आपल्या आचरणातून धर्म प्रकट करून लोकांना धर्माचरणाकडे वळविणे, हे ज्ञानी व्यक्तीचं कर्तव्य आहे, या मुद्दय़ावरून गेले चार भाग आपण चर्चा केली. ज्ञान्याकडून अपेक्षित असलेलं हे कार्य सद्गुरूंच्या जीवनात कसं दिसतं, याचा आपण  स्वामींच्या आठवणींच्या आधारे त्रोटक मागोवा घेतला. ही सर्व चर्चा ज्या ओवीवरून सुरू आहे ती ओवी म्हणजे- मार्गी अंधासरिसा। पुढें देखणाही चाले जैसा। अज्ञाना प्रगटावा धर्म तैसा। आचरोनि।। आता या ओवीची आणखी एक अर्थछटा पाहून पुढील ओवीकडे वळू. या ओवीचा प्रचलित अर्थ डोळ्यासमोर आणा. रस्त्यानं दृष्टिहिनाला दृष्टिवान घेऊन निघाला आहे, त्याप्रमाणे ज्ञान्यानं अज्ञान्यांसमोर धर्म प्रकट करावा, अर्थात अज्ञानी जनांकडून धर्माचरण करवून घ्यावं, असं ही ओवी सांगते. इथे चार गोष्टी आहेत. दृष्टिहीन आणि दृष्टिवान तसेच ज्ञानी आणि अज्ञानी. आता आपल्यातच या चारही गोष्टी कशा आहेत, पहा! आपली कर्मेद्रियं ‘अज्ञानी’ आहेत, ‘दृष्टिहीन’ आहेत तर आपली ज्ञानेंद्रियं ‘ज्ञानी’ आणि ‘दृष्टिवान’ आहेत! कर्मेद्रियांना ज्ञान होत नाही आणि ज्ञानेंद्रियांना होतं. ज्ञानेंद्रियं जशी प्रेरणा देतील त्याप्रमाणे कर्मेद्रियं कृती करतात. त्यामुळे दृष्टिवान माणूस जसा दृष्टिहिनाला हमरस्त्याला नेऊ शकतो, तसंच खड्डय़ातही पाडू शकतो, त्याप्रमाणे पाय चालत असले तरी त्यांनी कुठे जायचं हे सूक्ष्म ज्ञानेंद्रियांकडूनच ठरतं. पाय स्वत:हून मंदिरात किंवा चोरबाजारात जात नाहीत. मन, चित्त, बुद्धीच्या ओढीनुरूप पायांना चालवलं जातं. तेव्हा माझी जीवनदृष्टी ही माझ्या आंतरिक घडणीवर अवलंबून असते. तिचाच प्रभाव माझ्या स्थूल जगण्यावर असतो. जशी माझी जीवनदृष्टी असेल त्याप्रमाणे कर्मेद्रियांकडून र्कम करवून घेतली जातात. त्यामुळे कर्मेद्रियांद्वारे धर्माचरण करायचं की अधर्माचरण करायचं, हे माझ्या आंतरिक ओढीनुरूप ठरतं आणि त्यात ज्ञानेंद्रियांची साथ मोलाची असते. साधकानं आपल्या देहाचा वापर धर्माचरणासाठी करावा, असं ही ओवी सांगते. स्वामी स्वरूपानंद संकलित ‘ज्ञानेश्वरी नित्यपाठा’तील पुढील ३३ आणि ३४वी ओवी अशी- एथ वडील जें जें करिती। तया नाम धर्म ठेविती। तें चि येर अनुष्ठिती। सामान्य सकळ।। ३३।। हें ऐसें असें स्वभावें। म्हणौनि कर्म न संडावें। विशेषें आचरावें। लागे संतीं।। ३४।। (अ. ३ / १५ व १५९). या ओव्यांचा प्रचलित अर्थ असा की, ‘‘या जगात थोर लोक जे कर्म आचरतात, त्यालाच सामान्य लोक धर्म असे म्हणतात आणि सर्वसामान्य लोक त्याचंच आचरण करतात. त्यामुळे ज्ञानी पुरुषानं कर्म सोडणं बरोबर नाही. संतांनी तर याचं आचरण विशेष काळजीनं केलं पाहिजे.’’ आता वस्तुपाठाच्या मालेत या ओव्यांचाही अर्थ स्पष्ट झालाच आहे. फक्त ३४वी ओवी विशेष आहे. या ओवीत आता केवळ ज्ञानी उरलेला नाही तर त्यापेक्षा मोठा असा संत आला आहे! आता ज्ञानी हा संत असतोच असं नाही, पण संत हा ज्ञानी असतोच. कारण आत्मज्ञानाशिवाय श्रेष्ठ ज्ञान नाही आणि या आत्मज्ञानाची प्रचीती संतांच्या जीवनात ठायी ठायी येते.