फेसबुकवर केल्या गेलेल्या राष्ट्रपुरुषांच्या बदनामीची आणि त्यामुळे उसळलेल्या जनक्षोभाच्या बातम्या (लोकसत्ता, २ जून) वाचल्या आणि आदल्या दिवशी याचे परिणामही काही प्रमाणात पाहिले. शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि शिवसेनाप्रमुख हे महाराष्ट्राच्या अस्मितेचे मानिबदू आहेत. त्यामुळे येथील लोकांमध्ये खळबळ माजवण्यासाठी कुणा माथेफिरूंनी थंड डोक्यानं फेसबुक खात्याचा उपयोग करून अश्लील चित्रे प्रसारित केली. तपासकामात ज्यांची मदत घेतली गेली, अशा तज्ज्ञ माजी पोलीस अधिकाऱ्याच्या माहितीप्रमाणे ते खाते मार्च २०१३ मध्येच हॅक केले गेले होते, अशीही बातमी आहे. मात्र ज्या कुणाचे ते खाते असेल तो जागरूक नसल्यामुळेच शेवटी त्याचा दुरुपयोग झाला असावा. तेव्हा प्रत्येक फेसबुकधारकाचे हे कर्तव्य आहे की आपल्या खात्यावरून असंबद्ध अनियमित माहिती प्रसारित होत नाही ना, हे पाहाणे. तसे जाणवले तर ‘सायबर गुन्हे अन्वेषण विभागा’कडे धाव घ्यायला हवी.
दुसरा मुद्दा सामूहिक मानसिकतेचा. माथेफिरू आपले काम करून मजा बघत बसला असेल. इकडे पुणे, िपपरी-चिंचवडचे काही रस्ते वाहनांच्या काचांच्या खचाने भरून गेले. अफवांमुळे जनता घाबरून घट्ट झाली. त्याचवेळी निषेध करताना एवढेही तारतम्य बाळगले गेले नाही की ‘व्हॉट्स अॅप’सारख्या संपर्कमाध्यमावर, ज्याबद्दल तिरस्कार करतोय तीच चित्रे टाकली जात आहेत. हे फारच खेदजनक आहे. मग भडकपणे बातम्या पोहोचवू पाहणाऱ्या दृक्श्राव्य प्रसारमाध्यमांनाच फक्त दोष देण्यात काय अर्थ? अशा घटनांच्या वेळी सामूहिक मानसिकतेवर ताबा मिळवणे आणि तपासयंत्रणेला काम पूर्ण करून गुन्हेगाराला पकडता येण्यासाठी सहकार्य करणे हे समाजातल्या प्रत्येक घटकाचे कर्तव्य ठरते.
-श्रीपाद पु. कुलकर्णी, बिबवेवाडी (पुणे)
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा