‘सरकारचा आणखी एक उपचार’ या रीअल इस्टेट नियमन व विकास विधेयकाची माहिती देणाऱ्या संजय देशपांडे यांच्या लेखात (४ जुलै) विकासकांनी फसविल्याचा दोष अकारण ग्राहकांच्या माथी मारला आहे. केवळ काही रुपये वाचविण्यासाठी ग्राहक फसव्या कंपन्यांसोबत व्यवहार करतात. प्रचलित कायद्यात सदनिकेचे ेचटई क्षेत्र नमूद करण्याची तरतूद लागू असताना विकासक त्याचा उल्लेख करत नसेल तर ग्राहक त्यांच्याकडे सदनिका आरक्षित का करतात, असा प्रश्न त्यांना पडला आहे.
याबाबत घराची, खोलीची काप्रेट एरिया म्हणजे लांबी गुणिले रुंदी इतके साधे, सोपे असे गणित प्रत्यक्ष मोजून पडताळणी करता येत असताना ७०च्या दशकात त्यावर साडेसतरा टक्के लोडिंग चढवून ते नियमित, म्हणजेच अगदी कायदेशीर करून घेतले गेले. बिल्टअप एरिया कालांतराने सुपर बिल्टअप एरिया, युजेबल एरिया असे शब्द रूढ करून लोडिंग साडेसतरा टक्क्यांवरून ऐंशी ते नव्वद टक्के असे बेलगाम वाढत गेले. जवळपास सर्वच बिल्डर खोटेपणाने काप्रेट एरिया वाढवून त्यावरच घराची विक्री करतात. जे अगदी थोडे बिल्डर असे लोिडग चढवत नाहीत ते अन्य मार्गाने ग्राहकांचा खिसा फाडतात. त्यापकी मुख्य मार्ग म्हणजे एकूण घराच्या रकमेपकी ३० ते ४० टक्के रक्कम ब्लॅकच्या स्वरूपात सर्रास घेतली जाते. बांधकाम व्यावसायिक असलेल्या लेखक महोदयांना या बाबी निश्चितच माहीत आहेत. सामान्य ग्राहक लेखक म्हणतात तसे केवळ थोडे रुपये वाचविण्यासाठी नव्हे तर निवारा ही मूलभूत गरज भागविण्यासाठी अत्यंत नाइलाजाने ही सर्व फसवणूक माहीत असून घर खरेदी करतात.
देशपांडे म्हणतात त्याप्रमाणे ग्राहक करारनाम्याचा मसुदा अभ्यासत नाहीत हे खरेच. सामान्य ग्राहकांना करारनाम्याच्या इंग्रजी भाषेतील क्लिष्ट कायदेशीर मसुदे वाचूनसुद्धा कळत नसतीलही, पण त्यांच्या नजरेला अनेक गोष्टी सहज दिसून येतात. कबुतराच्या खुराडय़ाइतक्या जागेला बिल्डरनी बेकायदेशीररीत्या, बिनदिक्कत लोिडग चढवून कितीही मोठय़ा एरियाचे लेबल लावले तरी प्रत्यक्षात जागा फार लहान आहे, हे सामान्य ग्राहकाला न समजण्याइतका तो दुधखुळा नसतो. फक्त परिस्थितीपुढे अगतिक असतो. दिशाभूल करणारे लेखन करून सरतेशेवटी होरपळलेल्या सामान्य ग्राहकांनाच दोषी ठरविणे म्हणजे घरासाठी घरघर लागलेल्यांच्या जखमेवर मीठ चोळणे नव्हे काय?

धर्माच्या धुंदीने पोटातील आग विझविता येत नाही
एखाद्या व्यक्तीला किंवा समाजाला एखादे लेबल चिकटविले की ते काही केल्या पुसले जात नाही. मुसलमान हे कट्टर धर्माभिमानी आहेत, अशी समजूत आहे. ही विचारधारा कशी चुकीची आहे, याचे उत्तर इजिप्तमधील जनता देत आहे. होस्नी मुबारक ह्य़ांच्या एकछत्री कारभाराविरुद्ध तेथील जनता पेटून उठली. क्रांती झाली. मुबारकाला पळ काढावा लागला. त्यानंतर रीतसर निवडणुका झाल्या. अध्यक्ष मोहंमद मोर्सी सत्तेवर आले. नवे अध्यक्ष देशाला प्रगतीच्या मार्गावर नेतील अशी लोकांची अपेक्षा होती. परंतु प्रत्यक्षात काय झाले आहे? इजिप्तची अर्थव्यवस्था कोसळत आहे. देशाचा जीडीपी दर २.२ टक्केपर्यंत खाली आला असून, बेरोजगारी १३ टक्के पोहोचली आहे. परकीय गंगाजळीला ओहोटी लागलेली आहे, तेलाचे भाव भडकत आहेत.
सर्व बाजूंनी अपयश येत असताना, अध्यक्षांना धर्म आठवला. त्यांनी इस्लामिक ब्रदरहूड या मूलतत्त्ववादी संघटनेच्या कुबडय़ा घेतल्या आहेत. धर्माच्या नावाने लोकांच्या भावना सहज भडकविता येतात. मूलतत्त्ववाद्यांच्या मदतीने व आपले स्थान भक्कम होईल, असा अध्यक्षांचा कयास होता. परंतु इजिप्तच्या सेक्युलर नागरिकांनी तो खोटा ठरविला आहे.
अधिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे इजिप्तमधील स्त्रीशक्ती जागृत झाली आहे. आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग आहे. धर्माधतेच्या वरवंटय़ाखाली सारेच भरडले जातात, परंतु त्यात स्त्री अधिक होरपोळून निघते.
धर्माच्या धुंदीने पोटातील आग विझविता येत नाही ह्य़ाचे भान होणे हे लोकशाहीच्या दृष्टीने सुचिन्ह आहे. धर्माचे कार्ड कालबाह्य़ झाले आहे हे इजिप्तच्या नागरिकांनी दाखवून दिले आहे. इंग्रजीत एक वचन आहे, तुम्ही काही लोकांना काही काळ मूर्ख करू शकता, तुम्ही काही लोकांना सर्व काळ मूर्ख करू शकता, परंतु तुम्ही सर्व लोकांना सर्व काळ मूर्ख करू शकत नाही! धर्म ही अध्यात्माकडे नेणारी वाट असू शकते, तो सत्तेच्या शिडीकडे नेणारा राजमार्ग नाही ह्य़ाची जाणीव धर्माचे राजकारण करणाऱ्यांनी ठेवणे आवश्यक आहे.
फा. फ्रान्सिस दिब्रिटो   

नुसते संग्रहालय पुरेसे नाही!
अ‍ॅड. वाघोलीकर यांचा ‘पोस्टल सिग्नलर’ हा लेख (२८ जून) वाचला. तार विभागातील साहित्याचे वस्तुसंग्रहालयाच्या रूपात जतन करून ठेवावयास पाहिजे व एक कला म्हणून ते तंत्र शिकण्याची सोय यापुढेही चालू ठेवावी ही त्यांची सूचना अनुकरणीय आहे. पण कला म्हणून केवळ तिचे जतन करून भागणार नाही. तिची उपयुक्तता पण लक्षात घेतली पाहिजे. एक कला म्हणून शिकणारे हौशी लोक संख्येने कमी निघतील, कारण तिच्यात मनोरंजनाची क्षमता नाही. आज मोडी लिपीची जी अवस्था झाली आहे तसे होऊ देऊ नये. त्या लिपीची उपयुक्तता कोणीच ओळखली नाही व आज मोडी लिपीतील कागदपत्रे वाचणारे दुर्मीळ झाल्यामुळे तिचे वर्ग काढावे लागत आहेत.
आणखी २०-२५ वर्षांनी संदेशवहनाची एक सांकेतिक भाषा म्हणून, खासकरून पोलीस खात्याला या तंत्राचा वापर करता येईल. आज संदेशवहनाची नवनवी तंत्रे व साधने अत्यंत वेगाने पुढे येत आहेत. अशा वेळी हे जुने तंत्र विस्मरणात गेलेले असेल. म्हणून भविष्यातील त्याची उपयुक्तता ओळखून पोलीस खात्याने आताच त्यातील जाणत्या माणसांना अंशत: अथवा संपूर्णपणे आपल्या सेवेत सामावून घ्यावे.
र. शं. गोखले, डहाणू रोड

शूद्र-अतिशूद्रातील भेद
‘..अस्पृश्यता हद्दपार होत आहे’ (२६ जून) या बातमीवर प्रभाकर जाधव यांनी आपली प्रतिक्रिया (लोकमानस, १ जुलै) व्यक्त केली. त्यात चातुर्वण्र्याचा उल्लेख करून ‘चौथ्या वर्णातील शूद्र हे अस्पृश्य होय’ असे म्हटले आहे.
चौथ्या वर्णातील शूद्र म्हणजेच आजचे ओबीसी ज्यांची संख्या मंडल आयोगानुसार ३७४४ इतक्या विविध जातींत विभागलेली आहे. आणि अतिशूद्र म्हणजे अस्पृश्य वर्ग ज्यात पूर्वाश्रमीचे महार (बौद्ध), चर्मकार, मांग आदी  जातींचा समावेश होतो.  या जातीचा चातुर्वण्र्य चौकटीत समावेश नाही.
हा भेद स्पष्ट होण्यासाठी डॉ. आंबेडकरांनी दोन स्वतंत्र ऐतिहासिक शोध ग्रंथ लिहिलेले आहेत. १) ‘शूद्र पूर्वी कोण होते?’ आणि हा ग्रंथ त्यांचे गुरू म. फुले यांना ‘शूद्रास’ असा शब्दप्रयोग करून अर्पण केलेला आहे. दुसरा ग्रंथ ‘अस्पृश्य पूर्वी कोण होते? ते अस्पृश्य कसे झाले?’ हा ग्रंथ संत रोहिदास यांना ‘अस्पृश्यत्स’ असा उल्लेख करून अर्पण केलेला आहे.
शूद्र आणि अस्पृश्य यामधील भेद स्पष्ट होण्यास नव्याने लिहिलेले शिवाजी महाराजांचे चरित्र खरा संभाजी (नामदेवराव जाधव), विश्वास पाटील यांचे लिखित ग्रंथ, छ. शाहू महाराज समग्र वाङ्मय असे अनेक ग्रंथ आज उपलब्ध आहेत.
शूद्र आणि अस्पृश्य या शब्दांनी बहुजन वर्गात संभ्रम पसरल्याने काही लोक या शब्दातील भेद जाणण्यात चुका करताना आढळतात.
जी. एस. साळवी, कांदिवली (प.)

कलमाडी की ‘कोलमाडी’
भ्रष्टाचाराच्या आरोपावरून तुरुंग भोगून आल्यानंतर खेळाच्या राजकारणात नवा श्वास घेऊ इच्छिणाऱ्या सुरेश कलमाडींना म्हणजेच ‘बुडत्याला’ काडीचा आधारही नाही मिळाला असे वाटते.
 अनेक देशांच्या प्रतिनिधींनी चुरशीच्या निवडणुकीत कलमाडी महाशयांना  कोपरापासून रामराम ठोकला. त्यांची कोलमडलेली सत्ता पाहून त्यांचे नाव कलमाडीपेक्षा ‘कोलमाडी’च जास्त सार्थ वाटते.
 सागर काळे, साकीनाका

Story img Loader