‘सरकारचा आणखी एक उपचार’ या रीअल इस्टेट नियमन व विकास विधेयकाची माहिती देणाऱ्या संजय देशपांडे यांच्या लेखात (४ जुलै) विकासकांनी फसविल्याचा दोष अकारण ग्राहकांच्या माथी मारला आहे. केवळ काही रुपये वाचविण्यासाठी ग्राहक फसव्या कंपन्यांसोबत व्यवहार करतात. प्रचलित कायद्यात सदनिकेचे ेचटई क्षेत्र नमूद करण्याची तरतूद लागू असताना विकासक त्याचा उल्लेख करत नसेल तर ग्राहक त्यांच्याकडे सदनिका आरक्षित का करतात, असा प्रश्न त्यांना पडला आहे.
याबाबत घराची, खोलीची काप्रेट एरिया म्हणजे लांबी गुणिले रुंदी इतके साधे, सोपे असे गणित प्रत्यक्ष मोजून पडताळणी करता येत असताना ७०च्या दशकात त्यावर साडेसतरा टक्के लोडिंग चढवून ते नियमित, म्हणजेच अगदी कायदेशीर करून घेतले गेले. बिल्टअप एरिया कालांतराने सुपर बिल्टअप एरिया, युजेबल एरिया असे शब्द रूढ करून लोडिंग साडेसतरा टक्क्यांवरून ऐंशी ते नव्वद टक्के असे बेलगाम वाढत गेले. जवळपास सर्वच बिल्डर खोटेपणाने काप्रेट एरिया वाढवून त्यावरच घराची विक्री करतात. जे अगदी थोडे बिल्डर असे लोिडग चढवत नाहीत ते अन्य मार्गाने ग्राहकांचा खिसा फाडतात. त्यापकी मुख्य मार्ग म्हणजे एकूण घराच्या रकमेपकी ३० ते ४० टक्के रक्कम ब्लॅकच्या स्वरूपात सर्रास घेतली जाते. बांधकाम व्यावसायिक असलेल्या लेखक महोदयांना या बाबी निश्चितच माहीत आहेत. सामान्य ग्राहक लेखक म्हणतात तसे केवळ थोडे रुपये वाचविण्यासाठी नव्हे तर निवारा ही मूलभूत गरज भागविण्यासाठी अत्यंत नाइलाजाने ही सर्व फसवणूक माहीत असून घर खरेदी करतात.
देशपांडे म्हणतात त्याप्रमाणे ग्राहक करारनाम्याचा मसुदा अभ्यासत नाहीत हे खरेच. सामान्य ग्राहकांना करारनाम्याच्या इंग्रजी भाषेतील क्लिष्ट कायदेशीर मसुदे वाचूनसुद्धा कळत नसतीलही, पण त्यांच्या नजरेला अनेक गोष्टी सहज दिसून येतात. कबुतराच्या खुराडय़ाइतक्या जागेला बिल्डरनी बेकायदेशीररीत्या, बिनदिक्कत लोिडग चढवून कितीही मोठय़ा एरियाचे लेबल लावले तरी प्रत्यक्षात जागा फार लहान आहे, हे सामान्य ग्राहकाला न समजण्याइतका तो दुधखुळा नसतो. फक्त परिस्थितीपुढे अगतिक असतो. दिशाभूल करणारे लेखन करून सरतेशेवटी होरपळलेल्या सामान्य ग्राहकांनाच दोषी ठरविणे म्हणजे घरासाठी घरघर लागलेल्यांच्या जखमेवर मीठ चोळणे नव्हे काय?
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा