अर्थ आणि संदर्भ यांचं घट्ट नातं बुद्धीप्रमाणेच आपल्या भावविश्वाशीही असतं. लावणीसारखीच, पण आर्त साद घालणारी रचना ही ‘विराणी’ आहे, असं आपले सांस्कृतिक संदर्भ आपल्याला सांगतात नि मग त्या विराणीतल्या आसक्तीसोबत विरक्तीही भिडू लागते. सौंदर्यासोबत भयंकर दाखवू पाहणाऱ्या चित्रकारांना आपल्या संदर्भचौकटीत आता स्थान नसेलही, पण आपल्या संदर्भाचं फुलपाखरू नव्या-ताज्या फुलांकडे नक्कीच झेपावू शकतं..
‘‘तुम्ही म्हणता, तुम्हाला हल्लीची चित्रकला किंवा आधुनिक आणि उत्तराधुनिक वगैरे दृश्यकला कळत नाही.. आणि तुम्ही कविताबिविता वाचताबिचता म्हणे.. शब्द तरी कळतात का तुम्हाला?’’ असं कुणी आपल्याला विचारलं,
किंवा
‘‘दृश्यकलावंत आहात म्हणे तुम्ही.. पण तुम्हाला तुमच्याच कलेच्या दर्जाचे शब्द कळतात का हो?’’
असं आजच्या- काळासोबत राहून, काळाच्या पुढे जाण्याची महत्त्वाकांक्षा तरी बाळगणाऱ्या- चित्रकारांना कुणी विचारलं, तर दोघांचीही पहिली प्रतिक्रिया सारखीच असेल :
गप्प बसून, प्रश्न विचारणाऱ्याला आपण कमी महत्त्व देतो आहोत हे दाखवून देणं. असले प्रश्न घायकुतीला आल्यासारखे विचारू नयेत हेही गप्प राहूनच दाखवून देणं.
चूक नाही, पण उचितही नाही, असा हा प्रश्न असल्याचं आपल्याला (म्हणजे ‘रसिक’ असूनही आजच्या चित्रांपासून दूर राहिलेल्या मराठी भाषकांना) किंवा चित्रकारांना किंवा अन्य कुणालाही व्यक्तिगत पातळीवर वाटेल. शब्द खरोखरच ‘कळतात’ का, हा प्रश्न प्रत्येकाला पडलेलाच असतो. आपण तो आपापल्या पातळीवर सोडवतही असतोच. ‘गाव’ म्हणजे काय, हे आपल्याला गाव पाहून समजलेलं असलं तरीही ‘गुहागरचं गावपण हरवतंय’मधलं गाव निराळं, ‘दु:खाच्या वाटेवर गाव तुझे लागले’ आणि ‘गाव मागचा मागे पडला, पायतळी पथ तिमिरीं बुडला’ (जिवलगा, राहिले दूर घर माझे) मधली गावं निरनिराळी आहेत हे कळण्यासाठी आपल्याला अगदी आपल्यालाही नकळत बरेच संदर्भ उपयोगी पडत असतात. या उपयुक्त संदर्भाची जाणीव आपल्याला असतेच, असं नाही. उदाहरणार्थ, ‘जिवलगा..’ हे गाणं परमेश्वराला प्राणप्रिय मानणाऱ्या ‘विराणी’ या भक्तिकाव्यप्रकाराचा नमुना आहे, त्यात ‘गाव’ ही उपमा आहे आणि तिचा संदर्भ ‘जगून झालेला कालखंड’ असा आहे, असं काही शब्दांमध्ये कुणी सांगितलं तर कर्कश वाटेल इतकं मनोमन आपल्याला हेच सगळं कळलेलं असतं. संदर्भामधून अर्थाकडे जाणं अंगवळणी पडलं की अर्थ भिडणारच असतात. क्वचित ‘जिवलगा’सारखं गाणं ऐकताना, ही अंगवळणी पडलेली आपली बौद्धिक ताकद उपयोगात येणार असते. ही बौद्धिक ताकद इतकी आपसूक वापरली जाते की, आपल्याला गाणं ‘कळणार’ असतंच आणि त्यापुढे जाऊन आपल्या भावविश्वाचा ते भाग होणार असतं.
‘भावविश्वाचा भाग’ म्हणजे काय, हेही कुणी विचारत नाही. विचारलंच तर उत्तर कंटाळवाणं वाटू शकतं. त्या स्पष्टीकरणवजा कंटाळवाण्या उत्तरापेक्षा ‘भावविश्वा’साठी महत्त्वाचे असतात ते संदर्भच. हे अर्थाच्या पलीकडचे आणखी संदर्भ, खूप खोलवरचे, आठवणीचा प्रकाश पडताच हिऱ्यासारखे झळाळणारे संदर्भ. ‘जिवलगा’चं उदाहरण जरा आणखी पुढे नेलं तर, त्यातले असे ‘संदर्भाचे हिरे’ गाणं ऐकताना सापडलेले असतात. आशा भोसले यांचा आवाज आणि गाण्यात अन्य वाद्यांपेक्षा दूरवरच वाजल्यासारखी वाटणारी, नीट ऐकलं तर ऐकू येणारी झांज.
हे इतके संदर्भ, आजची चित्रकला आपल्याला देते का?
त्यापेक्षा मग ‘कालची’- आणि महाराष्ट्राच्या महान परंपरेचा भागच बनलेली चित्रकलाच बरी की नाही? महाराष्ट्रानं गेली दीडशे र्वष जपलेली पाश्चात्त्य चित्रकलेची जी परंपरा आहे, तिच्यात महाराष्ट्रीय भर भरपूर पडलेली आहे. ही परंपरा मुळात पाश्चात्त्य, ते ब्रिटिश लोक आपल्याला यथादृश्य आकृती काढायला शिकवणार होते. ते त्यांनी केलं, पण महाराष्ट्रीय चित्रकारांनी आपापल्या संदर्भाची भर त्यात घातली. मानवाकृती चितारण्याच्या पाश्चात्त्य प्रमाणांचं भारतीयीकरण महाराष्ट्रात झालंय, विषयांचं एतद्देशीयीकरण (पौराणिक विषय, महाभारत वा रामायणातले विषय, हत्तीविषयी जातककथांपासून ते आजही केरळमध्ये हत्तींची मिरवणूक असते तिथवरचे विषय).. असं सारं पाश्चात्त्य चित्रकलेच्या त्या यथादृश्य-परंपरेत महाराष्ट्रानं केलंय. त्यामुळे आजही आपल्याला सुहास बहुळकर असोत की परशुराम सुतार, वासुदेव कामत असोत की जॉन फर्नाडिस.. त्यांची चित्रं आवडतातच. त्या सर्वाच्या चित्रांना असलेले जेजे किंवा कोल्हापूर किंवा बेळगावच्या चित्रपरंपरेचे, तसेच विषयाचे – सुस्पष्ट चित्रविषयाच्या मागल्या ‘माहिती’चे आणि त्यातून व्यक्त होणाऱ्या भावभावनांचेही- संदर्भ आपल्यापर्यंत सहज पोहोचण्याजोगे असतात. नसले, तर प्रदर्शनपुस्तिकेत म्हणा किंवा चित्राच्या शीर्षकाची जागा थोडी मोठी करून तिथं म्हणा, ते दिलेले असतात – हे मेघदूताच्या या श्लोकावरलं चित्र आहे असं कामत यांच्या अलीकडल्या प्रदर्शनात स्पष्ट केलं गेल्यानंतरच आपल्याला ते चित्र अधिक चांगलं कळलं, हा अनुभव माझा आहे, पण तो तुमचाही असणार.
याउलट, उदाहरणार्थ सुनील गावडे. अत्यंत प्रतिष्ठेच्या ‘व्हेनिस बिएनाले’मधल्या खास मध्यवर्ती प्रदर्शनासाठी निवड झालेले आणि मराठीभाषक- महाराष्ट्रवासी असे एकमेव चित्रकार. सध्या वय ५२-५३, म्हणजे अगदी वावदूक तरुण म्हणून नजरेआड करावं, असं तर नक्कीच नव्हे, पण आपल्याला माहीत नाहीत. त्यांची जुनी (जवळपास २० वर्षांपूर्वीची) चित्रं अॅबस्ट्रॅक्ट होती, पण १९९८ नंतर ते शिल्पं प्रदर्शित करतात आणि तीही हलती वगैरे असल्यामुळे ‘आपल्याला काही नाही बॉ चित्रंबित्रं कळत’ अशा तोऱ्यात (किंवा अशा बिचारेपणानं) जरी आपण त्यांच्या शिल्पांपुढे गेलो, तरी बरं वाटणार असतंच. फक्त संदर्भ कळणार नसतात, त्यामुळे सुनील गावडे आपल्या- महाराष्ट्रीय संदर्भचौकटीच्या बाहेरच उरतात. गावडेंवर किंवा कुणाही अन्य मराठी यशवंतांवर त्यांच्या मराठीभाषकपणापायी कोणतीही वाढीव जबाबदारी आपण लादू शकत नाही. त्यांच्या यशाचे कंगोरे आपण समजून घ्यायचे असतात. आपण विज्ञानाचे अभ्यासक नसूनही नारळीकर- माशेलकरांचं यश आपल्याला भावतं, त्या सूत्रानुसार पुढे गावडे यांचंही कौतुक आपल्याला असेलच, पण हे कौतुक त्यांच्या यशाचं असेल. पण ‘गावडे यांची शिल्पं महत्त्वाची आहेत’ किंवा ‘ही काही तितकी महत्त्वाची शिल्पं नाहीत’ असं ठामपणे म्हणू शकणाऱ्या कलाभानाचं काय? त्यासाठीची सामग्री असलेल्या संदर्भाचं काय?
गावडे हे एक उदाहरणच आहे आणि राहील. अमूर्तचित्रं करताना गावडे यांना ‘अमुक कृती अमका परिणाम देते’ याचं बंधनही कळू लागलं, पण मोठय़ा पत्र्यानं रंग सारवून त्यांनी निराळी अमूर्तचित्रं केली. मात्र, स्टुडिओतल्या वा बाहेरच्या अनेक वस्तूंबद्दल स्वत:ला निराळंच कायकाय वाटत असतं, हीदेखील सर्जनशील ऊर्मीच आहे का, या प्रश्नाचा मागोवा गावडे यांनी घेतला आणि ‘ऑब्लीक’ ही ३५ छोटेखानी शब्द-शिल्पांची मालिका घडली. या मालिकेत फूटभर पांढऱ्या लाकडी पाटावर काही वस्तूच ठेवलेल्या होत्या, पण त्यांचा संदर्भ बदलून टाकणारे शब्दही पाटावर लिहिलेले होते. संदर्भाचंसुद्धा अमूर्तीकरण होत असतं, शब्दाला एकच अर्थ नसतो, असं त्या १९९८च्या प्रदर्शनातून दिसलं. मग मात्र गावडे यांनी स्वत:च्या आणखीही पुढल्या कल्पना कोणत्या तंत्रानं मांडायच्या याचा विचार केला, कागदावर उतरवले आणि प्रसंगी तंत्रकारागीर बोलावून ते घडवून घेतले. व्हेनिसला गेलेली ‘अॅलिटरेशन’ नावाची कलाकृती एकाच वेळी अनेक चंद्रांच्या अनेक कला दाखवणारी होती, पण या चंद्रांच्या मागची बाजू थेट यांत्रिक कृती उघडी करणारी होती. एकेकाळी अमूर्तचित्रे रंगवू पाहणाऱ्या गावडे यांचा कल आता ‘जे सहसा दिसत नाही, ज्याची कल्पना सहसा होत नाही’ अशा गोष्टी शिल्पांत आणण्याकडे गेला. गावडे फार मुलाखती देत नाहीत. पण एकदा तर त्यांनाच, ‘मी १९८०च्या दशकात अॅबस्टॅक्टसारख्या फटकाऱ्यांनिशी रंगवलेलं हे चित्र फुलपाखराचंच होतं’ इथपासून ते ‘२०११-१२ साली स्टीलचे पंख हलवणारं जे महाकाय फुलपाखरू मी भिंतीवर ठेवलं, त्यात धारदार तलवारही होती’ इथवरचा प्रवास सांगावासा वाटला.
फुलपाखरू हा आकार वगळता दोन कलाकृतींत काहीच सारखं नाही. धारदारपणा त्या अमूर्त (?) फुलपाखराच्या चित्रातल्या फटकाऱ्यांमुळे दिसला, तर तो योगायोग! या धारदारपणातून ‘टेरिबल ब्यूटी’ किंवा ‘सौंदर्यामागे लपलेल्या भयंकारा’चा संदर्भ दोन्हीकडे आहे, असं दिसलं तर मात्र रस्ता सापडला आपल्याला.
एकाच पद्धतीनं वर्षांनुर्वष काम करणाऱ्या अगदी एस. एच. रझांसारख्या चित्रकारांच्या कामामध्ये संदर्भ साचून राहतात. ते वाढणारही नाहीत, अशी वेळ रझांबाबत आली. याउलट सुनील गावडे यांनी मोठी उडी घेऊन वर्षांनुर्वष जपलेल्या संदर्भाच्या ऐवजी नवे संदर्भ शोधणं- तयार करणं सुरू केलं.
गावडे एकटेच नव्हेत. नव्वदच्या दशकात अनेक चित्रकारांनी हे केलं. मग काही ‘ज्येष्ठां’नी चित्रकलेचं नुकसान होत असल्याबद्दल नाराजीही व्यक्त केली.
दशकभरानंतर लक्षात येतंय की, त्यामुळे आपलं काहीच नुकसान झालेलं नाही. उलट, शब्द आणि आकार या दोन्हींतले अर्थ नवनव्या संदर्भानिशी पाहण्याची- जाणण्याची तयारी असेल तर अस्फुट संदर्भही स्वच्छपैकी समोर येतात.. ‘जिवलगा’तल्या झांजेसारखे!
संदर्भाचं फुलपाखरू..
अर्थ आणि संदर्भ यांचं घट्ट नातं बुद्धीप्रमाणेच आपल्या भावविश्वाशीही असतं. लावणीसारखीच, पण आर्त साद घालणारी रचना ही ‘विराणी’ आहे, असं आपले सांस्कृतिक संदर्भ आपल्याला सांगतात नि मग त्या विराणीतल्या आसक्तीसोबत विरक्तीही भिडू लागते.
आणखी वाचा
First published on: 10-06-2013 at 12:14 IST
मराठीतील सर्व कलाभान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: References of butterfly