जनरल मुशर्रफ यांच्यानंतर लोकशाही मार्गाने सत्तेवर आलेल्या आसीफ अली झरदारी यांच्या काळात पाकिस्तानातील माध्यमे अधिक धिटाईने काम करू लागल्याचे दिसू लागल्याने तेथील पुराणमतवाद्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण होणे स्वाभाविक आहे. पाश्चात्त्य माध्यमांनी पाकिस्तानातही आपले हातपाय पसरायला सुरुवात केल्यानंतर गेल्या वर्षभरात किमान डझनभर घटनांमध्ये इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या बदलत्या प्रतिमेमुळे ही चिंता वादामध्ये परावर्तित झाली. समाजातील विविध प्रश्न चव्हाटय़ावर मांडून त्यांची तड लावण्यासाठी माध्यमे जेव्हा नैतिकतेचे रखवालदार असल्याचा आव आणतात, तेव्हा त्याबाबत वाद सुरू होतात. पाकिस्तानमध्ये नेमका असाच वाद सध्या सुरू आहे. लाहोरमधील एका मसाज पार्लरवर एका दूरचित्रवाणी वाहिनीच्या महिला प्रतिनिधीने धाड घालून तेथील गैरप्रकार उघड केले. तेथे प्रत्यक्षात दमदाटी करून नासधूस करण्यापर्यंत माध्यमाच्या प्रतिनिधींची मजल गेली. अटक करायला लावू अशी धमकी देणाऱ्या या पत्रकार महिलेचा हा आदेश पोलिसांनीही बिनबोभाट ऐकला. माध्यमांना मिळालेले स्वातंत्र्य जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी उपयोगात आणायला हवे, असे तेथील बुद्धिमंतांना वाटते. सतत लष्कराच्या आदेशाखाली राहिलेल्या पाकिस्तानात माध्यमांची ही ताकद नव्याने अनुभवायला येत असल्याने, जे प्रश्न अन्य देशांत काही वर्षांपूर्वी निर्माण झाले होते, तेच आता पाकिस्तानात चर्चेत यायला लागले आहेत. पुराणमतवाद्यांच्या हस्तक्षेपास पाकिस्तानातील सत्ताधारीही एका मर्यादेपर्यंत मान्यता देताना दिसतात. माध्यमेही जेव्हा त्यांचीच री ओढू लागतात, तेव्हा त्याबद्दल विचारवंतांमध्ये अस्वस्थता पसरणेही स्वाभाविक ठरते. मुलींवर होणाऱ्या लैंगिक अत्याचारांना आळा घालण्यासाठी मुलामुलींचे एकत्र शिक्षण बंद केले पाहिजे, अशी उघड भूमिका एका वाहिनीने घेतली, तर दुसऱ्या एका वाहिनीने ‘डेटिंग’ करणाऱ्या जोडप्यांना कॅमेऱ्यासमोर आणून त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल जाहीर चर्चा घडवून आणली. लोकशाहीतील अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य उपभोगताना, त्याबरोबर येणाऱ्या जबाबदारीचे भानही ठेवणे आवश्यक असते, याचे भान अनेकदा सुटते. अनेक वर्षे बंदिस्त राहिलेल्या माध्यमांना, लोकशाहीच्या नव्या अध्यायात मिळालेले हे स्वातंत्र्य नवे आहे आणि त्याचा उपयोग करताना आपणच सत्ताधारी आहोत किंवा आपण सत्ताधाऱ्यांवरही अंकुश ठेवणारे आहोत, असे भासवण्याच्या नादात अनेकदा अतिरेक घडतात. पाकिस्तानात सध्या असेच काहीसे घडत आहे. परदेशी माध्यमांनी पाकिस्तानात केलेला शिरकाव आणि त्याद्वारे लादले जात असलेले जगण्याचे नवे निकष हा त्यामुळेच चिंतेचा विषय बनत चालला आहे. संक्रमणाच्या काळात असे घडणे स्वाभाविकही आहे. पाकिस्तानातील लष्कराच्या वर्चस्वाचा प्रभाव आटोक्यात ठेवण्यासाठी तेथील माध्यमांनीच आपली ताकद ओळखणे आवश्यक आहे. सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील परंपरांचा आदर करत असतानाच प्रगत विचारांना सामोरे जाण्यासाठी समाजाची मानसिकता तयार करण्याची भूमिका माध्यमांनी ओळखली, तर त्यांचे सामथ्र्यही वाढू शकेल आणि उपयोगिताही.
जबाबदारी आणि ताकद
जनरल मुशर्रफ यांच्यानंतर लोकशाही मार्गाने सत्तेवर आलेल्या आसीफ अली झरदारी यांच्या काळात पाकिस्तानातील माध्यमे अधिक धिटाईने काम करू लागल्याचे दिसू लागल्याने तेथील पुराणमतवाद्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण होणे स्वाभाविक आहे. पाश्चात्त्य माध्यमांनी पाकिस्तानातही आपले हातपाय पसरायला सुरुवात
First published on: 27-02-2013 at 05:37 IST
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Responsibility and power