फेसबुकवर केल्या गेलेल्या राष्ट्रपुरुषांच्या बदनामीची आणि त्यामुळे उसळलेल्या जनक्षोभाच्या बातम्या (लोकसत्ता, २ जून) वाचल्या आणि आदल्या दिवशी याचे परिणामही काही प्रमाणात पाहिले. शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि शिवसेनाप्रमुख हे महाराष्ट्राच्या अस्मितेचे मानिबदू आहेत. त्यामुळे येथील लोकांमध्ये खळबळ माजवण्यासाठी कुणा माथेफिरूंनी थंड डोक्यानं फेसबुक खात्याचा उपयोग करून अश्लील चित्रे प्रसारित केली. तपासकामात ज्यांची मदत घेतली गेली, अशा तज्ज्ञ माजी पोलीस अधिकाऱ्याच्या माहितीप्रमाणे ते खाते मार्च २०१३ मध्येच हॅक केले गेले होते, अशीही बातमी आहे. मात्र ज्या कुणाचे ते खाते असेल तो जागरूक नसल्यामुळेच शेवटी त्याचा दुरुपयोग झाला असावा. तेव्हा प्रत्येक फेसबुकधारकाचे हे कर्तव्य आहे की आपल्या खात्यावरून असंबद्ध अनियमित माहिती प्रसारित होत नाही ना, हे पाहाणे. तसे जाणवले तर ‘सायबर गुन्हे अन्वेषण विभागा’कडे धाव घ्यायला हवी.
दुसरा मुद्दा सामूहिक मानसिकतेचा. माथेफिरू आपले काम करून मजा बघत बसला असेल. इकडे पुणे, िपपरी-चिंचवडचे काही रस्ते वाहनांच्या काचांच्या खचाने भरून गेले. अफवांमुळे जनता घाबरून घट्ट झाली. त्याचवेळी निषेध करताना एवढेही तारतम्य बाळगले गेले नाही की ‘व्हॉट्स अॅप’सारख्या संपर्कमाध्यमावर, ज्याबद्दल तिरस्कार करतोय तीच चित्रे टाकली जात आहेत. हे फारच खेदजनक आहे. मग भडकपणे बातम्या पोहोचवू पाहणाऱ्या दृक्श्राव्य प्रसारमाध्यमांनाच फक्त दोष देण्यात काय अर्थ? अशा घटनांच्या वेळी सामूहिक मानसिकतेवर ताबा मिळवणे आणि तपासयंत्रणेला काम पूर्ण करून गुन्हेगाराला पकडता येण्यासाठी सहकार्य करणे हे समाजातल्या प्रत्येक घटकाचे कर्तव्य ठरते.
-श्रीपाद पु. कुलकर्णी, बिबवेवाडी (पुणे)
व्हॉट्सअॅप, फेसबुकवरसुद्धा अविचारी ‘जमाव’ आहेत!
‘माणूस,जमाव आणि माध्यमे’ हा अन्वयार्थ (२ जून) वाचला. हतबल माणूस, बेकाबू जमाव आणि उतावीळ माध्यमे या त्रिकोणात आता आणखी एका कोनाची भर पडते आहे, ती बेलगाम सोशल मीडियाची. रोजच्या धावपळीच्या जीवनात माणसे रोज एकत्र येऊ शकत नसली तरी सोशल मीडिया अथवा सामाजिक माध्यमांच्या सहाय्याने ते कायम एकमेकांच्या संपर्कात राहतात. या सामाजिक माध्यमांमधे अनेक ग्रूप्स (गट, समूह) असतात ते एखाद्या तणावाच्या प्रसंगी ‘जमावा’च्याच भूमिकेत शिरतात. वास्तविक जीवनात जसे जमाव बेकाबू असतात तसेच आभासी दुनियेत अस्तित्वात असलेले हे अनेक जमाव तितकेच बेकाबू असतात. जे लोक इतर वेळी आक्षेपार्ह मजकूर शेअर करू नका म्हणून सांगणारी पोलिसांची पत्रके शेअर करतात, तेच लोक तणावाच्या प्रसंगी भडकाऊ मजकूर एकमेकांना पाठवून आगीत तेल ओतण्याचे काम करतात. त्यामुळे प्रत्यक्ष जमावाला विवेक नसतो,वास्तवाचे भान नसते हे जमावाचे मानसशास्त्र आभासी जगातील जमावानांदेखील तंतोतंत लागू पडते. अशा वेळी अगदी उच्चशिक्षित किंवा मोठय़ा पदांवर काम करणारे देखील यात सामील होताना दिसतात. अर्थात शिक्षणाचा आणि विवेकाचा काही एक संबंध नसतो हेही तितकेच खरे आहे. पण आपण जो मजकूर इतरांना पाठवतो आहे तो किती सत्य आहे अन त्यात किती तथ्य आहे याची शाहनिशा एकदा करावी मगच तो पुढे पाठवावा.
तणावाच्या प्रसंगी आक्षेपार्ह मजकूर शेअर करण्याआधी जंगलात आग लागलेली असताना चोचीत थेंब थेंब पाणी आणून आग विझवण्याचा प्रयत्न करणाऱ्या चिमणीचा संदेश आठवावा. आग विझवणाऱ्या चिमणीला कोणी तरी विचारतं तुझ्या थेंब थेंब पाण्याने ही आग थोडीच विझणार आहे, त्यावर चिमणी उत्तर देते मला माहीत आहे माझ्या थेंबभर पाण्याने आग विझणार नाही पण जेव्हा इतिहास लिहिला जाईल त्या वेळी माझे नाव आग लावणाऱ्यांमधे नाही तर आग विझवणाऱ्यांमधे लिहिले जाईल.
सोशल मीडियाच्या बेलगामपणाची तीव्र जाणीव परवा शिवाजी महाराजांबद्दल कोणीतरी आक्षेपार्ह फोटो फेसबुक वर टाकल्यानंतर उमटलेल्या तीव्र प्रतिक्रियांमधून झाली. अनेकांनी ते फोटो पाहिलेही नव्हते तरी एका विशिष्ट समुदायाला टारगेट करणे सुरू केले. लाखांमधे एखादा विकृत असला म्हणून संपूर्ण समुदायाला दोष देणे चुकीचे आहे आणि शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाची उंची इतकी वर आहे की एक काय हजार विकृत फोटो टाकले तरी त्या उंचीला थोडाही धक्का लागणार नाही. राजकीय नेत्यांनीही अशा वेळी प्रगल्भता दाखवत स्वत:च्या व कार्यकर्त्यांच्या उत्साहाला आवर घालण्याची आवश्यकता असताना तेही अंगी आजिबात नसलेले ‘शौर्य’ दाखवत जमावाला चिथवण्यात धन्यता मानतात. ‘शौर्य’ दाखवायचे च असेल ते विधायक कामांमधे दाखवावी जेणेकरून त्यांचे स्वत:चे आणि समाजाचेही भविष्य उज्ज्वल होईल.
निलेश पाटील, धुळे</strong>
पुगस : प्रवृत्तिधर्माचे प्रखर पुरस्कत्रे
‘प्रबोधनपर्व’ या सदरात पु. ग. सहस्रबुद्धे यांच्या जीवनकार्याचे वर्णन (२ जून) उचित असले तरी त्यातील ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जवळीक असल्याने सहस्रबुद्धे राष्ट्रवादी विचाराचे पुरस्कत्रे होते’ हे विधान चूक आहे. राष्ट्रवाद, बुद्धिप्रामाण्य, विज्ञाननिष्ठा, प्रवृत्तिधर्म या त्यांनी अंगीकारलेल्या एकाही तत्त्वामागे संघाची प्रेरणा नव्हती. किंबहुना या तत्त्वांचा देशभर प्रसार करण्यासाठी संघ हे उपयुक्त व्यासपीठ होऊ शकेल या आशेने त्यांनी संघात प्रवेश केला. कारण संघ ही शिस्तबद्ध तरुणांची मोठी, वíधष्णू अशी देशव्यापी संघटना होती. पण जुनाट विचारसरणीच्या संघचालकांमुळे त्यांची घोर निराशा झाली व अल्पावधीतच त्यांनी संघाशी संबंध तोडून टाकला.
त्यांचे निकटवर्ती विद्याधर पुंडलिक म्हणतात, ‘केवळ दैनंदिन संघटना हे सूत्र घेतले तर शिवाजीनंतर हिंदू समाजात निर्माण झालेली ही एकमेव शक्ती आहे’ या वाक्याने त्यांनी संघात प्रवेश केला, अन् ‘संघ म्हणजे परंपरागत विचारांच्या ‘ममीज’ भरलेला हिंदुस्थानातील एक प्रचंड पिरॅमिड आहे’ या वाक्याने ते संघाबाहेर गेले.
पुढे एका लोकसभा निवडणुकीत त्यांनी रामभाऊ म्हाळगी यांच्याविरुद्ध मोहन धारिया यांना जाहीर पािठबा देऊन तथाकथित हिंदुत्ववाद्यांचा रोष ओढवून घेतला होता. ‘सोबत’चे ग. वा. बेहेरे (पुगस यांचे ते विद्यार्थीच) यांनी त्याबद्दल त्यांच्यावर अत्यंत अश्लाघ्य टीका केली होती. त्यामुळे त्यांनी बेहेरे यांच्याशीही संबंध तोडून टाकले होते!
.. अशी होती पुगस यांची संघाशी जवळीक!
सुहास वसंत सहस्रबुद्धे, पुणे.
एकच टक्का मते कशी, याची मीमांसा करण्यासाठी वेळ घ्या!
लोकसभा निवडणुकीत पक्षाचा दारुण पराभव होऊनही मनसे समर्थकांशी संवाद साधण्याच्या निमित्ताने राज ठाकरे यांनी सभा घेतली. नरेंद्र मोदींनी ज्या प्रकारे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून झंझावात उभा केला व भाजपला अभूतपूर्व यश मिळवून दिले ही घटना ताजी असताना राज ठाकरे यांनी स्वतला मुख्यमंत्रीपदाचा उमदेवार जाहीर करून मोदींचा कित्ता विधानसभेच्या निवडणुकीत गिरवायचे ठरवून टाकले. म्हणजे निवडून आलेल्या आमदारांनी नेता निवडण्याचा प्रश्न ठाकरे यांनी गुंडाळून टाकला असे म्हणावे लागेल. मला वाटते पक्षाच्या दारुण पराभवाची मीमांसा यांनी आणखी काही वेळ देऊन करायला हवी. लोकसभेच्या निवडणुकीत मनसेला जेमतेम एक टक्का मते मिळाली आहेत. सभेला आलेल्यापकी फक्त मनसेसमर्थकच मतदार होते हे स्पष्ट आहे व अशा श्रोत्यांकडून पक्षापुढील समस्यांची चौकशी करणे कितपत शहाणपणाचे आहे असा प्रश्न विचार करणाऱ्यास पडू शकतो. तरीही, ठाकरे परिवारातून प्रथमच निवडणुकीच्या रिंगणात उतरणाऱ्या राज यांनी मराठवाडा किंवा विदर्भ भागातून विधानसभेसाठी निवडणूक लढवावी अशी नम्र विनंती त्यांना करावीशी वाटते.
-नंदकिशोर पेडणेकर, अहमदनगर</strong>
सत्ता मिळवणारेच ‘हायकमांड’ खरे
‘ठाकरे हरले, ठाकरे जिंकले’ हा अग्रलेख (२ जून) वाचला. ‘महान नेता सत्ता नाकारतो’ याचा अर्थ हाच की, ‘सत्ता नाकारणारा महान नेता असतो’ असा व्यत्यास जनमानसावर अप्रत्यक्षपणे ठसवला गेला. हेसद्धा एक प्रकारचे मार्केटिंग होते. सुदैवाने लोकशाहीत सर्वाना सर्वकाळ मूर्ख बनवता येत नाही. त्यामुळेच ‘सत्ता हे विष आहे’ या व अशा भंपक विधानांना या वेळी जनता भुलली नाही आणि प्रत्यक्ष रणांगणावर उभे राहून आपली व्यक्तिगत विश्वासार्हता पणाला लावणारे मोदी जनतेला जास्त सच्चे वाटले. जागतिक स्पध्रेमध्ये चटके खाल्लेली जनता आता एखाद्याची तथाकथित निस्वार्थी वृत्तीदेखील फुंकून फुंकूनच पिते हे यामुळे दिसून आले.
स्वतच्या हिमतीवर प्रत्यक्ष सत्तास्थानावर बसून हुकमत गाजवणारा इंदिराजी, राजीवजी, आणि नरेंद्र मोदी यांचा ‘हायकमांड’ आणि पडद्यामागून नामानिराळे राहून सूत्रे हलवणारा तथाकथित ‘हायकमांड’ यांत आता जनता फरक करणार हे नक्की.
-प्रसाद दीक्षित, ठाणे</strong>