकांचा त्यावर विश्वास बसणेसुद्धा कठीण आहे. त्यातील काही महत्त्वाचे मुद्दे फक्त मी खाली सांगतो.
जेव्हा साऱ्या भारतवर्षांत िहदू-मुसलमानांच्या दंग्यामुळे वणवा पेटला होता, त्या काळात सर छोटूराम यांनी िहदू, शीख आणि मुसलमान यांचा एक संयुक्त पक्ष- ‘नॅशनल युनियनिस्ट पार्टी’ तयार करून त्या पक्षाचे सरकार त्या काळच्या अखंड पंजाब इलाख्यात आणले होते. सर छोटूराम हयात होते तोपर्यंत मोहम्मद अली जिना यांना पंजाबमध्ये त्यांच्या मुस्लीम लीगची एक साधी कचेरीही उघडता आली नाही, असे जाणकारांकडून कळते.
सर छोटूराम यांच्याबद्दल काँग्रेसच्या मनामध्ये एक प्रकारचा विद्वेषच होता असे दिसते. या बाबतीतही सरदार पटेल आणि सर छोटूराम यांच्यामधील साम्य लक्षात घेण्यासारखे आहे.
सर छोटूराम यांच्या कारकीर्दीत शेतकऱ्यांकडून सावकारांना जमीन काढून घेता येऊ नये अशा तऱ्हेचा कायदा झाला. या कायद्याला ज्यांनी विरोध केला त्यांत, आश्चर्य म्हणजे (महाराष्ट्राचे बाळ गंगाधर टिळक आणि बंगालचे बिपिनचंद्र पाल यांच्या बरोबरीने ज्यांचे नाव घेतले जाते ते) लाला लजपत राय अग्रणी होते. त्यांनी असा युक्तिवाद केला की, सावकारांना शेतकऱ्यांच्या जमिनी जप्त करता आल्या नाहीत तर शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यासाठी दुसरे काही साधनच रहाणार नाही. श्रीमती सरोजिनी नायडू यांच्या एका साक्षीप्रमाणे सर छोटूराम यांची युनियनिस्ट पार्टी निवडणूक लढवत असताना काँग्रेस पक्षाने कडेलोटाची तयारी करून त्यांच्या पक्षाला पाडण्याचे प्रयत्न केले होते.
– महात्मा गांधी आणि सर छोटूराम यांच्याही भेटी झाल्याची नोंद आहे. सविस्तर चर्चा काय झाली असेल ती असो, पण सर छोटूराम यांनी महात्मा गांधींना विनम्रपणे दोन सूचना केल्या. पहिली अशी की, कोणत्याही प्रकारे देशाच्या समाजकारणामध्ये किंवा राजकारणामध्ये धर्म आणला जाऊ नये. हे गांधीजींना कसे पटावे? सर छोटूराम विनम्रपणे म्हणाले की, मी स्वत कट्टर आर्यसमाजी आहे. पण समाजकारणात व राजकारणात मी माझा धर्म कोणत्याही प्रकारे येऊ देत नाही आणि त्याचा साक्षात पुरावा म्हणजे सर छोटूरामांच्या पक्षाने िहदू, शीख, मुसलमान यांचे संयुक्त सरकार स्थापन केले होते, ते चालवायला त्यांना कोणतीही अडचण आली नाही.
सर छोटूरामांनी गांधीजींना विनम्रपणे आणखी सूचना केली होती. ते म्हणाले होते की, भारतवर्षांमध्ये सध्या प्रस्थापित झालेले कायद्याचे राज्य ही इंग्रजांनी भारताला दिलेली एक महान देणगी आहे. तुम्ही, कृपा करून, सत्याग्रहाच्या नावाखालीसुद्धा सध्या लोकांना कायदे तोडायला शिकवू नका. आज कायदे तोडणे हे प्रभावी हत्यार वाटत असले तरी जेव्हा इंग्रज निघून जातील आणि राज्य आपल्या हाती येईल तेव्हा लोकांची कायदे मोडण्याची सवय नव्या सरकारला खूप महाग पडेल.
सर छोटूराम हे त्यांच्या काळाच्या किती पुढे गेलेले होते हे दिसून येते. आणि, मला आश्चर्य वाटते की हरियाणामध्ये भाजपचे राज्य आल्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी किंवा त्यांच्या पक्षाने सर छोटूराम यांचे महापुरुषत्व नोंदले जाईल अशा तऱ्हेचा काही कार्यक्रम हाती घेतलेला नाही.
शरद जोशी
माजी खासदार (राज्यसभा) व
संस्थापक, शेतकरी संघटना
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा